Friday, 28 December 2012

एक चळवळ मनातली



माणुसकी पेरून  बघितली, घेऊन  हि माती
अपयशाचे पीक आले, भरपूर आमच्या हाती.
आशेच्या किरणात, आला विदर्भी उन्हाळा कुठून
राखेत आता या शोधतो, काय  राहिले उरून ?
वैचारिक  शेतीत  या, घाम गाळला होता आम्ही एवढा
"साकी " च्या डोळ्यात जाम नसेल कोणी पाहिला तेवढा.
मशाली पेटवून हाती, उजेडाचे स्वप्न होते पाहिले,
डोळेच न उघडले कधी, अन  सगळे प्रकाश समजत राहिले.
अपयशाचा कळस आमचा, असा गेला उंचावरी,
अवस्था तशीच आमची, जसा कास्तकार कर्जबाजारी.
विरंगुळा समजूनच वाचा माझ्या  कविता
घुसवू नका डोक्यात, सांगतो तुमच्या हिता.
मूर्खपणा करून  असा, काय भले होणार मोठे
म्हणाल तुम्हीच उद्या, लिहिले  होते यानी, आता हान्हा "वैभवा" गोटे..!!


सौजन्य: 

 वैभव गुणवंत भोयर

(vgb3333@gmail.com)

Tuesday, 11 December 2012

नाही म्हटल्यावर



धडधडणाऱ्या छातीने नाही म्हटल्यावर-
डोळ्यातून  टपकन अनभिज्ञपने गळलेला
एक अश्रू...!!

तो एक सेकंद
'हो'-'नाही' च्या लढाईत
समोरच्या आरशात चमकणारे डोळे
काही तरी वेगळेच बोलले,
आणि थरथरणारे ओठ
काही तरी वेगळच बोलले..!!
इथे डोक्याच नाही हृद्याच ऐकायला हव होत,
हे हि नाही म्हटल्यावर समजल..!!!

ती एक रात्र
हे सर्व खोट होतं
तू काही बोललाच नाही
मी काही ऐकलच नाही
ह्या अधांतरी विचारात जगल्यावर
"नाही" नंतरचा "विचार कर बरं"
मी चुकली का..?? असा टोचत होता..!!
इथे एक घेतलेला निर्णय ,
रात्र जागायला भाग पडतो
हे हि नाही म्हटल्यावर समजल..!!!

ती एक भेट
'नाही' नंतरची माझी बेचैनी,
कदाचित दूर होईल या हेतूपेक्षा,
तुझे डोळे खर बोलतील आणि प्रश्न संपतील
अस वाटल..!!
पण डोळे वाचाताना गडबडली:
खर ते होत..!!पाहिजे ते नव्हतं...!!
इथे डोळेच खर बोलतात शब्द नाही ..!!
आणि हे हि नाही म्हटल्यावर समजल..!!!

नाकारला "हो"त गुंफताना..!!
मी कुठे अडली....??
हे सांगायची संधीही-
त्या रात्रींनी दिली नाही..
चार-पाच दिवसाचा गोंधळ
असा शब्दातच थांबवताना..!!
घराचा उंबरठा जास्त भारी पडला..!!
हे हि नाही म्हटल्यावर समजल..!!!

Friday, 26 October 2012

पुन्हा असं कधीच नाही..!!

ज्या क्षणी 
हा हात धरलास
तेव्हाच
मी सर्वस्वाने तुझी झाली..!!

ज्या क्षणी
पहिली ती नजरभेट झाली;
अगदी तेव्हाच
स्वप्नांवर राज्य केलस
प्रत्येक क्षणासाठी...!!

ज्या क्षणी 
पहिल्यांदा नाव घेतलस
त्याच क्षणी
नावामागच अस्तित्व तुला दिलं..!!

ज्या क्षणी 
मनाच मिलन झालं,
खरच मनाला फार जपलं 
अगदी-
माझीच त्याला दृष्ट  
लागण्यापासून  सुध्दा ..!!

त्या क्षणाची 
शपथ मला-
आज पहिल्यांदा  
फ़क़्त तेवढी चुकली..!!
माफ कर..!!


पुन्हा असं कधीच नाही..!!



