Tuesday 30 December 2014

बुढीचं खाटलं

पहिल्यापायी आता नसते
वर् ह्यांडात आजीबाई
तुळस अंगणातली
पुसते हाय तुले काही

कुठं नेवून ठेवली
माय तुही जन्माची
तिच्या बिगर लेका
शान नाही जगण्याची

तू लाहीन व्हता
तवा पासून सांभाळतीय
तुले कशी बे,
ती आत्ताच जड होतीय?

पाह्य गड्या
सोपं-सोपं हाय
लेकरासाठी सारं
सहन करते माय

तूवा म्हणालं तिले त
चालली बी जाईल
पर जीव तुह्यावरचा
सांग कशी तोडील

मायं व्हयं न तुवी
घरातून कायले हाकलतू..?
यक "बुढीचं खाटलं"
तुले यवढं जड व्हतूं..?

...वैष्णवी..

Friday 26 December 2014

नाते तुझे - माझे

माझ्यामधल्या तुझ्यापणात,संपतय आयुष्य माझे.!
निनावे सांभाळतोय तू, नाते तुझे - माझे..!!

माहीती नसलेल्या तारकांसारखचं,आपलं असणं जपलय
नियतीनेही अधांतरी जोडले असावे, नाते तुझे - माझे..!!

काल वा आजही गरजेची भाषा समजलीच कधी आपल्याला,
देहा वेगळ्या सावलीची कहाणी आहे, नाते तुझे - माझे..!!

आर्कषण, मैत्री, कारण,  प्रेम, अहंकार याही पलीकडे,
फक्त तुझ्या - माझ्यात गुंफलय, नाते तुझे - माझे..!!


Tuesday 23 December 2014

उत्तर

माझा हात थरथरत होता, तिचा ढळलेला पदर सावरताना... तिच्या अवस्थेवरुन काय झाले असावे, हे आपसुकच समजून गेले...

ताठ मानेने जगताना.. स्वतःची तत्व वैगेरे जपणारी.. कधीच कुठलीही हार स्विकारणार नाही.. आपल्या आजुबाजुला वेगळाच ठसा उमटला होता तिचा.. लोक मानायचे म्हणा ना...

ती माझ्या दारात विस्कटून, कशी-बशी उभी होती.. आमचे डोळे भेटले,आणि धाडकन कोसळली... तिथेच दारात, भर रात्री दिड वाजता... ओस्काबोक्सी रडत होती.. रडत-रडत नेमकं काय बोलली स्पष्ट सांगता येणार नाही,पण आठवते ती ओरडत होती...

तो. . हरामी... पुलाखाली.. बेशुद्ध... मला... जबरदस्ती.. तो.. त्यानी.. अंधारात.. कुणीच नाही.. काय करु...
नंतर फक्त रडत होती..
.....
सकाळी थोडा डोळा लागला... पण... लगेच अर्ध्या तासात दचकून उठली..

गालावर सुकलेल्या अश्रूंचे निशाण... डोळे थोडे सुजलेले पण जास्तच निश्चयी..

सावरली.. जवळ आली.. मिठी मारली..कानात बोलली.. उभी राहशील माझ्या सोबत.. मला थांबायचे नाही.. लढायचे आहे..
तू मदत...

शब्द अडकलेले...
डोळे थोडे पाणावलेले..
माझ्या उत्तराच्या अपेक्षेत..

Friday 19 December 2014

कुणाची करणी, कुणाची भरणी

एक मुलगी असते, सरळ-साधी अगदी, आपल्या नेमून दिलेल्या पायवाटेने चालणारी..! छान-सुरळीत चालू असतं तिचं आयुष्य..!


एका रात्री  कॉल येतो तीला... जुना मित्र एक असतो फोनवर... बोलण्या-बोलण्यात तो बोलतो तीला, "तू आवडतेस मला..! तुझ्या जवळ यायची इच्छा आहे माझी..! माझ्या भावनांची कदर कर.. एकदा मला ते सुख दे.. नाही म्हणू नकोस..!" ती दचकली,भांबावली.. नेमका शब्दांचा अर्थ समजेपर्यत शांत राहीली.. नंतर त्याला स्पष्ट नाही म्हणाली...त्याचा भावना प्रेमाच्या नव्हत्या,वासनेचा गंध तिला जाणवत होता...



