Sunday 9 August 2015

बदल

"आपली पुन्हा भेट होईल, तेव्हा असाच ताटकळत उभा असशील ना रे माझ्यासाठी..??", ती भावनीक झाली होती.. "हा शेवटचा निरोप नाहीये तुझा-माझा! मी येईल परत... एक शेवटचा अलविदा म्हणायला..", ती जाताना बोलली होती तस..! आणि म्हणालीही होती, " बदलू नकोस हं.. असाच फुललेला सुगंधीच रहा..!!"

त्यानी उत्तर दिलच नाही तेव्हा.. तसाच तटस्थ उभा होता..

आज परत आली ती.. राहीलेला एक शेवटचा निरोप द्यायला.. पण.. तेव्हा तिच भानच नव्हत..तिथेच उभ्या असलेल्या त्याच्याकडे..
त्याला ओलांडून पुढे गेली आणि नकळत मागे वळून बघितल्या गेल.. तेव्हा तो म्हणाला, " मी तोच आहे.. थोड वय वाढल असेल फक्त..! पण तू गं.. तीच आहेस का..? मला सोडून गेलेली.."

तेव्हा आजुबाजुला तिनी बघितल,आता डोळसपणे.. खरच सर्व तसच होत..ती सोडून..बदलली होती ती.. आणि बदल होणारच होता, तिच्या कळत-नकळत.. निसर्गाचा नियमच ना तो... फक्त तो बदल तिच्या लक्षात आत्ता आला, त्यानी बोलून दाखवल्यावर...

आज.. तिच्याजवळ उत्तर नव्हते..पण त्याच्याकडे बघून ती फक्त हेच म्हणाली,"परतून चांगलच वाटल-पारिजातका..!"

तिच्या ह्या बदललेल्या आवेगाकडे बघून तोही जास्तच फुलला-एक बदल म्हणून..!