Friday, 12 October 2012

नको जाउस.. नको जाउस..


पाऊस कोसळून-
थांबल्यानंतरच्या काळोखात,
समोरच्या दर्पणात,
डोळ्याखाली गडद झालेली वर्तुळे
स्पष्ट दिसली..!!
आणि
बाकी तसा फारसा फरक दिसतही नव्हता
पांढऱ्या कपाळाव्यतिरिक्त..!!

भिंतीवर चुकचुकनाऱ्या पालीने

कॅलेंडर वर लक्ष वेधलं..
आज तारीख-

हे देवा..!
एक वर्ष उलटलं,
तुझ्या प्रेतावर कोसळून,
नको जाउस...नको जाउस...
म्हणायला..!!

त्या नंतर-
खरं तर-
फार काही बदललं नाही,
नेहमी सारखाच पावसानंतर
काळोख दाटला..
फक्त झालीत
डोळ्याखालची काळी वर्तुळे-
समजुतदार ..!

नको  जाउस..  नको जाउस..
म्हणत-
प्रेतावर कोसळून-
अक्षरश: घर डोकावर घेऊन..!!
एक वर्ष उलटल..!!

त्या नंतर  खरतर
कुणीच आलं नाही..!
तुझे-माझे सखे सोयरे
एकदाही पलटले नाही..!

फक्त -
गुलाबी थंडीत
हात-पाय आणि
मनाची कवाडे उलली जातात..!
आणि
पावसानंतरच्या
काळोखात जीव गुदमरला  जातो..!!

हर एक आठवण
कडू घासासारखी गिळून..!
जागृत झालेली
वासना मनात पिळून..!!
एक वर्ष उलटलं..!!

मृत्यू


दारावरची साखळी वाजवून;
चाहूल द्यावी असा मृत्यू..!

आणि निवांत
 चहाचा कप हातात असताना,
पाउल न वाजवता,
मागून मिठीत घेणारा मृत्यू..!!

बिछान्या वर आजारांनी 
तडफडत तडफडत 
नेणारा मृत्यू..!

जगनाऱ्याला जिवंतपनी मारणारा मृत्यू..!!
कुणी म्हणे 
संसारातून मुक्ती देणारा मृत्यू..!!

मृत्यू- मृत्यू -मृत्यू 
एक घटनाच हि-
पुन्हा जगा सांगणारी..
मृत्यूची चाहूल लागली कि बदल होतात..
म्हणून कदाचित क्रांती आणणारा मृत्यू..!!!

Saturday, 15 September 2012

काळी वर्तुळे

पाऊस कोसळून-
थांबल्यानंतरच्या काळोखात,
समोरच्या दर्पणात,
डोळ्याखाली गडद झालेली वर्तुळे
स्पष्ट दिसली..!!
आणि
बाकी  तसा फारसा फरक दिसतही नव्हता
पांढऱ्या कपाळाव्यतिरिक्त..!!

भिंतीवर चुकचुकनाऱ्या पालीने
कॅलेंडर वर लक्ष वेधलं..
आज तारीख-

हे देवा..!
एक वर्ष उलटलं,
तुझ्या प्रेतावर कोसळून,
नको जाउस...नको जाउस...
म्हणायला..!!

त्या नंतर-
खरं तर-
फार काही बदललं  नाही,
नेहमी सारखाच पावसानंतर
काळोख दाटला..
फक्त झालीत
डोळ्याखालची काळी वर्तुळे-
समजुतदार ..!

Monday, 10 September 2012

वर्तुळ

Thursday, 6 September 2012

आणि तो उत्तर देतो...