नंतर बर् याचदा कॉल झाले त्याचे, तिने स्पष्ट नाही सांगितल्यावरही तो बोलतच होता, "मला तुझ्या जवळ यायचे आहे.. वैगेरे बरच काही.." तिचा मानसिक छळ पराकोटीला पोहचला, न राहवून तीनी हा प्रकार घरी सांगितला..



आताही अश्या घटना घडल्या की मुलींनाच दोष दिला जातो..मुलीचीच चूक असा दृढ समज केला जातो.. तीही अपवाद नव्हती..तिची बाजू ऐकलीच गेली नाही.. आणि दोषी ठरवल्या गेली.. तिचा मोबाईल जप्त.. आणि लग्नासाठी तयार रहा,मुलगा शोधतोय आम्ही, हा आणखी एक धक्का..!!



खरंतरं झालं काहीच नव्हतं, पण काही झालं असतं तर...! लोकं काय म्हणतील ही वेगळीच भिती..! या निरर्थक ओझ्या खाली काहीही कसूर नसताना तिचा बळी चालला होता.. एका वासनाधारी नराधमाच्या आयुष्यात फक्त येण्यानी तिला मनाविरुद्ध्, आपली सर्व स्वप्न बाजूला ठेवून, लग्नाच्या बोहल्यावर उभं राहावं लागलं..! आणि त्याला याबाबतीत एकही प्रश्न विचारला जात नाही, एक संस्कारी म्हणून मिरवला जातो..



यात चूक कुणाची..? तिची..? त्याची..? तिच्या घरच्यांची..? समाजाची..?? लोकांची...?? मानसिकतेची..? विचारसरणीची..?? चूक जे काही असेल,आपलं आपणं ठरवावं...!


मला या सर्वात लग्नासाठी उभ्या असलेल्या तिच्या डोळ्यातले अश्रू..! आणि निर्लज्यपणे अक्षदा टाकण्याच्या बहाण्याने आलेले वासनी डोळे.. - तेवढे स्पष्ट दिसतात..!

Monday 15 December 2014

काश ये पल थम जाये..।

आज, त्याला भेटली ती आणि खूप बोलली, सर्व गोष्टी सांगितल्या..!! कितितरी विषयांवर चर्चाही केली, भूतकाळाच्या गाठी उलगडल्या, वर्तमानात येऊन अस्तित्वही बघीतलं, भविष्याचा वेध घेतला..!! जे बोलायचं ते सर्व,अगदी स्पष्ट बोलली..!
आणि, आता निघायची वेळ आली. ती आली तिथेपरत जाणार,त्याचही तसचं..
हे अशे एकमेकांना सोडून (नेहमीसाठी नसतं ते पण तरीही) जाणं, तिला रुजायचं नाही...
कितिही नाही म्हटलं तरी हृदयाचे ठोके वाढतात..! त्याला पुन्हा भेटता नाही आलं तर, नको त्या शंका आणि विचार नुसते..!

ती विचारते स्वतःला, हा वेळ इथेच थांबवता आला तर... मन दटावून बोलतं तिचं, "नाही.. बिलकुल नाही... गती आहे जगण्याला म्हणून भेटण्याची उत्सुकता आणि निघतानाची हूरहूर असते..! खरी मजा इथेच आहे आणि हाच वेळ थांबला तर, तोच-तोचपणा जाणवेल.. तिला भेटताना प्रत्येकदा तो वेगळा असतो - आधीपेक्षा खूप वेगळा...! हा वेगळेपणा अनुभवण्यासाठी तरी वेळ थांबायला नको आहे... तिच्या मनाच्या या शहाणपणाच्या गोष्टीचं तिलाही नवलच वाटलं ( मन समजदार झालं होतं म्हणा ना तिचं)...
निरोप घेताना पावलं जड झाली.. डोळ्यात पाणी आलं (नेहमीसारखचं, नवीन नव्हतं त्यात काही..!), त्याला ती दिसू नये म्हणून ती जरा धावत जाऊन (गरज नसतानाही) बस पकडते..तोही गाडी चालू करून निघून जातो..
.....
त्याच्या मनाचा कधीच थांगपत्ता लावता येत नाही, निघताना त्याच्या मनात काय विचार असतील, की तोही फक्त हसत असेल, जशी ती सौम्य हसत बसमध्ये बसली होती..

