Monday, 20 June 2016

रितेपणा

केव्हाची,
एकटक पाहते आहे मी..!!
नेमक्या-
शब्दात मांडायच्या भावना
शोधते आहे-हरवलेले संदर्भ (दुसर काय.?)!!!
तसं तर-
हे नित्याचचं झालं..!!
हौसेने लिहायला घेतलेला कागद-
नुसताच फडफडणं..!!
त्याच्या कोऱ्या राहण्यातही-
अर्थ असावा बहुधा,
तुला-मला न समजलेला अर्थ..!

Tuesday, 10 November 2015

आठवणीच्या खुणा

बोलताना त्याच्या डोळ्यात 
टचकन पाणी आले
घराच्या आठवणीने 
सारं घेरून टाकले 

सालं.! पैशामागे धावताना 
माणसं दुरावत गेली 
बत्तीसी आपली दाखवत 
त्याने ही खंत लपवली 

इथे लाखाचा संसार मांडला 
पण घरपण बाजारात मिळत नाही 
"आलास का बाळा घरी..?" 
तुळशीजवळचा दिवा आता विचारत नाही 

जसा थकत चाललो 
घराची ओढ वाढत चालली 
त्याच्या अंगणात तेव्हा 
चिंचेची सावली असावी हलली 

सांगत होता तो 
चिंचेचं झाड तेवढं उरलय 
आठवणीच्या खुणा पाहून-
बहुधा तेही जरा शिणलय





दिवाळी अंकात पुर्वप्रकाषित

भव्य प्रदर्शन आणि विक्री


परक्यांच्या चुका इथे झटक्यात आहे
माझ्या चुका तर सगळ्या बटव्यात आहे.

एका बाजूचे नाणे बाजार चालवतात इथला
विचार-बिचार इकडे सगळे फतव्यात आहे.

त्यांच्या पुस्तकात चुकाच  आहे फक्त
माझे विरोधी सगळे  वणव्यात आहे.

दाखवूनच देऊ आज तर सगळ्यांना
आपले ढोल ताशे सगळे दणक्यात आहे.

"ते तसं " केलेलं जमणार नाही
चालता फिरता मी सगळा लखव्यात आहे.

--वैभव


दिवाळी अंकात पुर्वप्रकाषित


Saturday, 10 October 2015

नग्न-खुणा

तिच्या डोळ्यात,
तो नव्हता...!!
तीच-
पूर्ण ती-
त्याने नग्न सोडून दिलेली...
स्वत:च,
स्वत:च्या डोळ्यात सामावली होती..!!

त्याच्या,
तो होता याच्या-
फक्त खुणाच राहील्या होत्या..!!
डोळ्यातून कधी गळलेल्या
अश्रूच्या सुकण्याच्या..!!



Friday, 18 September 2015

रिकामा देव्हारा

"रिकामा देव्हारा बघितला आहे कधी..?"
काय झाले..??
हो..हो..तुम्हालाच विचारते आहे मी.!!
काय बघितला आहे का रिकामा देव्हारा..?

मी बघितला काल..
दूरून मंदीर छान ताज्या फुलांनी (सकाळीच तोडले असतील) सजवले होते,
म्हटल बघाव काय म्हणतो आतला देव...

बाहेर काही वृद्ध भजनही म्हणत होती,
एक थकला बिचारा कुत्रा मान टाकून झोपलाही होता तिथेच..
विचित्र सर्व प्रकार भासत जरी होता..
तरी देव तिथला पाहायचा मोह फार दाटला होता..

मनाची ओढ पायात उतरली होती,
सुगंध तिथला आणखीच भर वाढवीत होता,
कुठला देव असा पुजला जात होता,
उत्सुकता वाढीस लागली होती..!!

आणि काय..??
तो देव्हारा रिकामा होता..!!

एक केस विस्कटलेली बाई (वेडी असावी हा माझा समज),
 बरळत होती-
मुर्तीत नाही रे तू..
इथेच आहेस...!!
अनंतात..
उद्या इथेही दगड येईल एक,
पुजारीही असेलच सोबत..!!
तेव्हा मला आत येऊ दिले जाणार नाही,
कुत्राही असा शांत झोपेल कसा..!!
ही भजने बेसुरी वाटतील..

(आता माझ्या डोक्यात शंका..
कोण वेड.? मी की ती...?)

...वैष्णवी..




Sunday, 9 August 2015

बदल

"आपली पुन्हा भेट होईल, तेव्हा असाच ताटकळत उभा असशील ना रे माझ्यासाठी..??", ती भावनीक झाली होती.. "हा शेवटचा निरोप नाहीये तुझा-माझा! मी येईल परत... एक शेवटचा अलविदा म्हणायला..", ती जाताना बोलली होती तस..! आणि म्हणालीही होती, " बदलू नकोस हं.. असाच फुललेला सुगंधीच रहा..!!"

त्यानी उत्तर दिलच नाही तेव्हा.. तसाच तटस्थ उभा होता..

आज परत आली ती.. राहीलेला एक शेवटचा निरोप द्यायला.. पण.. तेव्हा तिच भानच नव्हत..तिथेच उभ्या असलेल्या त्याच्याकडे..
त्याला ओलांडून पुढे गेली आणि नकळत मागे वळून बघितल्या गेल.. तेव्हा तो म्हणाला, " मी तोच आहे.. थोड वय वाढल असेल फक्त..! पण तू गं.. तीच आहेस का..? मला सोडून गेलेली.."

तेव्हा आजुबाजुला तिनी बघितल,आता डोळसपणे.. खरच सर्व तसच होत..ती सोडून..बदलली होती ती.. आणि बदल होणारच होता, तिच्या कळत-नकळत.. निसर्गाचा नियमच ना तो... फक्त तो बदल तिच्या लक्षात आत्ता आला, त्यानी बोलून दाखवल्यावर...

आज.. तिच्याजवळ उत्तर नव्हते..पण त्याच्याकडे बघून ती फक्त हेच म्हणाली,"परतून चांगलच वाटल-पारिजातका..!"

तिच्या ह्या बदललेल्या आवेगाकडे बघून तोही जास्तच फुलला-एक बदल म्हणून..!

Thursday, 28 May 2015

ते फेकलेले तुकडे



तो कसाई वरती फेकत असतो
ते सडत असलेले उरलेले मटणाचे तुकडे
आणि
आकाशातली घार उंची सोडून खाली ते झेलायला येते
तिच्या तोंडून खाली पडतात काही तुकडे
आणि
त्या खाली पडणाऱ्या  तुकड्यांसाठी धावत असतात काही कुत्रे .




..वैभव गुणवंत भोयर