Thursday, 28 May 2015

ते फेकलेले तुकडे



तो कसाई वरती फेकत असतो
ते सडत असलेले उरलेले मटणाचे तुकडे
आणि
आकाशातली घार उंची सोडून खाली ते झेलायला येते
तिच्या तोंडून खाली पडतात काही तुकडे
आणि
त्या खाली पडणाऱ्या  तुकड्यांसाठी धावत असतात काही कुत्रे .




..वैभव गुणवंत भोयर 

Saturday, 23 May 2015

अनोळखी

ठिक आहे तर - निरोप
हा आपला शेवटचा
प्रवास दोघांचाही
इथेच आहे संपवायचा

जाता जाता एकदाच
आठवू पहीली भेट आपली
चालेल ना तुला
थोड्या भूतकाळाच्या गोष्टी ?

तू मला,
ओळखते तरी का?
हेच विचारलेले तेव्हा
आठवते का?

आपली ओळख
नावानीच झालेली आधी
भेट तर आपली
घडली फार पुढे कधी

हळूहळू संवाद दोघांचा
वाढायला लागला होता
तेवढ्यात सहवास दोघांचा
आवडायला लागला होता

नंतर वळण आपल्या नात्याला
नको ते मिळाले
आता दुरावा इतका वाढला
की बोलणे नकोशे झाले

ताण आपल्यातला
असा ताणायला नको होता
दोस्ता..!! हा तमाशा मैत्रिचा
व्हायला नको होता

पुन्हा आता दोघांना
दूर-दूर जावे लागेल
ओळखितही "अनोळखी"
दोघांना व्हावे लागेल


Thursday, 21 May 2015

तिरस्कार

तुझ्याइतका भ्याड व्यक्ती-
बघितलाच नाही मी..!!
फक्त माझ्या शब्दांनीच,
एका चौकटीत स्वत:ला बांधून घेतलय तू..!!
स्वत:च्या डोळ्याला डोळे भिडवून,
एकतर-
असलेल्या भावनांची कबुली करता यावी..
आणि
झालीच आहे चूक तर-
निधड्या छातीने ती स्विकारली तरी जावी..
तू ,
यातलं काहीच करू शकत नाही..!!!
फक्त तू बरबाद व्हाव या माझ्या वाटण्यावरूनच -बिथरला आहेस तू..!
माझ्या चांगल्यासाठी-माझ्यासाठी-
हे सर्व करतोय..!!
अस चुकुनही बोलू नयेस..!!
कारण मी आताही,
तुझ्या नकारासहीत,
जे आहे ते,जशाच तसे-स्विकारलय..!!
तुलाच रे,
स्विकारता येत नाही आहे,
माझ्यातला तुझ्यासाठीचा - तिरस्कार..!!


Monday, 4 May 2015

कालांतराने

खरच लहान आहेस गं तू,
कोवळ्या ,निरागस बालकाचे मन सांभाळले आहेस स्वत:मध्ये..!!
आपली आवडीची वस्तू जवळपास नसली,
किंवा कुणी हिरावून घेतली,
की-
ते बाळ कशे मुसुमुसु रडते!
अगदी घर डोक्यावर घेते..!
तूही तेच करत आहे,
त्या बाळाला ती वस्तू परत मिळाली की
जो अत्यानंद होतो,
रडणारे बाळ कशे एकदम आनंदून जाते..
तशे तुझे होउ शकत नाही पण..!!
मी खूप दूर निघून आलोय,
आणि तू तिथेच ताटकळत थांबली आहेस..
एक तर मोठी हो-
जे आहे त्याचा स्विकार कर..!
किंवा-
आवडली असली तरी कालांतराने
ते बाळ त्या वस्तूला विसरतोच की,
तुझ्यासाठीही ते कठीण जाणार नाही..

Friday, 1 May 2015

नि:शब्द

मला बोलायचे होते तुझ्याशी,
तसे ठरवूनच भेटले होते मी..!
निवांत बसून,
आजवर लपवलेले सर्व गोष्टींचे गाठोडे
उलगडायचे होते मला..!!
न बोललेल्या शब्दांच्या मांडणीची उजळणी-
अगदी तू दिसेपर्यंत चालली होती..
काहीही मनात न ठेवता एकदाचे संपवायचे होते,
आपले जे काहीही नाते..
आपली भेट अशी संपायला नको होती...
माझे-तुझे हे शेवटचे भेटणे होते,
तू घाई घाईत निघून जायला नको होते,
असा नि:शब्द निरोप नको होता मला,
त्याच शब्दांच्या आतुरतेसाठी...!!