Monday 16 December 2013

हास्य आणि हुंदके

दिसतात कुलूप लावूनी अधिक देखणे ते प्रसंग या  मनातले,
किती विस्तारात आठवते अजूनही मज जीवन त्या क्षणातले.

जसाच दृष्टीतल्या त्या नजरेचा भाग सैल झाला होता,
अधिक सुंदर दिसत गेले ते दृश्य माझ्या डोळ्यातले. 

न ते मोठे शब्द , न त्यांच्या अर्थाचा काही पत्ता होता,
वाऱ्यातही ती बाब कुठे , असे ते प्रेम या वयातले. 

कधी याचे मन तर कधी त्याचे मन होते, 
वाढतीस राहिले नेहमी हे हृदय माझ्या उरातले.

न चुकले माझे काही, न बरोबर त्यांचे काही होते,
हिशोबात या वाया गेले , न जाणे किती ठोके या जगण्यातले. 

खांद्यावर हाथ ठेवुनी त्यांच्या रस्ता चुकला होता, 
राहतात दूरच शोभूनी सगळे ते सल्ले माझ्या नात्यातले.

हाती धनुष्य असूनही, विचारांना मेनकेचा नाद होता,
ओढुनी न्यायचे मला नेहमी , ते जोर या मोहातले.


सौजन्य:
वैभव गुणवंत भोयर
(vgb3333@gmail.com)

Wednesday 27 November 2013

पुरुषप्रधान संस्कृती


एकटी आली, एकटी जाणार आहे..!! 
धोतांड मांडून का तुम्ही आडवे येणार आहे..??

एका-एका शब्दाचा हिशोब मांडलाय मी,
न चुकवता मी तो चुकवणार आहे..!!

थांबवायचा प्रयास केलाच मला तर
थोबाडात मारून, मी पुढेच जाणार आहे..!!

हाथ उगारल;लाथ मारेल,
प्रत्येक अन्यायाचा प्रतिकार इथे होणार आहे..!!

दुबळी-दुर्बल ही अवहेलना बास झाली,
स्त्रीची नव्याने कहाणी तुम्ही ऐकणार आहे..!!

वापरून सोडायची वस्तू नाही स्त्री,
सन्मानाने जगावे म्हणून ती लढणार आहे..!!

युगायुगाने वावरलो बंधनात नेहमी,पण आता
“पुरुषप्रधान संस्कृती” ही रीतच मी मोडणार आहे..!!

हसू नका माझ्या या नव्या पायवाटाना,
तुम्हींच त्यांना राजमार्ग म्हणून स्वीकारणार आहे..!!

मुंबई-दिल्ली च्या घटनांना राजकारणाच रूप दिलत,
तेही आता आम्हाला हव तस वापरणार आहे..!!

तुम्ही बलात्काराला फक्त बातम्या मध्ये स्थान द्या,
तुमच्याच विवंचनेतून मी क्रांती करणार आहे..!!

हा साध्या मुलीचा आक्रोश म्हणून दुर्लक्षित करू नका,
हेच फक्त “वैष्णवी” आज तुम्हाला बजावणार आहे...!!

Saturday 16 November 2013

कित्येक बहाणे

कित्येक बहाणे केलेत भेटायचे
पण आता भेटशील कुठे..??
आठवणी सारखी सोयीस्कर
जागाच उरली नाही इथे..!!

कित्येक बहाणे केलेत बोलायचे
पण तेव्हा बोललास कुठे..??
कविते शिवाय योग्य आता
माध्यमच उरले नाही इथे..!!

कित्येक बहाणे केलेत समजवायचे
पण तू समजलास कुठे..??
गैरसमज उराशी बाळगून
दोघेही झुरतोय इथे..!!

कित्येक बहाणे केलेत टाळायचे
पण मी तुला टाळलेच कुठे..??
रस्त्याचे कुठलेच वळणही
चुकवायचे शिल्लक नाही इथे..!!

कित्येक बहाणे केलेत विसरायचे
पण काही स्पर्श विसरले कुठे..??
आठवावेत वाटले ते क्षण

पण संदर्भ केव्हाच बदलले इथे..!!

Thursday 7 November 2013

अनोळख


बेधुंद जीवन प्रवासात,
नवनवीन पायवाटा हुंदळत,
बेफिकीर लोकांची मने जिंकित..!!

