Tuesday 13 November 2018

चार भिंती आणि आडवी रेषा



आजपासून काकडाआरती नाही..

दिंडी घरासमोर यायच्या आधी,
बायकांची रांगोळी काढायची धडपड नाही..
काल दिवसभर तोडलेला शेतमाल,
बाजारात नेण्याची शेतकऱ्यांची लगबग नाही..

अंगणात सडा टाकतानाचा, आईच्या
हातातील बांगड्याचा आवाज नाही..
कुईईSSS आवाज करत बाजूच्या,
खोलीत वाजणारा रेडिओ नाही...

कारण इथे, घरच नाही..!!

फक्त - चार भिंती आणि आडवी रेषा...!!



...वैष्णवी..
....एक सावली  

   
 

Sunday 11 November 2018

समीक्षक..!!

कवितेतले
              यमक,
               विषय-विषयांतर,
               शब्द-भाषांतर..!

               अर्थ-निरर्थक,
               चुकलेले शिर्षक..!
अगदी
               ऱ्हस्व, दीर्घही..!

              बकवास पासून
              नतमस्तक पर्यंत..!!

               बिलकुल नाही ते वाह..!!

तसच
  
              गोंधळलेल्या भावनेचा,
              तोडलेल्या घराचा,
              बदललेल्या नात्याचाही.. !!
तुला जे सांगायचं आहे
त्याची वेळ पहावी नसती लागली..!

कवितेसोबत,
कवियित्रीच्या आयुष्याचंही
तुला बनता आलं असतं का.. ?
                  --एक समीक्षक..!!





 
 
.....वैष्णवी....
...एक सावली    


     
 

Wednesday 31 October 2018

....हरवलेली मी..!! ....उडालेला तू..!!

एकदा उडून बघतो का.. ?
........माझ्याशिवाय..!!!

नवीन सापडेल काहीतरी,
चांगलं अजून... कदाचित

असं समज मी हरवली आहे..  
.... गर्दीत..!! 
आणि तू पोहचू शकणार नाही,
त्या रस्त्याला लागली आहे..  

काही वर्षात विसर पडेल तुला,
 ....माझा..!!
नंतर लक्षातही राहणार नाही,
आपल्या दुराव्याची कारणे..!!  

एका निवांत संध्याकाळी,
घरातली वीज गेलेली असेल..!!
आणि बॅक-अप असूनही,
अंधार करून तू बसला असशील..!!

तेव्हा
... उतारवयात..!!
तुला खूप आठवण येईल माझी..!!

आणि तेव्हा तू,
याच कवितेत शोधशील
ती गर्दी,
....हरवलेली मी..!!
....उडालेला तू..!! 





...वैष्णवी.. 
#एक_सावली 
#वादळानंतरची_शांतता 

Saturday 30 June 2018

कोरडा!

पाऊस आला की,
सुचते न कविता
आठवतो तुही आणि
ती भेटही..!

तेव्हा मोडलेली छत्री सांभाळत
तुझ्यापर्यंत पोहचली होती
न भिजता कशीतरी
तुही आला होतास
तसाच कोरडा!
का भेटलो?
काय बोललो?
पडद्याआड सर्व
पण भिजलं होतं भेटीत मन 
आणि परतताना शरीरही...
मोडलेल्या छत्रीमध्ये तेवढं सामर्थ्य
नसावं कदाचित..
दुराव्याचा मारा सहन करायची..!!

मला फक्त तेवढंच आठवतं,
त्या पावसाळ्यात कविता नाही
पण मी भिजली होती..
आणि तेव्हा पासून

पाऊस आला की,
सुचते न कविता
आठवतो तुही आणि
ती भेटही..!


एक सावली 

"पण, किती दिवस.. ??"

कित्येकदा बोलते तुझ्याशी
मनातल्या मनात घोकत सर्व..
तुझं ताडताड निघून जाणं,
आणि
आपला असा अबोला
कोणता प्रश्न सुटणार आहे बरं?
फक्त दुरावा वाढतोय..!!
किती सरळ आहे..

तुला अभिमान वाटायला हवा खरं तर..!!!
स्वतःच अस्तित्व,
          मान,
          सन्मान शाबूत ठेवण्याचा अट्टहास-
वारसा हक्काने जपते आहे मी..!!
या सर्वात,
तू मला नेहमीसाठी
हरवून बसू नये फक्त..!!
कारण,
तू तोडून निघून गेलास रे-
मी तात्कळत बसली आहे इथे-
डोळ्यातले अश्रू गळू नये म्हणून,
खंबीरतेचा आव आणत--
"पण, किती दिवस.. ??" 




