Saturday 20 September 2014

गच्च ओल्या कागदावर


समोरासमोर बसून आपण
उलगडून टाकूयात मने
काय म्हणतोस? पलटवायची
काही भूतकाळातील पाने

फार तर काय?
भावनांचा कल्लोळ माजेल..
आणि जास्तच झालं तर,
एखादी कविता भिजेल...

नंतर परतून पुन्हा
भेटीची समीक्षा करु!
उगाच बोललोत असे
आणिक हलकेच हसू!

तू तर विसरुन सर्व
स्वतंत्र जगशील लवकरच
मी मात्र असेल
तुझ्या डोळ्यात अडकूनच

काळ न अडखळता
पुढे सरकतो आहे
गती हा निसर्गाचा
तसाही नियमच आहे

आवेगात बोललेलो
पडद्या आड सर्व
तोस्तर गळूनही पडतो
प्रेमाचा गर्व

प्रेम होते ऐकमेकांवर
हे कोडेच असू नये म्हणून
उलगडायचे शब्दांचे पाश
भेटलो तेव्हा जाणून (मुद्दाम होऊन)

शांतता तेव्हा बोलकी
क्षणही थबकला होता
काय बोलणार तू?
ह्रृदयाचा ठोका चुकला होता

डोळ्यात पाणी, ओठांवर शब्द
काय तेव्हाचे भेटणे होते..?
गच्च ओल्या कागदावर
आजही तेच लिहिणे होते..!