Monday 20 March 2017

कवीची रात्र


तो तिच्यासाठी जागतो
ती त्याच्यासाठी जागते
बरोबर आहे ते सर्व..
पण-
एखादी रात्र कविचीही असते!
तोही जागा असतो
मंद-मंद प्रकाशात
सुचत असलेली शब्दांची रचना-
लुकलुकणाऱ्या ताऱ्यासारखी फक्त न्याहाळत,
कुठेतरी जागत असलेल्या-
त्याच्या किंवा तिच्या भावना चंद्रप्रकाशात अनुभवात..
प्रेमाची अशी,
एखादी रात्र कविचीही असते!

वयात आलेल्या,
अन लग्न जुळत नसलेल्या,
पोरीच्या काळाजीपायी,
झरोक्यातून येणाऱ्या चंद्रप्रकाशात-
शून्यात हरवलेला बाप रात्री जागत असतो..
त्याच बापाची तुटत असलेली,
एक-एक क्षणाची आस जोडत असतो..
तेव्हाच एखादा कवी-
त्याचीच काळजी स्वतःत जपणारी,
ती एखादी रात्र कविचीही असते!

मागच्या बागेतल्या आंब्याच्या झाडावरचा-
रातकिड्यांचा आवाज !
इतक्या वर्षानंतरही चर्रर्रर् करतो-तिच्या हृदयात..
पहिल्यांदा या वृद्धाश्रमात सोडून गेलेला मुलगा,
आजपर्यंत एकदाही भेटीला आला नाही..
त्या आठवणीत आपले अश्रू,
एक आई शांततेत गाळत असते..
तेव्हा तीची ममता,
कागदावर उतरवायला सरसावला असतो-तो कवी!
ती रात्र-
त्या कविचीही तेवढीच असते ..!!

'माझं प्रेम नाही तुझ्यावर,
आपलं लग्न नाही होऊ शकत',
तो सरळ तोंडावर म्हणून निघून जातो..
किती सरळ सोपं असतं त्याला,
दिलेलं सातजन्माच वचन तोडून निघून जाणं..
तिचं तीळ-तीळ तूटणार मन,
रात्रीच्या अंधारात स्वतःच्या कवितेत,
जपत असतो एक कवी..!!
त्या विरहणी एवढीच,
ती रात्र कविचीही तेवढीच असते!

खिडकीतून दिसणाऱ्या रस्त्यावरच्या दिव्यातून,
कवी भरकटत रात्र जागतो!
खोलीचा चालू असलेला दिवा-
गुरखा,
"तिथला वेडा!
काही तरी बरवडत असेल कागदावर..",म्हणत निघून जातो..
त्यानी वेडा म्हटलं की,
कवी जिवंत होतो..
रात्र जागृत होते!
बस्स् ती तशीच रात्र,
वेडावलेली एखादी रात्र कविचीही असते..!

...वैष्णवी..
#आणि_वादळ_आले