एक सावली 

Thursday 24 May 2018

उडणाऱ्याने

संभ्रम आहे,
तुला जाऊ देऊ की
पकडून ठेवू - घट्ट..!!

मुठीतली रेती सरकून जाते
तसे, आपल्यातले क्षण..!!
माझ्या पापाचा भागीदार,
होतो आहे तुही..!!
याच,
उपकारखाली दबत आहे मी..!!

उडणाऱ्याने चालू नये म्हणे,
तुझे पंख पकडून तर ठेवले नाही ना मी..??

..एक सावली...
#एका_सावलीच्या_शोधात

Saturday 12 May 2018

निर्मनुष्य


डोळ्यात पाणी येतं नं
तेव्हा तू आठवते अगं मला!
माझ्या ओरबडलेल्या भावनेला
अश्रू सोबत तुझ्याच जवळ व्यक्त होता येतं..

निर्मनुष्य आयुष्यात -
तूच नाही का माझ्यातला माणूस जिवंत ठेवलास!
नाही तर माणसात राहून,
माणूसपण हरवल्याच्या बातम्या
रोज येतातच की वृत्तपत्रात!

आपल बरं आहे दोघींचं,
बंदीस्त वेदनेंन विव्हळण!!
एकमेकींना कवटाळून,
दुःख अर्ध-अर्ध वाटून घेणं!!
बंद दरवाज्यामागे-
जिवंतपणी मरणं, आणि
असंच मरताना जगणं-अगदी रोज..!!

जी भीती होती,
"आयुष्यात एकट पडायची"
तुझ्या सहवासान तेवढी गेली..
तुझ्या सोबत शक्य तेवढे शब्द
ओळीत मांडत...
गालावर ओघळलेले अश्रू-
सुकून जातात तुझ्या अस्तित्वासहीत..

आणि माझ्यातलाही निर्मनुष्य जागा होतो
राहिलेले जगाचे व्यवहार आटोपायला..!!

...एक सावली..

Friday 4 May 2018

गुलाब

लहानपणी वेडं-वाकडं शिकलेली गुलाब 
कागदावर रेघाटताना,
तुझी आठवण आली अगं..!!

खुप गोष्टी तुला सांगायच्या असताना 
तुझा आवाज ऐकल्यावर, 
मी चिडते- सर्व जगाचा राग,
तुझ्यावर काढायचा असतो फक्त..!!

या भावनेच्या राजकारणात 
तुझं-माझं नातं तुटलं का..??
कधीच सावरू न शकणारं 
उध्वस्त झालं आहे का..??

सर्व जगाविरुद्ध लढताना-
तुही का माझ्या पाठीशी नाही..??
तू असतानाही,
परकी झाली आहे मी..!!

अंगणात रेखाटलेल्या गुलाबाला 
दोन दिवसनंतर मिटवतात.. तशीच..!!



...एक सावली.. 

Monday 12 March 2018

स्वतंत्र ओळख

जागतिक महिला दिन सर्वत्र खूप जोरात, अगदी नाचत-गाजत साजरा झाला.  वृत्तपत्रे उत्साहाने प्रोत्साहने भरभरून वाहत होती.  शुभेच्छांचे वर्षावही अगदी दिवसभर चालू होते.  त्यादिवशी बऱ्याच ठिकाणी महिलांनी सेवा, संस्था वगैरे आपल्या क्षमतेने यशस्वीरित्या चालवल्या.  सर्वीकडे महिलांनी स्वतःचे अस्तित्व सिद्ध केल्याचा गाजावाजा अगदी दोन दिवस चालला.  

पण का? आजच्या शतकातही महिलेला स्वतःचे अस्तित्व का सिद्ध करावे लागत ?  आपली मानसिकता आजही का स्त्री दुर्बल आहे आणि तिने तिची क्षमता दाखवावी या विचारात गुदमरलेली आहे?  आजही यशस्वीपणे काम करताना तिच्या क्षमतेवर संशय का घेतल्या जातो ? आजही आपण का मान्य करत नाही कि पुरुषांच्या सहाय्याने ना जगता स्त्री सर्वस्वी स्वतंत्र असू शकते ?
तिची काम करायची पद्धत वेगळी; पुरुषांपेक्षा हटके असू शकते, हे स्वीकारल्या का जात नाही ? इतक्या स्त्रियांच्या सिद्धीकरणानंतरही तीची तुलना का केली जाते?

