Saturday 15 September 2012

काळी वर्तुळे

पाऊस कोसळून-
थांबल्यानंतरच्या काळोखात,
समोरच्या दर्पणात,
डोळ्याखाली गडद झालेली वर्तुळे
स्पष्ट दिसली..!!
आणि
बाकी  तसा फारसा फरक दिसतही नव्हता
पांढऱ्या कपाळाव्यतिरिक्त..!!

भिंतीवर चुकचुकनाऱ्या पालीने
कॅलेंडर वर लक्ष वेधलं..
आज तारीख-

हे देवा..!
एक वर्ष उलटलं,
तुझ्या प्रेतावर कोसळून,
नको जाउस...नको जाउस...
म्हणायला..!!

त्या नंतर-
खरं तर-
फार काही बदललं  नाही,
नेहमी सारखाच पावसानंतर
काळोख दाटला..
फक्त झालीत
डोळ्याखालची काळी वर्तुळे-
समजुतदार ..!

Monday 10 September 2012

वर्तुळ

Thursday 6 September 2012

आणि तो उत्तर देतो...


प्रिय सखीस,
         धो-धो कोसळणाऱ्या पावसाचा आज मलाही मोह आवरता आला नाही,त्यातच चिंब भिजून आलो आणि तुझं ओलं पत्र हाती
आलं! त्या पत्रातही तुझे थरथरणारे हात, डोळ्यातील अश्रू आणि विषयाच्याही पलीकडे बोलणारी तू, तू अगदी तशीच भेटली मला..!
       माझ्या शांततेवर फारच चिडलेली  दिसतेस! मी बोलत नाही कारण तुला अखंड बोलत पाहण मला आवडत..! बोलताना
तुझ्या चेहऱ्यावरचा भाव मला नैसर्गिक वाटतो! बोलता बोलता चेहऱ्यावरची लट जितक्या सहजतेने मागे सारते, जणू वाऱ्यानी
झाडाच्या पाणाशी अलगद खेळावं! तुझे निरंतर बोलणारे ओठ पाण्यावरचे तरंग वाटतात..!तुझ्या बोलण्यातच मी इतका मग्न होतो कि,
माझे शब्द अडगळीत आपसूकच जाऊन पडतात!
    तुझ्या बोलण्यामागाचे हेतू-कारण काहीही असू देत, पण या पावसाच्या अखंड आठवणी आणि त्याला कोसळताना पहान हे
अगदी तसाच अनुभवतो जस तुझं बोलणं..!!
   खरं सांगू, तू अशीच कोसळत रहा निरंतर.! माझी शांतता समजूही नकोस आणि  वाचूही नकोस! जी मादकता तुला माझ्या शांततेत
सापडते न - तीच मला तुझ्या बोलण्यात सापडते,आणि त्याची धुंदी इतकी प्रचंड असते कि, मी हि मदहोश होऊन बोलता होतो,आणि
 नेमकी समोर तू नसतेस..!
     हा असा आपल्यातला दुरावा आणि विरह दिवसागणिक वाढतच जाईल..! कारण- कारण सांगतोय मी आज-
कारण आपण रस्त्याचे दोन  काठ आहोत.! कदाचित आपला अंतिम मुक्काम एक असेलही पण मिलन कसच शक्य नाही!
   जोपर्यंत सोबत प्रवास करायचा विधिलिखित आहे,तोपर्यंत तू अशीच रहा-बोलकी बाहुली, आणि चुकूनही सिद्ध करू नकोस
माझ आवडण-त्याची गरज नाही!फक्त मी कधीच न बोललेल्या शब्दाना डोळ्यांनी तेवढं समजून घे! मी  डोळ्यांनी बोलतो शब्दांनी
नाही!आणि डोळ्यांची भाषा तुला चांगलीच समजते!
     तुझे मुके शब्द समजण्यासाठी,मी तुझ्या जवळ नाही याची खंत वाटते!

                                                                                                तुझा सखा..!

जेव्हा ती लिहिते..


प्रिय सख्यास..!!
     
            बाहेर धो-धो पाऊस कोसळत आहे, आणि मी नेहमीसारखी तुझ्याशी गप्पा मारायला बसली आहे.
तुझी माझ्याशी बोलायची इच्छा आहे कि नाही हेही न पाहता! आज तुझ्याशी काय बोलू? कारण गेली
कित्येक दिवस फक्त मीच शब्दांचे रास रचत आहे.!आणि तू मात्र "तू कोण..?" या अविर्भावात मला
दूर्लक्षित  करतोस,पण तुझं असं तोडणार वागण काही  खर नाही हे समजण्याइतकी मी काहि हि नाही!
     तुझं माझ्याशी न बोलणं हे पाण्याच्या बुडबुड्यासारख वाटत, आणि तुझी अशी दूर्लक्षित करत असलेली
 वागणूक मला दुखावते,माझ्यातच रममाण असणारी छोटी मुलगी रुसून बसते! तुझ्या मनात कदाचित फार
निर्मळ विचार असतील,मला दूर्लक्षित  करण तुझा हेतूही नसेल! पण खरच मी फार लहान आहे,माझे निर्णय तर सोड माझे हट्टही मी स्वत: पूर्ण करू शकत नाही-म्हणून तुझ्याशी बोलते,निरंतर विषयाच्याही पलीकडे!
   आयुष्यात आपल्याच अहंकारान आपणच एक ठणकणारी गाठ तयार करतो. ती ठणकू लागली कि आपणच
तक्रार करू लागतो, आणि यातूनच अपेक्षांचा जन्म होतो आणि एखाद्या बेसावध क्षणी अपेक्षाभंग होतो आणि
मग होणाऱ्या जखमेला कुरवाळत बसण्याचा छंद आपल्याला लागून राहतो.
   हा छंद अर्थात वाईट सवय जडून पावसाच्या अखंड संवेदना आणि जखमा अंतरी सजवत बसू नये म्हणून मी बोलते!
   तुझ्याशी गप्पा मारताना तुझा मुकेपणा मला जास्त बोलका वाटतो,तू न बोलता म्हणजे खर तर बोलायला काहि
 नसते म्हणून असेल कदाचित! तू शांत  असतोस आणि मला शांतता वाचता येत नाही,समजत तर बिलकुलच नाही.पण- सकाळच्या धुंद करणाऱ्या धुक्यान्मधली मादकता तुझ्या अबोलपणामुळे  अनुभवता येते.
  तुझ्या न बोलण्यावरच मी एवढी बोलकी झाली म्हणून पुन्हा फक्त अबोल होऊ नको, कारण.....नको आज कारणमीमांसाच नको..!
तू न असाच राहा, नाही तर रुक्ष टी.सी. ला तिकीट दाखवावं तस मला तुझ्या मुकेपणाच आवडणं सिद्ध करायला लागू नये!
  पण तुझ्या अबोलपणाने दुरावा मात्र वाढतो..! तेवढिच एक गोष्ट न बोलताना खटकते  आणि मुक्या शब्दात  रुजते..!

                                                                                                                      तुझी सखी..:-)