Monday, 3 June 2024

जे फक्त सुचले

 जे फक्त सुचतंय,

ते कागदावर उतरवून 

सर्व कागदाचे गठ्ठे तुझ्या समोर आणून ठेवावेत,

आणि मी स्वतंत्र व्हावं एकदाचं..!!

असं सर्व इतकं सोपं आहे का खरंच?

कागदावर उतरणं पाहिल्यासारखं सहज राहिलं नाही रे आता..!!




- जे फक्त सुचले

Tuesday, 15 January 2019

अंगणातील तुळस



अंगणातील तुळस,
तिही बघत असते आकाशाचे स्वप्न..
सगळ्या श्रद्धा तोडून,
अंगणाचे कुंपण मोडून,
तिलाही खुणावत असतो सुसाट वारा..

तरीही ,
रुतलेल्या छोट्याश्या मातीत
स्वतः चं सर्व अस्तित्व विसरते ती..
घरातल्या चिमुकल्या दोन हातांनी
रेखाटलेली रंगोळीच, आकाश असते तिचं..
संध्याकाळच्या शुभंकरोती मध्ये
तिची हरवलेली श्रद्धा शोधते ती..

'तुही तसंच करते..!!,
नाही का ग आई..??'

...वैष्णवी..
...एक सावली..
#सवी

Tuesday, 13 November 2018

चार भिंती आणि आडवी रेषा



आजपासून काकडाआरती नाही..

दिंडी घरासमोर यायच्या आधी,
बायकांची रांगोळी काढायची धडपड नाही..
काल दिवसभर तोडलेला शेतमाल,
बाजारात नेण्याची शेतकऱ्यांची लगबग नाही..

अंगणात सडा टाकतानाचा, आईच्या
हातातील बांगड्याचा आवाज नाही..
कुईईSSS आवाज करत बाजूच्या,
खोलीत वाजणारा रेडिओ नाही...

कारण इथे, घरच नाही..!!

फक्त - चार भिंती आणि आडवी रेषा...!!



...वैष्णवी..
....एक सावली  

   
 

Sunday, 11 November 2018

समीक्षक..!!

कवितेतले
              यमक,
               विषय-विषयांतर,
               शब्द-भाषांतर..!

               अर्थ-निरर्थक,
               चुकलेले शिर्षक..!
अगदी
               ऱ्हस्व, दीर्घही..!

              बकवास पासून
              नतमस्तक पर्यंत..!!

               बिलकुल नाही ते वाह..!!

तसच
  
              गोंधळलेल्या भावनेचा,
              तोडलेल्या घराचा,
              बदललेल्या नात्याचाही.. !!
तुला जे सांगायचं आहे
त्याची वेळ पहावी नसती लागली..!

कवितेसोबत,
कवियित्रीच्या आयुष्याचंही
तुला बनता आलं असतं का.. ?
                  --एक समीक्षक..!!





 
 
.....वैष्णवी....
...एक सावली    


     
 

Wednesday, 31 October 2018

....हरवलेली मी..!! ....उडालेला तू..!!

एकदा उडून बघतो का.. ?
........माझ्याशिवाय..!!!

नवीन सापडेल काहीतरी,
चांगलं अजून... कदाचित

असं समज मी हरवली आहे..  
.... गर्दीत..!! 
आणि तू पोहचू शकणार नाही,
त्या रस्त्याला लागली आहे..  

काही वर्षात विसर पडेल तुला,
 ....माझा..!!
नंतर लक्षातही राहणार नाही,
आपल्या दुराव्याची कारणे..!!  

एका निवांत संध्याकाळी,
घरातली वीज गेलेली असेल..!!
आणि बॅक-अप असूनही,
अंधार करून तू बसला असशील..!!

तेव्हा
... उतारवयात..!!
तुला खूप आठवण येईल माझी..!!

आणि तेव्हा तू,
याच कवितेत शोधशील
ती गर्दी,
....हरवलेली मी..!!
....उडालेला तू..!! 





...वैष्णवी.. 
#एक_सावली 
#वादळानंतरची_शांतता 

Saturday, 30 June 2018

कोरडा!

पाऊस आला की,
सुचते न कविता
आठवतो तुही आणि
ती भेटही..!

तेव्हा मोडलेली छत्री सांभाळत
तुझ्यापर्यंत पोहचली होती
न भिजता कशीतरी
तुही आला होतास
तसाच कोरडा!
का भेटलो?
काय बोललो?
पडद्याआड सर्व
पण भिजलं होतं भेटीत मन 
आणि परतताना शरीरही...
मोडलेल्या छत्रीमध्ये तेवढं सामर्थ्य
नसावं कदाचित..
दुराव्याचा मारा सहन करायची..!!

मला फक्त तेवढंच आठवतं,
त्या पावसाळ्यात कविता नाही
पण मी भिजली होती..
आणि तेव्हा पासून

पाऊस आला की,
सुचते न कविता
आठवतो तुही आणि
ती भेटही..!


एक सावली 

"पण, किती दिवस.. ??"

कित्येकदा बोलते तुझ्याशी
मनातल्या मनात घोकत सर्व..
तुझं ताडताड निघून जाणं,
आणि
आपला असा अबोला
कोणता प्रश्न सुटणार आहे बरं?
फक्त दुरावा वाढतोय..!!
किती सरळ आहे..

तुला अभिमान वाटायला हवा खरं तर..!!!
स्वतःच अस्तित्व,
          मान,
          सन्मान शाबूत ठेवण्याचा अट्टहास-
वारसा हक्काने जपते आहे मी..!!
या सर्वात,
तू मला नेहमीसाठी
हरवून बसू नये फक्त..!!
कारण,
तू तोडून निघून गेलास रे-
मी तात्कळत बसली आहे इथे-
डोळ्यातले अश्रू गळू नये म्हणून,
खंबीरतेचा आव आणत--
"पण, किती दिवस.. ??" 




एक सावली