आपल्या संस्कृतीला अगदी पूर्वी पासून पुरुषप्रधान मानले गेले आहे.  मुलगी जन्मापासून पुरुषावर कशी अवलंबून ठेवली याचे संस्कार मुलीवर अगदी लहानपानापासून केलेले असतात.  आपल्या वर्तुळाच्या बाहेर जाऊन तिने घेतलेला निर्णय थोपवण्याची सोयही आपल्याच या संस्कारात आहे.  मला माहित आहे फिनिक्स पक्ष्यासारखा या जळलेल्या संस्कारातून उडान घेतलेल्या महिलांची भरपूर उदाहरणे आहेत.  ज्यांच्या आशा-आकांक्षा उंच आहेत त्यांना संस्कृती संस्कार वगैरे बांधून ठेऊ शकत नाही.  पण माझा प्रश्न हा आहे कि ह्या गोष्टी महिलेच्या प्रगतीच्या आडमार्गात येतातच का ?

कधी पुरुषांना एकलत का महिलेच्या विरोधात, समाजाच्या विरोधात,  घराच्या विरोधात जाऊन निर्णय घ्यावा लागतो ते?  नाही कधीच नाही !  पुरुष जी म्हणेल तीच पूर्व दिशा समजली जाते ! महिलांच्या यशोगाथा वाचताना हे नाही का हो खटकत ? तिला प्रत्येकदा कोणाच्या ना कोणाच्या विरोधात जाऊन स्वतःचा मार्ग निर्माण करावा लागतो, असे का ? तिच्यासाठी अडथळे निर्माण करण्याची मानसिकता आपल्या समाजातून मोडून काढण्याची गरज आहे. महिलांना तुमच्या आधाराची गरज नाही, तिचे अस्तित्व खूप सुंदर आणि स्वतंत्र आहे  हि भावना पुरुषप्रधान संस्कृतीत रुजायला अजून किती शतके उलटणार आहे ?

जागतिक महिला दिवस बऱ्याच यशस्वी महिलांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारा दिवस होता.  त्यांच्या यशाच्या गाथा वाचून मी महिला असल्याचा अभिमानच वाटला. पण त्यांच्या यशाची पायवाट आणि त्यात असलेले अडथळे वाचून मन कासावीस झाले.  छोट्या छोट्या गोष्टींसाठी तिला भांडून गरज नसताना स्वतःची समर्थता सिद्ध करावी लागते हेच चुकीचा आहे.  जागतिक व राष्ट्रीय स्थरावर महिलांच्या यशाचा आढावा घेताना खेड्यातील स्त्रियांची स्थिती दुर्लक्षित केली जाते.  खेड्या-पाड्यात स्त्री सक्षमीकरणाच्या फक्त चर्चाच आहे.  आजही तिथे निम्म्यापेक्षा जास्त स्त्रिया चूल-मूल यातच अडकल्या आहे.  गावातील पुरुषांसाठी महिला दिवस म्हणजे फॅशन आहे फक्तं.! अंधाऱ्या रात्री बायकोवर हात उगारून, दिवसा मी किती तिचा आदर करतो याचा मुखवटा घालून समाजाला दाखवायची मानसिकता खेड्यातील सुशिक्षित वर्गात आजही दिसून येते.  आजही महिला पुरुषरुपी मायाजाळेत फसली आहे.  कितीही दारू पिऊन मारहाण करणारा नवरा असला तरी तो परमेश्वरच, हा विचार कितीतरी महिलांच्या मनात घर करून बसला आहे.  आणि हेच अविचारी अमानवी पुरुष मी किती स्त्रीचा आदर करतो म्हणत महिला सशक्तीकरणाचे भाषण देत आहे.  

या पुरुषप्रधान संस्कृतीतून बाहेर पडण्यासाठी स्त्रियांनीच स्वतःला ओळखण्याची गरज आहे.  स्वतःच्या वर्तुळाबाहेर येऊन पुरुष वेगळा आणि मी स्त्री वेगळी हे समजायची आवश्यकता आहे.  जागतिक महिला दिवस हि एक संधी आहे, या दोघांमधली तुलना थांबवून दोघांनाही स्वतंत्रपणे ओळखण्याची !