...वैष्णवी..

Tuesday 2 December 2014

गुंतागुंत

खूप बोलते आहे
इतक्यात तुझ्याविषयी
का रे जूळूच नये
आपली ही नाती..?

सोबत तुझ्या राहायची
स्वप्न वैगेरे नव्हती
पण मनात या माझ्या
ही प्रश्ने नेहमीच राहती

इतका चुकिचा निर्णय
मी घेऊ शकली कशी?
आणि माझी ती मनःस्थिती
तेव्हा तू सांभाळली कशी?

बाहेर निघायचे होते
तुझ्यातून मला
म्हणूनच घरी
कोंडले स्वतःला

वाटले होते तेव्हा
नवीन सुरवात झाली
संपल सर्व
तिथेच होती फसली

भ्रम सगळा निवळला
आज अचानक बघ ना!
कवितेत माझ्या आला
तुझाच विषय पुन्हा.!

अगदी स्पष्ट आमचे
झाले आहे बोलणे!
मना, तुवा आतातरी
"गुंतागुंत" उलगडणे..!

Saturday 29 November 2014

गोष्ट तुझी-माझी

त्या रम्य संध्याकाळी
तुझे वाट पहाणे
सजताना माझ्याही
हृदयाचे धडधडणे

पहीलीच भेट तेव्हा
चेहर् यानी ओळखण्यासाठी
दोघातला अनोळखीपणा
थोडा कमी करण्यासाठी

कोण आधी बोलणार
हसली तेव्हा शांतता
अडखळले होते शब्द
मनातले विचार वाचता

डोळ्यांनी सुरवात केली
आपल्या नकळत बोलायला
हळूहळू नंतर मग
ओठही लागलेत वळायला

काय वाटेल समोरच्याला
राखून सर्व बोलणे होते
मनातल्या भावनांना
हसण्यात हळूच लपवणे होते

कॉफीच्या धुरासारखा
प्रत्येक क्षण सरकत होता
थांबावी वेळ इथेच
मनात विचार येत होता

अकस्मात वळणावर
भेटू पुन्हा कधी
ठरवून भेटायचा संसार
नको पुन्हा कधी

का बोलला असशील असे
आजही कोडे आहे
शब्द चुकलेत का बोलायला
प्रश्न हा भेडसावत आहे

शेवटच्या घोटासोबत
कॉफी संपली कपातली
पहीली ही भेट दोघांची
नाजूक वळणावर संपली

तू म्हणालास तसंच
अकस्मात एकदा भेटलो
तेव्हा आपण दोघंही
उत्सुकतेने बोललो

तेव्हा जे मनात
तेच डोळ्यात
आणि बोलतानाही
तेच शब्दात

आठवण आली तुझी
बोलली होती कवटाळून
विसरतच नाही तुला
बोलला मिठी गच्च करून

अनपेक्षित होता
असा आवेग भेटीतला
दुराव्यानी उलट
घट्ट बांधले दोघांना

Friday 24 October 2014

प्रेमवेद

स्वप्नी तुझ्या प्रत्यक्ष यायचे स्वप्नं मी पाहत असतो
तुही कधी अशीच बोलावशील, वाट मी पाहत असतो.

कुरळ्या केसातून तुझ्या पाण्याचे थेंब घसरतात
साला दैनिकात यांचे नशीब मी शोधत असतो.

पतंग आडवी गेली म्हणून सुर्य लपत नसतो कधी,
नजरेत येता  असे काही तुझा होकार मी आठवत असतो.

पावसाच्या मोतेरी थेंबांसारखा विषय आहे तुझा
घ्यावं  भिजून कि लिहून घ्यावं  , पेच मी  सोडवत असतो.

तुझ्या खांद्यावर  डोके ठेवून लिहायचे आहे मला
असे कितीतरी बहाणे मी नेहमी शोधत असतो.

तुझ्या कवितेत दंगल पेटते शब्दांसोबत लिहिताना
ते अर्थ सोडत नाही, कचऱ्यात त्यांना मी  फेकत असतो.

