Friday 18 September 2015

रिकामा देव्हारा

"रिकामा देव्हारा बघितला आहे कधी..?"
काय झाले..??
हो..हो..तुम्हालाच विचारते आहे मी.!!
काय बघितला आहे का रिकामा देव्हारा..?

मी बघितला काल..
दूरून मंदीर छान ताज्या फुलांनी (सकाळीच तोडले असतील) सजवले होते,
म्हटल बघाव काय म्हणतो आतला देव...

बाहेर काही वृद्ध भजनही म्हणत होती,
एक थकला बिचारा कुत्रा मान टाकून झोपलाही होता तिथेच..
विचित्र सर्व प्रकार भासत जरी होता..
तरी देव तिथला पाहायचा मोह फार दाटला होता..

मनाची ओढ पायात उतरली होती,
सुगंध तिथला आणखीच भर वाढवीत होता,
कुठला देव असा पुजला जात होता,
उत्सुकता वाढीस लागली होती..!!

आणि काय..??
तो देव्हारा रिकामा होता..!!

एक केस विस्कटलेली बाई (वेडी असावी हा माझा समज),
 बरळत होती-
मुर्तीत नाही रे तू..
इथेच आहेस...!!
अनंतात..
उद्या इथेही दगड येईल एक,
पुजारीही असेलच सोबत..!!
तेव्हा मला आत येऊ दिले जाणार नाही,
कुत्राही असा शांत झोपेल कसा..!!
ही भजने बेसुरी वाटतील..

(आता माझ्या डोक्यात शंका..
कोण वेड.? मी की ती...?)

...वैष्णवी..