Saturday 29 November 2014

गोष्ट तुझी-माझी

त्या रम्य संध्याकाळी
तुझे वाट पहाणे
सजताना माझ्याही
हृदयाचे धडधडणे

पहीलीच भेट तेव्हा
चेहर् यानी ओळखण्यासाठी
दोघातला अनोळखीपणा
थोडा कमी करण्यासाठी

कोण आधी बोलणार
हसली तेव्हा शांतता
अडखळले होते शब्द
मनातले विचार वाचता

डोळ्यांनी सुरवात केली
आपल्या नकळत बोलायला
हळूहळू नंतर मग
ओठही लागलेत वळायला

काय वाटेल समोरच्याला
राखून सर्व बोलणे होते
मनातल्या भावनांना
हसण्यात हळूच लपवणे होते

कॉफीच्या धुरासारखा
प्रत्येक क्षण सरकत होता
थांबावी वेळ इथेच
मनात विचार येत होता

अकस्मात वळणावर
भेटू पुन्हा कधी
ठरवून भेटायचा संसार
नको पुन्हा कधी

का बोलला असशील असे
आजही कोडे आहे
शब्द चुकलेत का बोलायला
प्रश्न हा भेडसावत आहे

शेवटच्या घोटासोबत
कॉफी संपली कपातली
पहीली ही भेट दोघांची
नाजूक वळणावर संपली

तू म्हणालास तसंच
अकस्मात एकदा भेटलो
तेव्हा आपण दोघंही
उत्सुकतेने बोललो

तेव्हा जे मनात
तेच डोळ्यात
आणि बोलतानाही
तेच शब्दात

आठवण आली तुझी
बोलली होती कवटाळून
विसरतच नाही तुला
बोलला मिठी गच्च करून

अनपेक्षित होता
असा आवेग भेटीतला
दुराव्यानी उलट
घट्ट बांधले दोघांना