प्रिय सखीस,
         धो-धो कोसळणाऱ्या पावसाचा आज मलाही मोह आवरता आला नाही,त्यातच चिंब भिजून आलो आणि तुझं ओलं पत्र हाती
आलं! त्या पत्रातही तुझे थरथरणारे हात, डोळ्यातील अश्रू आणि विषयाच्याही पलीकडे बोलणारी तू, तू अगदी तशीच भेटली मला..!
       माझ्या शांततेवर फारच चिडलेली  दिसतेस! मी बोलत नाही कारण तुला अखंड बोलत पाहण मला आवडत..! बोलताना
तुझ्या चेहऱ्यावरचा भाव मला नैसर्गिक वाटतो! बोलता बोलता चेहऱ्यावरची लट जितक्या सहजतेने मागे सारते, जणू वाऱ्यानी
झाडाच्या पाणाशी अलगद खेळावं! तुझे निरंतर बोलणारे ओठ पाण्यावरचे तरंग वाटतात..!तुझ्या बोलण्यातच मी इतका मग्न होतो कि,
माझे शब्द अडगळीत आपसूकच जाऊन पडतात!
    तुझ्या बोलण्यामागाचे हेतू-कारण काहीही असू देत, पण या पावसाच्या अखंड आठवणी आणि त्याला कोसळताना पहान हे
अगदी तसाच अनुभवतो जस तुझं बोलणं..!!
   खरं सांगू, तू अशीच कोसळत रहा निरंतर.! माझी शांतता समजूही नकोस आणि  वाचूही नकोस! जी मादकता तुला माझ्या शांततेत
सापडते न - तीच मला तुझ्या बोलण्यात सापडते,आणि त्याची धुंदी इतकी प्रचंड असते कि, मी हि मदहोश होऊन बोलता होतो,आणि
 नेमकी समोर तू नसतेस..!
     हा असा आपल्यातला दुरावा आणि विरह दिवसागणिक वाढतच जाईल..! कारण- कारण सांगतोय मी आज-
कारण आपण रस्त्याचे दोन  काठ आहोत.! कदाचित आपला अंतिम मुक्काम एक असेलही पण मिलन कसच शक्य नाही!
   जोपर्यंत सोबत प्रवास करायचा विधिलिखित आहे,तोपर्यंत तू अशीच रहा-बोलकी बाहुली, आणि चुकूनही सिद्ध करू नकोस
माझ आवडण-त्याची गरज नाही!फक्त मी कधीच न बोललेल्या शब्दाना डोळ्यांनी तेवढं समजून घे! मी  डोळ्यांनी बोलतो शब्दांनी
नाही!आणि डोळ्यांची भाषा तुला चांगलीच समजते!
     तुझे मुके शब्द समजण्यासाठी,मी तुझ्या जवळ नाही याची खंत वाटते!

                                                                                                तुझा सखा..!

जेव्हा ती लिहिते..


प्रिय सख्यास..!!
     
            बाहेर धो-धो पाऊस कोसळत आहे, आणि मी नेहमीसारखी तुझ्याशी गप्पा मारायला बसली आहे.
तुझी माझ्याशी बोलायची इच्छा आहे कि नाही हेही न पाहता! आज तुझ्याशी काय बोलू? कारण गेली
कित्येक दिवस फक्त मीच शब्दांचे रास रचत आहे.!आणि तू मात्र "तू कोण..?" या अविर्भावात मला
दूर्लक्षित  करतोस,पण तुझं असं तोडणार वागण काही  खर नाही हे समजण्याइतकी मी काहि हि नाही!
     तुझं माझ्याशी न बोलणं हे पाण्याच्या बुडबुड्यासारख वाटत, आणि तुझी अशी दूर्लक्षित करत असलेली
 वागणूक मला दुखावते,माझ्यातच रममाण असणारी छोटी मुलगी रुसून बसते! तुझ्या मनात कदाचित फार
निर्मळ विचार असतील,मला दूर्लक्षित  करण तुझा हेतूही नसेल! पण खरच मी फार लहान आहे,माझे निर्णय तर सोड माझे हट्टही मी स्वत: पूर्ण करू शकत नाही-म्हणून तुझ्याशी बोलते,निरंतर विषयाच्याही पलीकडे!
   आयुष्यात आपल्याच अहंकारान आपणच एक ठणकणारी गाठ तयार करतो. ती ठणकू लागली कि आपणच
तक्रार करू लागतो, आणि यातूनच अपेक्षांचा जन्म होतो आणि एखाद्या बेसावध क्षणी अपेक्षाभंग होतो आणि
मग होणाऱ्या जखमेला कुरवाळत बसण्याचा छंद आपल्याला लागून राहतो.
   हा छंद अर्थात वाईट सवय जडून पावसाच्या अखंड संवेदना आणि जखमा अंतरी सजवत बसू नये म्हणून मी बोलते!
   तुझ्याशी गप्पा मारताना तुझा मुकेपणा मला जास्त बोलका वाटतो,तू न बोलता म्हणजे खर तर बोलायला काहि
 नसते म्हणून असेल कदाचित! तू शांत  असतोस आणि मला शांतता वाचता येत नाही,समजत तर बिलकुलच नाही.पण- सकाळच्या धुंद करणाऱ्या धुक्यान्मधली मादकता तुझ्या अबोलपणामुळे  अनुभवता येते.
  तुझ्या न बोलण्यावरच मी एवढी बोलकी झाली म्हणून पुन्हा फक्त अबोल होऊ नको, कारण.....नको आज कारणमीमांसाच नको..!
तू न असाच राहा, नाही तर रुक्ष टी.सी. ला तिकीट दाखवावं तस मला तुझ्या मुकेपणाच आवडणं सिद्ध करायला लागू नये!
  पण तुझ्या अबोलपणाने दुरावा मात्र वाढतो..! तेवढिच एक गोष्ट न बोलताना खटकते  आणि मुक्या शब्दात  रुजते..!

