Tuesday, 30 December 2014

बुढीचं खाटलं

पहिल्यापायी आता नसते
वर् ह्यांडात आजीबाई
तुळस अंगणातली
पुसते हाय तुले काही

कुठं नेवून ठेवली
माय तुही जन्माची
तिच्या बिगर लेका
शान नाही जगण्याची

तू लाहीन व्हता
तवा पासून सांभाळतीय
तुले कशी बे,
ती आत्ताच जड होतीय?

पाह्य गड्या
सोपं-सोपं हाय
लेकरासाठी सारं
सहन करते माय

तूवा म्हणालं तिले त
चालली बी जाईल
पर जीव तुह्यावरचा
सांग कशी तोडील

मायं व्हयं न तुवी
घरातून कायले हाकलतू..?
यक "बुढीचं खाटलं"
तुले यवढं जड व्हतूं..?

...वैष्णवी..

Friday, 26 December 2014

नाते तुझे - माझे

माझ्यामधल्या तुझ्यापणात,संपतय आयुष्य माझे.!
निनावे सांभाळतोय तू, नाते तुझे - माझे..!!

माहीती नसलेल्या तारकांसारखचं,आपलं असणं जपलय
नियतीनेही अधांतरी जोडले असावे, नाते तुझे - माझे..!!

काल वा आजही गरजेची भाषा समजलीच कधी आपल्याला,
देहा वेगळ्या सावलीची कहाणी आहे, नाते तुझे - माझे..!!

आर्कषण, मैत्री, कारण,  प्रेम, अहंकार याही पलीकडे,
फक्त तुझ्या - माझ्यात गुंफलय, नाते तुझे - माझे..!!


Tuesday, 23 December 2014

उत्तर

माझा हात थरथरत होता, तिचा ढळलेला पदर सावरताना... तिच्या अवस्थेवरुन काय झाले असावे, हे आपसुकच समजून गेले...

ताठ मानेने जगताना.. स्वतःची तत्व वैगेरे जपणारी.. कधीच कुठलीही हार स्विकारणार नाही.. आपल्या आजुबाजुला वेगळाच ठसा उमटला होता तिचा.. लोक मानायचे म्हणा ना...

ती माझ्या दारात विस्कटून, कशी-बशी उभी होती.. आमचे डोळे भेटले,आणि धाडकन कोसळली... तिथेच दारात, भर रात्री दिड वाजता... ओस्काबोक्सी रडत होती.. रडत-रडत नेमकं काय बोलली स्पष्ट सांगता येणार नाही,पण आठवते ती ओरडत होती...

तो. . हरामी... पुलाखाली.. बेशुद्ध... मला... जबरदस्ती.. तो.. त्यानी.. अंधारात.. कुणीच नाही.. काय करु...
नंतर फक्त रडत होती..
.....
सकाळी थोडा डोळा लागला... पण... लगेच अर्ध्या तासात दचकून उठली..

गालावर सुकलेल्या अश्रूंचे निशाण... डोळे थोडे सुजलेले पण जास्तच निश्चयी..

सावरली.. जवळ आली.. मिठी मारली..कानात बोलली.. उभी राहशील माझ्या सोबत.. मला थांबायचे नाही.. लढायचे आहे..
तू मदत...

शब्द अडकलेले...
डोळे थोडे पाणावलेले..
माझ्या उत्तराच्या अपेक्षेत..

Friday, 19 December 2014

कुणाची करणी, कुणाची भरणी

एक मुलगी असते, सरळ-साधी अगदी, आपल्या नेमून दिलेल्या पायवाटेने चालणारी..! छान-सुरळीत चालू असतं तिचं आयुष्य..!


एका रात्री  कॉल येतो तीला... जुना मित्र एक असतो फोनवर... बोलण्या-बोलण्यात तो बोलतो तीला, "तू आवडतेस मला..! तुझ्या जवळ यायची इच्छा आहे माझी..! माझ्या भावनांची कदर कर.. एकदा मला ते सुख दे.. नाही म्हणू नकोस..!" ती दचकली,भांबावली.. नेमका शब्दांचा अर्थ समजेपर्यत शांत राहीली.. नंतर त्याला स्पष्ट नाही म्हणाली...त्याचा भावना प्रेमाच्या नव्हत्या,वासनेचा गंध तिला जाणवत होता...



नंतर बर् याचदा कॉल झाले त्याचे, तिने स्पष्ट नाही सांगितल्यावरही तो बोलतच होता, "मला तुझ्या जवळ यायचे आहे.. वैगेरे बरच काही.." तिचा मानसिक छळ पराकोटीला पोहचला, न राहवून तीनी हा प्रकार घरी सांगितला..



