Wednesday 21 August 2013

मायचा जीव


कसा आणि कुठे, अडकलास रे पोरा? 
मायचा जीव इथे, गच्च ओला झाला! 


वैरी झाला हा, पाऊस आणि वारा! 
उभा आहेस ना रे बाबा, तू जरा आडोशाला?


पालीच्या चुकचुकन्याला, करते आहे कानाडोळा!
पण वीज ही आकाशी, धस्स करी मनाला!


उचल आपली पावले, घराकडे तू भराभरा!
 दिवेलागणीचा वेळ, कधीच निघून गेला! 


उन्मत झालेल्या पावसा,थांब ना रे जरा!
येऊ देत घरी, माझा सोन्या पिल्ला!


स्वप्नांचे बाळ घेऊन, तू उडालास खरा!
पण हा जीव मात्र तलवारीला टांगला!


Monday 12 August 2013

आनंद खरा


"नको.! ना रे बाळा,
एकदम जाऊस दूर",
बोलली होती आई
आणून नयनी पूर..! 
  
"अशी का ग करतेस,
 मला आहे उंच उडायचे, 
थांबव आता मायेने
 मला अशे बांधायचे," 

निघाली होती मी भविष्याकडे 
डोक्यावरील तिचा हात झिडकारून,
फक्त माझे ध्येय दिसले
तेव्हा तिच्या अश्रुचेही मोल विसरून,

घड्याळाच्या काट्यावर,
तीन वर्ष निघून गेली!
हतबल, जखमी, अपयशी - मी 
घायाळ होऊन परत आली! 

निरोप देतानाचे दोन हात तशेच
आजही माझी वाट पाहत आहे,
तिच्या अपेक्षेत कमी ठरलो
म्हणून डोळे मात्र नजर चुकवत आहे,
  
"अशी उदास - नाराज होऊ नकोस  
तू कुठे चुकली नाही ",
तिच्या या शब्दांनंतर,
माझ्या अश्रूंची नदी वाही!

तिच्याजवळ ममता आहे,
माझ्या जखमा भरणारी;
तिच्याजवळ ओढ आहे,
मला जग म्हणणारी!

अशात तिचा हात 
फिरला डोक्यावरून जरा,
खर सांगते तेव्हाच कळाले
आईच्या कुशीत आनंद खरा…!!