                                                                                                                      तुझी सखी..:-)

Monday, 13 August 2012

भुरभुरणारा पाऊस

असा हा  भुरभूर पाऊस,सकाळपासून सुरु आहे..!!मला धो-धो कोसळून मोकळा होणारा पर्जन्यच रुजतो,
 असा भुरळ घालून झुलवणारा भुरभूर पाऊस नाही.
                   भुरभूरनारा पाऊस जीवाला भुरळ लावतो, अन या भुरळ मध्ये दिवस व्यर्थ जातो. गेली दोन दिवसात
पावसाला खिडकीतून रिमझिम पडताना पाहन हा छंद जडला! याला छंद म्हणण्यापेक्षा वाईट सवय म्हणावीशी
वाटते! फ़क़्त कोरे विचार मनात ठेवून या भुरभुरणाऱ्या पावसाचा आनंद  घेता येत नाही! समजून न समजलेली
हरेक ती व्यक्ती आठवते अन पावसासारखी मनात उतरते,काल्पनिक विश्व अन गोष्टी मध्ये वेळ सरकत जाते!
भुरभुरणाऱ्या पावसात रिमझिमनारे विचार गुंतामय होऊन जातात..!
                 भुरभुरणारा पाऊस अन फसवे विचार यांच्यातून बाहेर काढतोही हाच भुरभूर पाऊस..!अचानक काही 
दिवसांसाठी रुसून जातो.खरं तर रुसत नाही फक्त कुण्या दुसऱ्या तिला भुरळ लावतो.पण मी अगतिक त्याची-भुरभूर पावसाची,
 वाट पाहत खिडकीपाशी गुंतामय विचारांना मोकळी करते. वाट त्याची पाहत असली तरी मला धो-धो कोसळून मोकळा होणारा पर्जन्यच आवडतो... 

Saturday, 30 June 2012

उंबरठा

खूप आवेगाने,
बेभान होऊन..
तुझ्याजवळ येण्यासाठी निघाली होती..
पण "सख्या रे.."
आडवा आला "उंबरठा घराचा"
उंबरठ्या जवळ येताना,
आपसूकच बांधली गेली,
वर्षानुवर्षाच्या संस्कार आणि नात्यांनी..
माझा आवेग तिथेच
गोरामोरा होऊन तुटून पडला..

Tuesday, 1 May 2012

"शाप"

भर दुपारी
कडक उन्हात
तापत उभं राहण्याचा
"शाप"
मिळाला आहे 'बाभळीला'..

बाभळीचा काटाही तसाच
'टोकदार'
सहसा टोचत तर नाही
टोचलाच तर-
अंतरंग फार विव्हळते..!!

तसच आहे 'तिचं'
नियतीच्या डावपेचात
प्रत्येक पावलासरशी
तापून सलाखून निघत आहे..

