Sunday 19 November 2017

अलगद

माहित आहे.? आमच्या गावाकडे न दुसऱ्या बाईसोबत (बायको सोडून) बाहेर फिरणाऱ्या माणसाला लफंगा / लोफर म्हणतात आणि नवरासोडून दुसऱ्या पुरुषासोबत संबंध प्रस्थापित करणाऱ्या स्त्रीला कुलीटिनी म्हणतात. बहुदा, आज मी खूप लोकांच्या जखमेवर हात लावणार आहे..

विषयाची सुरुवात कुठे झाली ते आधी सांगते. कालपरवा माझ्या वडिलांशी होत असलेल्या संवादाचा शेवट-
मी, "मला लग्न नाही म्हणजे नाहीच करायचं, विषय इथेच संपला!"
माझा बाप, "का पण ?"
बस.! माझ्या बापाचा "का पण ?" डोक्यात चालेल्या गोंधळाला पूर्ण विराम द्यायला पुरेसा होता.

" लग्न " हा शब्द मला व्यक्तिशः खूप पवित्र वाटतो. उच्चारुन पहा एकदा " लग्न ". अगदीच " अलगद " वेगळीच गुदगुल्या वगैरे देणारी भावना शब्दातच दडली आहे. भारतीय संस्कृतीमध्ये लग्न म्हणजे फक्त विधी-सोहळा नाही. लग्न म्हणजे भावना आहे. समोरच्या व्यक्तीला आपल्या आयुष्यातील अर्धांगिनी वा सहसोबती - नवरा बनवण्याची भावना, प्रत्येक छोट्यातील-छोटी सुख-दुःखे सोबत अनुभवने म्हणजेच लग्न. मला वाटतं नवरा-बायको म्हणजे नातं नसतं,लग्न म्हणजे नातं असतं... 

खूप जुनाट विचार वाटतो आहे का?  कारण अश्या लग्नात बंधने जाणवतात. आजकाल ट्रेंड मध्ये असलेली स्पेस (मोकळीक)नसते, one night stand  वगैरे संकल्पनाच नसते. फक्त ती किंवा तो आणि तुम्ही..! काळानुसार लग्नाची व्याख्या बदलली आणि सोहळ्यासहित होणाऱ्या प्रथा आता show off झाल्यात; बरं इथपर्यंत सर्व ठीक आहे, पण " लग्न " या नात्यातला अर्थ बदलला. आधी जी पवित्रता म्हणून बघितल्या जायचं तो दृष्टिकोन जुनाट म्हणून गणल्या जातो.आता लग्न म्हणजे भावनिक कमी आणि प्रॅक्टिकल फार झालंय.

लग्नाच्या १०-१२ वर्षानंतर तुम्हाला एक मुल असतानाही तुम्ही नवऱ्या व्यतिरिक्त दुसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित कशे होऊ शकता?  फार विचार करण्यासारखी बाब आहे असं मला सारखं वाटायचं, पण तीच स्त्री किंवा तोच पुरुष, 'अरे आता हे कॉमन आहे सर्वीकडे असंच चालतं' किंवा 'क्षणिक होतं ते -प्रवाहात वाहून गेलो ', अशी उत्तरे देतात तेव्हा रक्त असं फार उसळून येतं.

जेव्हा तुम्ही लग्नात एकमेकांशी बांधले जाता ना; तेव्हा नाही तुमचं मन विचलित होत, नाही तुम्हाला कुठला प्रवाह वाहून घेऊन जात..!  कारण जर लग्न तुम्हाला खरंच समजले असेल तर ते तुम्हाला "अलगद" जपतं.. अगदी तुमचे बाहेरचे प्रकरण माहित असतानाही तुम्हाला कुशीत घेऊन डोळ्यातील दाटलेले पाणी ती "अलगद" लपवते ना तसं.. 


...वैष्णवी..
#एकसावली #जगण्याचीधडपड 


No comments:

Post a Comment