... वैष्णवी.. 

Tuesday 23 January 2018

घाव

तुझ्या अंगणातल्या कोपऱ्यात 
एक कुंदाच्या फुलाचं झाडं होत.!
आठवते का तुला..?
माझ्या आठवणी अजूनही तश्याच-
सकाळी अंगणातील फुलं गोळ्या करण्याची धडपड,
त्याच फुलांच्या सुगंधात मी त्या झाडाचं फुलं बनली..    

तुझ्या समाजानी काय केलं सांगू?
ते झाड तोडून टाकलं..कुऱ्हाडीनी..!! 
आणि तू,
हसत हसत स्विकारलाही तो घाव..?

तुझी हाडं,
जी मी वाकवली असा आरोप तू करतोय ना..
ती त्या कुऱ्हाडींनी वाकवली.. मी नाही..!!

मी फक्त वाकलेल्या तुला आधार देऊ शकत नाही..!!
किंवा अशे म्हण कधी देणारही नाही..!!-इच्छाच नाही..

कारण,
मीही शेवटी,
त्या कुंदाचं-एक फुलं ..!  
तुला भार होऊ नये म्हणून झाडावरून गळून पडलेलं..!!


...वैष्णवी.. 
#एक_सावली    

Wednesday 17 January 2018

बंद दरवाज्यामागे

आधुनिकतेचा पुळका चढलेल्या पार्टीत 
कुजलेल्या विचारांमागे,
लपवत आहे हा समाज,
त्याची फाटलेली लक्तरे..!
जसा बंद दरवाज्यामागे 
तू लपवला आहे, 
तुझ्यातला- 
अमानवी मानव..!!


...वैष्णवी.. 
#एक_सावली   

Thursday 11 January 2018

तुझ्याचसाठी..

आजची कविता,
गर्दीत मागे बसलेल्या तुझ्यासाठी..
कोण..? कुठे..? म्हणत-
मागे वळून पाहणाऱ्या तुझ्याचसाठी...

शब्द-शब्द जागवून माझ्यातला
स्वतः मध्ये सामावण्यासाठी..
अन तरंगणाऱ्या भावनांना
आहे तस समजण्यासाठी...

मुखवटा काढून माझा
कुरुपते सहीत स्वीकारण्यासाठी..
नकळत माझं 'मी'पण
तुझ्यात जपण्यासाठी...

आजची कविता
माझ्यातल्या तुझ्यासाठी..
आजची कविता
फक्त तुझ्याचसाठी...


...वैष्णवी..
#एक_सावली

Wednesday 10 January 2018

ध्येय..?

तीचा फोन येतो!
स्वप्न, ध्येय, यश वैगेरे-
आठवून दिले जातात...
पण-
उडायला सांगून
बांधून ठेवलेल्या पंखांच कसं..?
जगण्याच्या धडपडीतच
विस्कटलेल्या जगण्याचं कसं..?
आतमध्ये तुटलेल्या
माणसाचं कसं..?
ध्येयाकडे धावतानाच्या स्पर्धेत
सुटलेल्या हातांच कसं..?
त्याही-पेक्षा
जिवंतपणीच मेलेल्या माझ्यातल्या
'मी'च कसं..?

....वैष्णवी...
#एक_सावली

Sunday 7 January 2018

नाळ

खरं तर,
तू माझ्या जवळ येऊन रडावं
असं काहीही झालेलं नव्हतं.!
तुला विळखा घातलेल्या सापाची,
ताकद तेवढी समजली.!
खूप कीव येते अरे..!!
तुझ्या पडलेल्या विचारांची!!
तुझी ही बाजू समजण्यासाठी-
माझी जन्माची नाळ तोडावी लागली!!
माझ्या-तुझ्या नात्यापेक्षा-
तुझ्यात उतरलेलं समाजातील जातीचं, 
विष जास्त प्रभावी ठरलं..!
खंत वाटते-
तुझ्या मगरीच्या अश्रूमुळे,
क्षणासाठी मीही ढळली... 
पण, रक्ताचा राजकारणी तू.. 
माझ्या भावनेच जातकारण केलंस.... 
आणि,
क्षणार्धात मी होत्याची नव्हती झाली..!
खरं सांगू?
तू माझ्या जवळ येऊन रडावं
असं काहीही झालेलं नव्हतं.!

...वैष्णवी..