मनात चाललेली घालमेल
फ़क़्त नजरेत बांधून
चेहरा हसत असतोच
परिस्थितीचा 'विरोध'
सहसा नसतोच..!
अन-
जेव्हा केलाच जरा
'कंबर कसून अन्यायाचा लढा'
तेव्हा
नियतीही नशीब
पुन्हा लिहायला  आतुरली..
पण "शाप"
कडक उन्हात तपश्चर्येचा
अगदी ठरलेला,
शेताच्या
बंध्यावराच्या
बभाळीसाराखा..!!

Saturday, 24 March 2012

"दोस्ता"

बुडत चाललेल्या विचारातून
हळूचकन वाचवण्यासाठी..

हिंमत आहे रे,तरीही थोडी
ह्रदयातील भिती घालवण्यासाठी..

चालते आहे निरंतर,पण चालणचं
मनापासून आवडण्यासाठी..

प्रश्न - उत्तरांचा भोवरा
एका नजरेत थांबवण्यासाठी..

मित्र भरपूर आहेत रे
पण दोस्त होऊन
सावरण्यासाठी तरी..

हे "दोस्ता" तू
आता हवा होतास..

Thursday, 22 March 2012

किनारा

एक किनारा
असावा लागतो..
रस्ता विसरुन चालताना,
नाहितर-
काटे असतातच टपून..
रक्तबंबाळ करण्यासाठी
पायाच्या टाचा..!!

"देउळ"

"देउळ" बघितला खर तर जरा उशीरानेच.या चित्रपटाबद्दल काही लिहण्याइतप्रत मी मोठी नाही. पण देउळ पाहून बिथरली. मुळातच आस्तिक स्वभावाची पण दोन मिनटांसाठी माझ्यातल्या श्रद्धेवर प्रश्न चिन्ह उभं राहिल्याची भावना जागली..!
राजकारणावर उभं असलेल्या "देउळा" मुळे आपल्या सारख्या बोलणार्‍या असू देत, कि 'करडी' सारख्या मुक्या, जनावरांचे हाल कदाचित खरे दाखवलेही असतील..
 पण-
'देउळ','मंदिर' मला एक पवित्र स्थान वटते, असू देत कि राजकारणावर उभारलेल,तिथे विसावून,शांत बसून घंटेचा नाद एकताना मनाला जो सुकुन मिळतो तो शब्दात सांगता येणार नाही.देव भित्र्यांचा सहारा असतो,असे म्हणणारेही अनेक भेटतात्,कदचित ते बरोबरही असेल.पण आपला देव आपण निवडावा,ही प्रत्येकाची वैयक्तिक आणि श्रद्धेची बाब असते हेही तितकच खरं..!
उच-निच,गरिब-श्रीमंत,लहान-मोठा सर्व एकाच दगडासमोर अनवाणी पायांनी डोकं ठेवतात,म्हणून देउळ मला समानतेचा मोठा दगडच वाटतो.तिथे येणारा प्रत्येक काही मागतो असा समज आहे.खर तर मला तो गैरसमज वाटतो,माझ्यासारखी फक्त देउळात तिथली शांतता अनुभवायला,ती अंतरंगात भरुन घ्यायला जाते.
'देउळ' कसही असू देत, राजकारणावर उभं वा श्रद्धेवर उभं,देउळात येउन निष्पाप मनानं दोन मिनिट शांत बसल्यावर जी उब अंतरी जागते ती मला आईच्या माये इतकिच प्रेमळ वाटते...

Saturday, 17 March 2012

खरच आहे का..??

खर..??
खरच आहे का..??

जे चाललय
काळाच्या गतीनी..
दूर दूर लोकांची
भयाण गर्दी
आणि
गर्दी सोबत धावणारी
आठवणीची चाहुल..
स्वतःला वगळा,
नका वगळू..
काळ धावतो,
वेळ धावतो..

खर..??
खरच आहे का..??

जे लिहलय,
विचारांच्या गर्दीत..
इथे शब्द दूर दूर
विसावलेत,
भयाण शांततेत
आणि त्यात
व्यत्यय आठवणी चा..
आठवणीत हसा
वा
हसण्यात आठवणी..
शब्द सुचतात
शब्द रुचतात..

खर..??
खरच आहे का..??

मला सांग..

मला सांग
फुलाचे रंग
फुलपाखाराला इतके
का आवडतात..?
आपले डोळे
त्यांच्या रंगात
हळुच का फसतात..?