अज्ञात वस्तीत- एखादा वाटसरू,
अचानक येतो,
सवयीचा होतो,
आपलासा करतो,
नेहमी साठीच..!!

कुणी आपल्या बंधनात अडकणार,
हे ताडलं कि,
खूप गोंधळतो,
निघून जातो,
मागेही न बघता..!

कारण-
त्याला फक्त जपायची असतो,
अंत:करणात
खोलवर रुजलेली,

“अनोळख”...!!

Wednesday 30 October 2013

ती..तो..

अबोल ती,
बोलका तो..!!

चंचल ती,
शांत तो..!!

वेडी ती,
भोळा तो..!!

सजली ती,
तापतो तो..!!

झोपली ती,
जागतो तो..!!

हट्टी ती,
मुजोर तो..!!

जवळ ती,
दूर तो..!!

आली ती,
जातो तो..!!

स्वप्न ती,
सत्य तो..!!

रात्र ती,

दिवस तो..!!

Wednesday 23 October 2013

कावळा

भरगच्च गर्दीच्या चौकात

एकीकडून,
गर्दीला समांतर प्रेतयात्रा..!!
हृदयद्रावक मृत्यूचा मातंग..!!

दुसरीकडून,
त्याच गर्दीतील लग्नाची वरात..!!
वेगळ्याच आनंदाची सुरवात..!!

आणि मी मात्र,
तिथेच चौकात,
गांधी पुतळ्यावर.!!

भिर-भिर डोळे फिरवत-
गोंधळलेला-
एक तटस्थ कावळा..!!