आताही अश्या घटना घडल्या की मुलींनाच दोष दिला जातो..मुलीचीच चूक असा दृढ समज केला जातो.. तीही अपवाद नव्हती..तिची बाजू ऐकलीच गेली नाही.. आणि दोषी ठरवल्या गेली.. तिचा मोबाईल जप्त.. आणि लग्नासाठी तयार रहा,मुलगा शोधतोय आम्ही, हा आणखी एक धक्का..!!



खरंतरं झालं काहीच नव्हतं, पण काही झालं असतं तर...! लोकं काय म्हणतील ही वेगळीच भिती..! या निरर्थक ओझ्या खाली काहीही कसूर नसताना तिचा बळी चालला होता.. एका वासनाधारी नराधमाच्या आयुष्यात फक्त येण्यानी तिला मनाविरुद्ध्, आपली सर्व स्वप्न बाजूला ठेवून, लग्नाच्या बोहल्यावर उभं राहावं लागलं..! आणि त्याला याबाबतीत एकही प्रश्न विचारला जात नाही, एक संस्कारी म्हणून मिरवला जातो..



यात चूक कुणाची..? तिची..? त्याची..? तिच्या घरच्यांची..? समाजाची..?? लोकांची...?? मानसिकतेची..? विचारसरणीची..?? चूक जे काही असेल,आपलं आपणं ठरवावं...!


मला या सर्वात लग्नासाठी उभ्या असलेल्या तिच्या डोळ्यातले अश्रू..! आणि निर्लज्यपणे अक्षदा टाकण्याच्या बहाण्याने आलेले वासनी डोळे.. - तेवढे स्पष्ट दिसतात..!

Monday, 15 December 2014

काश ये पल थम जाये..।

आज, त्याला भेटली ती आणि खूप बोलली, सर्व गोष्टी सांगितल्या..!! कितितरी विषयांवर चर्चाही केली, भूतकाळाच्या गाठी उलगडल्या, वर्तमानात येऊन अस्तित्वही बघीतलं, भविष्याचा वेध घेतला..!! जे बोलायचं ते सर्व,अगदी स्पष्ट बोलली..!
आणि, आता निघायची वेळ आली. ती आली तिथेपरत जाणार,त्याचही तसचं..
हे अशे एकमेकांना सोडून (नेहमीसाठी नसतं ते पण तरीही) जाणं, तिला रुजायचं नाही...
कितिही नाही म्हटलं तरी हृदयाचे ठोके वाढतात..! त्याला पुन्हा भेटता नाही आलं तर, नको त्या शंका आणि विचार नुसते..!

ती विचारते स्वतःला, हा वेळ इथेच थांबवता आला तर... मन दटावून बोलतं तिचं, "नाही.. बिलकुल नाही... गती आहे जगण्याला म्हणून भेटण्याची उत्सुकता आणि निघतानाची हूरहूर असते..! खरी मजा इथेच आहे आणि हाच वेळ थांबला तर, तोच-तोचपणा जाणवेल.. तिला भेटताना प्रत्येकदा तो वेगळा असतो - आधीपेक्षा खूप वेगळा...! हा वेगळेपणा अनुभवण्यासाठी तरी वेळ थांबायला नको आहे... तिच्या मनाच्या या शहाणपणाच्या गोष्टीचं तिलाही नवलच वाटलं ( मन समजदार झालं होतं म्हणा ना तिचं)...
निरोप घेताना पावलं जड झाली.. डोळ्यात पाणी आलं (नेहमीसारखचं, नवीन नव्हतं त्यात काही..!), त्याला ती दिसू नये म्हणून ती जरा धावत जाऊन (गरज नसतानाही) बस पकडते..तोही गाडी चालू करून निघून जातो..
.....
त्याच्या मनाचा कधीच थांगपत्ता लावता येत नाही, निघताना त्याच्या मनात काय विचार असतील, की तोही फक्त हसत असेल, जशी ती सौम्य हसत बसमध्ये बसली होती..

...वैष्णवी..

Tuesday, 2 December 2014

गुंतागुंत

खूप बोलते आहे
इतक्यात तुझ्याविषयी
का रे जूळूच नये
आपली ही नाती..?

सोबत तुझ्या राहायची
स्वप्न वैगेरे नव्हती
पण मनात या माझ्या
ही प्रश्ने नेहमीच राहती

इतका चुकिचा निर्णय
मी घेऊ शकली कशी?
आणि माझी ती मनःस्थिती
तेव्हा तू सांभाळली कशी?

बाहेर निघायचे होते
तुझ्यातून मला
म्हणूनच घरी
कोंडले स्वतःला

वाटले होते तेव्हा
नवीन सुरवात झाली
संपल सर्व
तिथेच होती फसली

भ्रम सगळा निवळला
आज अचानक बघ ना!
कवितेत माझ्या आला
तुझाच विषय पुन्हा.!

अगदी स्पष्ट आमचे
झाले आहे बोलणे!
मना, तुवा आतातरी
"गुंतागुंत" उलगडणे..!