मला सांग
एखाद पाखरु
असं एकदम
मनाला का भोवतं..?
त्याला आपल्या
मिठित घेउन
झुलावं का वाटतं..?

मला सांग
विखुरलेली-
फुले वेचताना
काटेच का रुततात..?
स्वप्नातील सत्यात
अबोलपणे-
फुलच का खुपतात..?

मला सांग
अचानक रात्री
खिडकीतून-
चांदण का जवळ वाटतं..?
मनातील एका
अनोळखी कोपर्‍यात,
पुन्हा त्या काजव्यान् का चमकावं..?

मला सांग
धुक्यातून चालताना
अशी अस्पष्टता
आणि तो
अनोळखी भास का छळतो..?
सुकलेल्या झाडाला
पाणी घालताना
मनात विचारांचा पाउस क येतो..?

मला सांग
निळ्या आकाशात
काळे ढग,
असे का अचानक दाटतात..?
आणि-
हवेचे झोके
का अश्रू देउन जातात..?

मला सांग
नदीच्या प्रवाहात
आपण सहज
का वाहत जातो..?
मनाचे विचार
शब्दात मांडताना
जीव का असा त्रासतो..?

मला सांग
अनवाणी पायांना
ओल्या मातीचा
स्पर्श आपलासा का वाटतो..?
समोरच्या
डोळ्यातील गोंधळ
नको असतानाही,
आपल्याला का कळतो..?

मला सांग
अंगणातील मोगरा
मनातील कोपरा
अजुनही क फुलते..?
मनतील राज्यात
कवितेतल्या शब्दांच्या
अर्थासाठी का झुरते..?

मला सांग
मोहक दवं
आणि-
ती हिरवी पाती
सकाळीच का असते..?
नको असतानाही
सांजवेळी,
आठवण का छळते...?

मला सांग
चिमणं पाखरु
फांदीवरुन उडल्यावर,
फांदी का हसत असते..?
इच्छा नसतानाही
एखादी पायवाट
परतीसाठी का खुणावत असते..?

मला सांग
असं कसं-
फुलपाखरु
नवीन उमेदीन उडालं..?
फुल असो-नसो
ते तुझ्याकडे वळालं..?

Thursday, 2 February 2012

"तो" आणि "तु"

माझ्या कवितेत 'तो' देणार्‍या

त्याला

आज काहीतरी सांगायचं आहे..

तो-

'तो' तुचं असता तर..!

थोडी मर्यादा ओलांडून विचार केला..

त्या 'तो' च्या ऐवजी

      'तु'  असल्याचा..



काही नाही

   शब्दांची रचना

   फारतर बदलली असती..

   कविता आणि 'तो'

   हे घट्ट नातं

   अतुट झालं असतं..

  क्वचितच

 हसणार्‍या शब्दांना

हसण्या पासुन सवड नसती..!

ऐकटेपणा जरा

दूर देशी मुक्कामाला असता..!

'तो' ला 'तु'

संबोधलं असतं..

पण 'तो' आल्याचा भास

     'तो' दिसल्याचा हर्ष

कदाचित 'तो'च देऊ शकतो..

"तो" आणि "तु"

फक्त एक फरक आहे,

त्याला माझ्याशी

बांधणारा 'तु'

खरचं एक देवदुत आहे..

शांत-

सोज्वळ-

निर्मळ-देवदुत-हवासा..!

Wednesday, 4 January 2012

कवितेचा भास..!

कविता का असते..?
त्यानी विचारलं..!
काय सांगावं आता..
जिथे तुझा सहवास संपतो न्,
अगदि..
तिथेच सुरु होते माझी कविता..!
जिथे तुझी आठवण छळते न्,
अगदि..
तिथेच सापडतो मला-
कवितेचा पहिला वहिला शब्द..!
आणि ..
"कविता संपते कुठे..?"
जिथे वेदना जागते विरहाची..
त्याच वेळी भास संपतो कवितेचा..
"भास..??"
कविता भासच नाही का..?
कितिही लिहलं तरी
आपल्या भेटिनंतर..
जागतोच कि पुन्हा..!
कवितेचा भास..!