Tuesday 8 October 2013

लोकांच्या नजराच नाटकाला जन्म देतात-१

दिपिका हि माझी बालपणातील,माझ्या गावातील मैत्रिण, एका प्रतिष्ठित घराण्यात तिचा जन्म आणि संगोपन झाले. गावातील तिचे घर म्हणजे आदर्श समजले जायचे! तिचे वडील विठोबा त्यांना “पांडुरंग” म्हणूनच सर्व गाव ओळखतो. गावकरी देवळातल्या देवाच्या पायी पडण्यापेक्षा या पांडुरंगाच्या पायी पडून स्वत:ला धन्य मानत, असा हा देवमाणूस गेली १५ वर्ष गावातील राजकारण बिनविरोध सांभाळत होता (हि गोस्ट वेगळी कि गावाची प्रगती करण्यात हा देव तितका नापास झाला). कुणी नजर वर करून बोलायचं धाडसही याच्याशी करत नसत(तगड्या नेत्याचा आधार असला कि असाच होतं,पण त्यांचा स्वभावही तसाच मनमिळावू आहे), अश्या आदर्श बापाची,आदर्श लेक दिपिका..!! खूप मायाळू-दयाळू,सर्वांसोबत हसत-खेळत लवकर मन मिसळून वागणारी हि.! लोक म्हणत कि पोरगी असावी तर दीपिका सारखी..!!
********************************************
याउलट आम्ही दोघी बहिणी गावात फार मिसळत नाही, मी तर गेली १० वर्ष बाहेर बाहेरच आणि नुकतीच ३ वर्ष पुण्यात होती. वर्षातून एकदा घरी यायची, जिथे घरच्यांशी बोलायल वेळ नाही तिथे गाव चौकश्या कुठे करणार...!!
********************************************
असो विषयांतर नको...!!
********************************************
दीपिका,ती गेल्या महिन्यात एका आंतरजातीय मुला बरोबर पळून गेली. कुणावर प्रेम करणे गुन्हा नाही, आणि ज्यावर प्रेम केले त्यासोबत संसार करावासा वाटणे यात काहीही चूक नाही. पण आपल्याला आवडलेल्या व्यक्ती बरोबर संसार करता यावा म्हणून पळून जाणे हा काही पर्याय नाही, हेही आजच्या तरुण पिढीला समजू नये,याचे आश्चर्य वाटते...!!
पळून वैगेरे जायचा हा काही गावातला पहिला प्रसंग नव्हता. या आधी पण बरेच आंतरजातीय विवाह झालेत, आणि गावातील लोकांनी ते स्वीकारलेत सुद्धा, पण दीपिका सारखा चांगल्या घरातल्या मुलीनी अस काही करावं हे लोकांना मान्य नव्हतं. (लोकांची गोष्ट सोडा पण एक मी मुलगी म्हणून मलाही ते अयोग्यच वाटले.) तिच्या पळून जाणाच्या कृतींनी पूर्ण गाव सुन्न पडल्या सारखा झाला..!!
********************************************
हि घटना इथेच थांबली असती तर नवलही नसते, काळानुसार ह्या गोष्टी पडद्या आड जातात. पण याचा  उलट पक्षी परिणाम आम्ही मुलीच सहन करतोय, गावापासून जवळच्या मोठ्या शहरात जान-येण करून शिकणाऱ्या मुलींच्या आई-वडिलांनी त्यांची नावे काढून गावातल्या शाळेत टाकायला सुरवात केली. माझ्या घरी येऊन माझ्याच आई-बाबांना सावध करायची मोहीमच गावकऱ्यानी चालवली. ‘मुलीना शिकवू नका’- हाच एक नारा, हाच एक हट्ट.!! तिच्या एकटीच्या पळून जाण्याने मातंग माजला गावात..!!
जगात पुरुषाच्या खांद्याला-खांदा लावून प्रगती करणारी उलट मी तर म्हणेन पुरुषांपेक्षा यशाची एक पायरी जास्त चढलेली आहे स्त्री, आणि माझ्या गावात मुलींना घरी ठेवायचा हट्ट केला जातोय..!!  
हे अशे बुरसटलेले विचार बघाताना जीव गुदमरतो, रक्त सळसळून उठत, वाटल तिला शोधाव आणि गावात पुन्हा परत आणावं आणि दाखवावेत चाललेले तमाशे..!! (मी पण राग व्यक्त करण्या पलीकडे काही करू शकली नाही..!! याचाही राग आलाच.)
तिच्या पळून जाण्याला माझा विरोध नाही, किंवा पळून जावे असही माझं मत नाही..!! पण आपल्याला हव्या असलेल्या व्यक्तीशी पळून न जाता लग्न करण्यासाठी एक काही तरी MUTUAL विचार शोधाण्याची सक्त गरज वाटते आहे.
जर ती(किंवा तो) कुणावर प्रेम करत असेल, इथे पुन्हा प्रेम आणि आकर्षण यातला फरक ओळखता यायला हवा. सामान्यपणे वयाच्या विसी नंतर प्रेम आणि स्वत:चे भविष्य,परिवार वैगेरे वस्तुस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेतले जातात, कदाचित विसिच्या आधीचे निर्णय चुकूही शकतात,तेव्हा तितकी समज आलेली नसते.
********************************************
जर ती(किंवा तो) कुणावर प्रेम करत असेल, आणि त्याचाच बरोबर संसार करायची इच्छा असणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असतो. पण एकदा शांत आणि समंजस पणे घरच्यांशी बोलून पाहायला काय हरकत आहे. कुठल्याच परिस्थितीला बघून पळून जाने हे मला तितकस सोयीस्कर वाटत नाही. आणि शेवटी आपल्या आई-वडिलांनाही आपला आनंदच हवा असतो, आपली पसंद-नापसंद याचा विचार करून तेही आपल्याला योग्य असाच  निर्णय घेतील हा विचार करायला काय हरकत आहे. पालकांनीही स्वत:च्या मुलांच्या बोलण्याचा, त्यांच्या निर्णयाचा आदर करावा,ते कुठे चुकत असतील तर मित्र बनून त्यांना समजावून सांगावे. नाकी उलट त्यांना जास्त बंधनात ठेवून मुद्दामच कुण्या अनोळखी व्यक्तीशी संसार करायला भाग पाडावे..! नाहीतर घरच्यांच्या संमतीनी झालेली लग्नही फोल ठरतात, हेही मी वेगळे सांगायला नको..!!
आणि पळून जाण्यानी उलट दुरावेच वाढतात, नाती तुटतात, जरी नवीन काही नाती जुडत असली तरी कित्येकदा पळून गेलेली मुलगी आपलं माहेरपण गमावून बसते..!! बऱ्याचदा तर मुलगा-मुलगी दोघांच्याही घरचे त्यांना घरी घेत नाही, समाजात कुणीही विचारात नाही, शेवटी माणूस एक समाजशील प्राणीच नाही का? आणि पळून आलोय, आता सर्वीकडे अवहेलना होतेय म्हणून कितीतरी जोडप्यांनी केलेली आत्महत्या वर्तमानात वाचतोच कि आपण..!!
पळून जायच्या वाढलेल्या घटनांचे प्रमाण पाहून आता १९-२० व्याच वर्षी शिकण्याची इच्छा ठेवणारी चिमुरडी पिल्ले उडण्याआधीच संसारात बांधली जातात..
याचा तोडगा मी किंवा कुणीही सांगण्यापेक्षा स्वत: प्रत्येक मुलीनी-तिच्या पालकांनी शोधून काढावा..!!(माझा मी शोधलाय.) कारण हा प्रत्येकाच्या घराचा वैयक्तिक प्रश्न असतो..!!
आणि प्रत्येक जखमेला काळ हे उत्तर असतेच, काही वर्षांनी मी आणि माझा गावही विसरून जाईल कि कुणी दीपिका पळून गेली,आणि तिच्या मुळे बऱ्याच मुलींचे आयुष्य बदलले..!! शेवटी “लोकांच्या नजराच नाटकाला जन्म देतात..!!” तस पाहिलं तर या गोष्टीचा इतका गाजावाजा व्हायला नको होता,पण गावं-गप्पा आणि त्याचे परिणाम हे गावात राहणारीच व्यक्ती समजू शकते...!!

