Sunday 31 March 2013

भ्रम


पानगळीच्या पानातही
फुलपाखरांनी नाचावं-
वाऱ्यासारखं हसत
सख्या तू यावं..!

साचलेल्या डबक्यात
कागदाच्या होडीने बुडावं-
विचारा  विचारात
पावसानही कोसळाव..!

तहानलेल्याला मृगजळासारख
तुझ्या चाहूलीनी झुरावावं-
भ्रमातच  का होईना
पण सख्यासाठी सजाव...!

भ्रम -
हा भ्रमच..!!
माझ्या-तुझ्या मिलनाचा..!!
दाराच्या काडीच्या वाजण्याचा..!!
उंबरठ्यात पाय थांबल्याचा..!!
झारोक्यानी नजर बांधल्याचा..!!
तुझ्यात श्वास अडकल्याचा..!!

Wednesday 20 March 2013

सर्वच


सहसा जे बोलत नाही;
आज तेच मी बोलली ग..!!


काळाच दुख: मनात कोंडलेल
अश्रुनी आज धुतलं ग..!!

सखे,
 गोंधळले माझे शब्द,
गंडल्या माझ्या वाटा..!!

घसरत चाललेल्या माझ्या भावना,
बदलत चाललेले माझे ध्येय..!!

अंधुक अंधुक दिसतात ग..!!!

जे होऊ नये तेच सर्व,
जे बोलू नये तेच सर्व,
जे ऐकू नये तेच सर्व,
जे लिहू नये तेच सर्व..!!

अगदी सर्वच..!!

Saturday 16 March 2013

मातीचा गंध

"माझी तहान भागाव" असा आक्रांत 
उर फोडून जमिनींनी मांडल्यानंतर,

जिवंत पणातही,मेल्याहून मेल्याची 
भावना देणाऱ्या दुष्काळानंतर,

निर्भीड मनातही चर्रर्र करणाऱ्या 
ओसाड आणि कोरड्या ॠतुनंतर,

वाहनांचा पूर आणि कारखान्यांच्या धुरात 
जीव गुदमरल्यानंतर,

प्रत्येक बिकट परिस्थितीत 
संयमाची परीक्षा घेतल्यानंतर,

निराशा आणि अपयशात-
खचत चाललेल्या जीवनाला,
जगण्याची नवी उमेद देणारा..!!

पहिला वाहिला-
दूर डोंगरावर येउन गेलेल्या,
हलक्या सरींमुळे-
सर्वत्र,
मंद-मंद दरवळलेला-
"मातीचा गंध..!!"

Wednesday 6 March 2013

जखमी वाघीण

काळाच्या प्रत्येक आघातावर;
सडेतोड उत्तर देताना-

वेदनेच्या वावटळात
घुसळत-घुसळत चाललेली..!! 

त्वेषाच्या ज्वाळेत
जळत-उजळत असलेली..!!

अहंकारी शब्दाच्या 
असंख्य वारांनी दुखावलेली..!!

नियतीचा हरएक डाव 
खिलाडी वृत्तीने खेळणारी..!!

बंधन झुगारून 
स्वप्न पाहायचं धाडस करणारी..!!

आजही जिद्दीने-
नैराश्याची वलये तोडून 
"जिंकणार" "जिंकणार" अशी
चवताळून ओरडणारी "जखमी वाघीण"--मी..!!! 

Saturday 2 March 2013

"ऋणी" केलस तू..


मी एक चौकोन होती.!
स्वतःच्याच विचारात
बंदिस्त..!
त्या चार रेषांच्या
बाहेर पुन्हा पाय ठेवुन
जगायला शिकवलसं तू..!

स्वतःच्याच पिंजर्‍यात
अडकलेलं पाखरु होती मी!
त्या भावुक पिंजर्‍याच्या
भिंती तोडुन,
पुन्हा
उडणं शिकवलसं तू..!

त्या भूतकाळांच्या बेड्यांमध्ये
बंदिस्त कैदी होती मी..!
त्या मनांच्या जखमेवर
मायेची फुंकर देउन,
पुन्हा मनापासून-
हसणं शिकवलसं तू..!

या स्वार्थी जगात
रंग उडालेलं फुलपाखरु होती मी..!
नवीन अगदी नाजुक
आयुष्याचे रंग देउन,
पुन्हा फुलामागे उडायचे पंख दिले तू..!


स्वतःच्याच स्वप्नात हरवलेली-
एक नासमज पाकळी होती मी..
आज असच दवांसारखं
नकळत येउन,
मला अस्तित्व दिलस तू..!

अधिर होउन जगताना
एक
अस्पष्ट धूर होती मी..!
त्यातही
स्वतःवर विश्वास ठेव सांगुन
धीर दिलास तू..!

स्वतः शब्द होउन,
कवितेत उतरताना..
निर्जिव होती मी..!
त्या कवितेला अर्थ देउन
जिंवत केलस तू..!

मला नविन स्वप्न देउन,
ओठांवर हास्य देउन
डोळ्यात इन्द्रधनुष्याचे रंग देउन,
पुन्हा जुना आत्मविश्वास देउन,
माझ्या कवितांना अर्थ देउन,
"ऋणी" केलस तू..!

बेईमान


विशेष असा फरक 
तसा तर नाही..!!
फ़क़्त-
आता माझी बाजू पडकी नसेल...!!
रात्र नक्कीच-
      तशींच,
खिडकीत संपेल..!!

पण-
तू मात्र नेहमीसारखा 
मायाळू-
दयाळू,
राहणार नाही..!!

इथे माझे शब्द 
आणि 
शब्दाचे अर्थ बदलतील..!!
तुला बेईमान ठरवताना-
संकोच तर सोड..!!
मी जराही कचरणार नाही..!!!