ठरवलंय

मी आता ठरवलंय
दुरून दुरून प्रेम करायचे..!!
कुठेही न बोलता
स्वत:च तेवढे झुरायचे..!!

मी आता ठरवलंय
प्रेमात जरा सावरायचे..!!
काहीही न सांगता
मुकेच शब्द बोलायचे..!!

मी आता ठरवलंय
सावरताना छान सजायचे..!!
कधीही न पाहता
डोळे घट्ट मिटायचे..!!

मी आता ठरवलंय
सजताना कधी लाजायचे..!!
नशेत अन सख्याच्या
थोडे थोडे डुलायचे..!!

मी आता ठरवलंय
लाजताना थोडे रुसायचे..!!
रुसण्यातच आणि मग
पुन्हा प्रेमात पडायचे..!!

Tuesday 3 September 2013

सोळा रुपये बेचाळीस पैसे



********************************************************
कदाचित सकाळी पडलेली स्वप्ने खरी झाली असती; खर व्हावस वाटणार कालच स्वप्न...!!
********************************************************

महागाईच्या दिवसात, 
मी पोहचले दुकानात...!! 

आले गौरी-गणपती दारात,
म्हटलं किराणा आणावा घरात..!!

डाळ, तांदूळ, नारळ चार,
खरेदी वाढत गेली फार...!! 

साखर आणि तूपही घेतले,
मी नाही बाई काही विसरले..!!

चोख सर्व खरेदी झाली,
आता खर्चाची वेळ आली..!!

दुकान मालकाने दिली हिशोबाची पावती...!!
स्वप्न तुटले पाहून फक्त "सोळा रुपये बेचाळीस पैसे"ची गिनती..!!

Wednesday 21 August 2013

मायचा जीव


कसा आणि कुठे, अडकलास रे पोरा? 
मायचा जीव इथे, गच्च ओला झाला! 


वैरी झाला हा, पाऊस आणि वारा! 
उभा आहेस ना रे बाबा, तू जरा आडोशाला?


पालीच्या चुकचुकन्याला, करते आहे कानाडोळा!
पण वीज ही आकाशी, धस्स करी मनाला!


उचल आपली पावले, घराकडे तू भराभरा!
 दिवेलागणीचा वेळ, कधीच निघून गेला! 


उन्मत झालेल्या पावसा,थांब ना रे जरा!
येऊ देत घरी, माझा सोन्या पिल्ला!


स्वप्नांचे बाळ घेऊन, तू उडालास खरा!
पण हा जीव मात्र तलवारीला टांगला!


Monday 12 August 2013

आनंद खरा


"नको.! ना रे बाळा,
एकदम जाऊस दूर",
बोलली होती आई
आणून नयनी पूर..! 
  
"अशी का ग करतेस,
 मला आहे उंच उडायचे, 
थांबव आता मायेने
 मला अशे बांधायचे," 

निघाली होती मी भविष्याकडे 
डोक्यावरील तिचा हात झिडकारून,
फक्त माझे ध्येय दिसले
तेव्हा तिच्या अश्रुचेही मोल विसरून,

घड्याळाच्या काट्यावर,
तीन वर्ष निघून गेली!
हतबल, जखमी, अपयशी - मी 
घायाळ होऊन परत आली! 

निरोप देतानाचे दोन हात तशेच
आजही माझी वाट पाहत आहे,
तिच्या अपेक्षेत कमी ठरलो
म्हणून डोळे मात्र नजर चुकवत आहे,
  
"अशी उदास - नाराज होऊ नकोस  
तू कुठे चुकली नाही ",
तिच्या या शब्दांनंतर,
माझ्या अश्रूंची नदी वाही!

तिच्याजवळ ममता आहे,
माझ्या जखमा भरणारी;
तिच्याजवळ ओढ आहे,
मला जग म्हणणारी!

अशात तिचा हात 
फिरला डोक्यावरून जरा,
खर सांगते तेव्हाच कळाले
आईच्या कुशीत आनंद खरा…!!


Thursday 11 July 2013

प्रेमात पाडणारा

पाउस,
प्रेमात पाडतो - स्वत:च्याच..!!

कितीदा तरी
कोसळतो,
भूरभूरतो,
गरजतो.....!!

पण-
पाउस आला कि मलाच मी;
आवडायला लागेत,
नेहमी पेक्षा जास्त….!!

या पावसाला असं दोन्ही हातात
घट्ट पकडून ठेवायची खूप इच्छा होते,
आणि तसा निष्फळ प्रयत्नही….!!

पण हाही अवखळ पाऊसच,
ओंजळीतून भुरकून सरकून जातो…!!
जातानाही,
भिजलेली ओंजळ तापलेल्या जखमांना ओलावाच देते … !!

असा हा मुठीतून सरकत जाणारा पाउसच…!!

प्रेमात पडतो-
स्वत:च्याच…!!

Wednesday 15 May 2013

जा..!!!


तू आलास-
हसवलं,खेळवलं,
मला जणु परिसच भेटलं
लोखंडातून सोनं केलस..!

आणि
निघुन गेलास..!

जायचच होत तर-
आलासच का..??

जाताना आठवणी ठेवुन गेलास..!
तेवढ्या त्या तरी घेउन जायच्या असत्या..
पण..
नाही..!!

मला ताटकळत ठेवुन
निघुन गेलास..!

वाटलं नव्हतं,
आयुष्यात पुन्हा..
एका वळणावर भेट होइल
मुकं मुकं राहुण भावना पोहचतील

तू
पुन्हा दिसलास
त्या आठवणी उलगडल्या..
पण
तू मात्र,
एकही शब्द न बोलता,
पुन्हा
निघुन गेलास..!

मिहि का अशी..??
अनोळखी झाली..??
हि सल मारुन टाकेल कदाचित..!!

तू
मुकपणे निघुन गेलास..!,
हरकत नाही..!
पुन्हा येउ नकोस,
आणि जर यायचचं असेल तर-
एक अनोळखी बनून ये..!!
कारण..?
तू कोण.?
तुझं अस्तिस्त्वच मिटून टकलय मी..!!

Tuesday 30 April 2013

काही जुन्या कविता


एक फुलपाखरू 

दूर जाणाराच का-
जवळ हवा असतो?
जवळ असलेला प्रत्येकच-
का दूर जात असत्तो?

सुखानंतर दुख:च 
येण असतं की-
दुख: नंतर सुखाच .??

जवळ असून दूर वाटण 
आणि 
दूर जाउन जवळ असण, 
काय याचा अर्थ….?

काहीही असो;
सुख-दुख: ,
येण-जाणं,
हे चक्र सुरूच असत…!

एक निरागस फुलपाखरू मात्र 
फुलाच्या शोधत-
या चक्रव्युहात अडकलेलं असतं …. 
(१५/०२/२०१०) 
////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////
सोपी दिसतं

जवळ असून दूर असण 
किती अवघड असतं…. 
गुलाबान सुग्नाधला मुकावं 
इतकं ते सोपी दिसतं…. 

ओळखून अनोळखी असण 
किती विसंगत असतं… 
डोळ्यांनी आसवांना मुकावं 
इतकं ते सोपी दिसतं…. 

उशीत डोक लपवून 
रडण किती अवघड असत… 
गवताची पाती, दावाविण 
झुरावं असं ते दिसतं..  

(२० १ ०) 
//////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////

कारण 

खूप प्रयत्न केला,
पण 
जमलच नाही मला तुझं होण!
कारण-
माझ्या भावनांना बाजूला ठेवून,
मी कधीच विचार केला नहि… 

स्वार्थी कधीच नाही,
स्वार्थी काहीच नव्हती,
अगदी प्रामाणिक प्रयत्न केला!
पण-
जमलाच नाही तुला ओळखण-
कारण,
मीच माझा मी पणा-
माझ्यापासुन सोडू शकली नाही… 

खूप प्रयत्न केला;
पण-
जमलच नाही तुझ्यावर विश्वास ठेवण..!
कारण;
कदाचित सांगता येणार नाही,

खूप प्रयत्न केला माझ्यावरील विश्वास घात विसरण्याची;
पण-
फसलेल्या मला मीच कधी मदत केली नाही…!
(२०११)  
//////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////
एकटं 

एकटं असताना 
जग किती सुंदर भासतं 
जणू हरवलेलं स्वप्नच गवसतं!

अगदी एकटं असतो 
आपल्याच स्वप्नात भरकटत असतो… 
नको नको ते साहस करतो;
एकटं असताना-
किती बर शांत असतो,
त्यातही 
मन वाऱ्यासारख चंचल असतं,
क्षणात पृथ्वी तर क्षणात स्वर्ग 
पादांक्रात करत असतो…. 

एकटं असताना-
आपण हसत असतो;
मन किती प्रसन्न असते,
जणू त्याला कोणी सदाच घलते… 
घातलेल्या सदातच आपण झुलत असतो;
झुलत झुलत हसत असतो… 

एकटं असताना-
आपण रडत असतो;
एकटंच अश्रू गाळत असतो-
कुणी समजवायला नसतं;
कुणी अश्रू पुसायला नसतं ;
आपलं दुख: आपलं असतं…!

आपली खंत आणि 
फक्त आपणच,
एकटं असताना 
जग किती सुंदर भासतं 
जणू हरवलेलं स्वप्नच गवसतं!

(२९/१०/२००९)
///////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////

कदाचित 

दूर कुठेतरी असेल माझे स्वप्नाचे गाव 
कदाचित 
दूर तिथेच त्या क्षितिजावर असेल, माझ्या मनाची नाव.. 

कदाचित,
दूर तिथेच अश्रूही आटले असेल माझ्यासाठी,
दूर तिथेच नक्की स्मित हास्य असेल माझ्यासाठी,
कदाचित 
दूर तिथेच हसता हसता येणाऱ्या अश्रूंनी ठाव मांडला असेल,
दूर कुठेतरी असेल माझा कुणी  आधार,
दूर तिथेच असेल माझी वाट पाहत कुणी निराधार-

दूर कुठेतरी मनाच्या स्थिरावल्या कोपऱ्यात 
कुणी गोंधळ माजवला;
कदाचित 
मनाच्या त्या कोपऱ्यात कुठलातरी 
एक काजवा चमकला….!

(२००९) 
///////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////
नक्की 

प्रत्येक उगवणारा दिवस 
अस्ताला जाणार हे नक्की!
आज जीवापाड झालेला 
उद्या दुरावणार हे नक्की!

नुकतीच तुझ्यात अन माझ्यात 
मैत्री झाली ती पक्की!
तरीही मैत्री तुटण्याची भीती 
तुझ्या मनात हे नक्की …!

उन्ह, पूस अन थंडी 
अशी हि निसर्गाची चक्की!
मानवाचा हस्तक्षेप 
तोडणार त्याला हे नक्की…!

जडलेल्या नात्याचा अंत 
तो होणार हे नक्की…!
तरीही नाते बांधण्याची 
उमेद असते हे नक्की….!

तुला राग आला तरी 
मला आता फिकीर नाही,
कारण मी तुझ्याशी बोलणार 
नाही हे मात्र नक्की.!
(२००९)
//////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////

शृंखला 

तुटलेल्या शृंखला 
जुडल्या समजा तर-
त्या शृंखला  राहत नाही,
आपण त्यांना बेड्या म्हणतो!

बेड्या त्या जखडलेल्या 
फारच वेदना देतात.. 
नको तिथे टोचून 
आठविनींची शृंखला तयार करतात.. 

ह्या शृंखला आणि मग-
त्यांच्या बेद्याही हव्यास्या वाटतात;
कारण त्यांनी बंदिस्त केलेले असते-आठवणींच्या हिंदोळ्यात.. 

ह्या आठवणी-
खरच कैदी करतात आपल्याला!
कधी ह्या बेड्या तुटून ;
मुक्त व्हावस वाटत… 

पण-
तुटलेल्या बेड्याच तर,
शृंखला करतात….!!!!

(०८/०४/२०१० )
///////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////