तुला दुरून दिसला तो समुद्र तरीही चालेल
शब्दांचा पुल बांधण्या एक भाषा मी जोडत असतो.




वैभव गुणवंत भोयर
vgb3333@gmail.com




अर्धी राहीलेली कविता..

विस्कटलेले केस,
पदरही ढळलेला.!
दार उघडले,पण
ओळखलेच नाही तिला..!

एकही शब्द न बोलता
चालली होती पाठमोरी..!
मुक्याने जाणारी तिच असणार
तेव्हा ओळख पटली खरी..!

"सखये, का अशी,
निघून जाणार..?
मला अधांतरी पुन्हा
तात्कळत ठेवणार..?"

शब्दांनी माझ्या,
ती थबकली..!
परतणारी पावले,
परत वळली..!

डोळ्यात तिच्या जरी
तिरस्कार होता.!
मिठित मला घ्यायचा
आवेगही दाटला होता.!

राग तिचा अश्रूत
होता विरघळला.!
विरघळण्याचा डाग आजही
डायरीने आहे लपवला.!

मिठित येउन पुटपुटली
बये.! दूर पुन्हा लोटू नको.!
हवं तर माजघरात कोंडून ठेव
पण या जगात मज विकू नको.!

खिन्न मी,
तिला घरात आणली..!
हिला कुठल्या अलंकारानी सजवावी,
वॄत्त आणि मात्रांचीही गर्दी दाटली..!

तिच्यावर घालणार् या बंधनांची
चाहूल लागली असावी बहूधा..!
उठली संतापून, बोलली घालून-पाडून
आणि निघून गेली-पुन्हा एकदा..!

जाता जाता सांगायला
ती विसरली नाही..!
तुझी कविता कधीच
पुर्ण होणार नाही..!

शब्द तुझ्यात अडकणारा
तुला सापडणारा नाही..!
अडकलाच एखादा
तरी तो रुजणार नाही..!

अर्ध्या राहीलेल्या कवितेचे शब्द
तेव्हापासून भटकत आहे..!!
अन् कवितेच्या आठवणीत
डायरीची झुरणे सुरु आहे..!!


Thursday 23 October 2014

कुठलाही नियम मी कधी पाळला आहे..??

आंधळा विश्वास ठेवून,स्वतःला फसवले आहे
निर्भिड अगदी मी, कुर् हाडीवर पाय ठेवला आहे

होउन जाउ दे, जे व्हायचे ते आता,
जे होऊ नये ते तशेही झालेच आहे

हीच मजा असावी जगण्याची खरी,
डोळ्यांवर पट्टी बांधून मी जी भोगत आहे

विश्वास, अपेक्षा वैगेरे शब्द जड होतात हो,
कुठलाही नियम मी कधी पाळला आहे..??


कोपर् यातली पणती हळूच हसली

आपल्या नात्याला,
कुठल्या गैरसमजीने दुरावा आला..??
कारणमीमांसा नकोच..!
एकाच घरात वावरणारी,
अनोळखी झालोत, नाही..?
सावली म्हणायचा तू मला
तुझ्यापासून कधीही वेगळी न होणारी-सावली..!
पण इतक्यात-मुद्दाम होऊन दूर राहतोय
वेदना होतेच,
आणि का होऊ नये.?
दोन जीव,एक प्राण वैगेरे होतो ना रे आपण..!!
......
दिवाळी! नाही का आज,
सर्व गिलेशिकवे विसरून-
तुझ्या मिठित येईल म्हणते..!
पण मीच का..?
कदाचित,
तुही याच द्विधा मनःस्थितित..!
.....

फटाक्यांची आतिषबाजी बघायला
सवयीप्रमाणे दोघेही गच्चीवर,
अमावस्येला, संपूर्ण शहर उजळून निघाले आहे..!

विरहात दोघे..!!
तेव्हा नेमका कुणीकुणाचा हात पकडला
ते माहीती नाही,
पण,
गुंफलेले हात बघून,
कोपर् यातली पणती हळूच हसली,
तेवढं नक्की आठवते..!!

Saturday 20 September 2014

गच्च ओल्या कागदावर


समोरासमोर बसून आपण
उलगडून टाकूयात मने
काय म्हणतोस? पलटवायची
काही भूतकाळातील पाने

फार तर काय?
भावनांचा कल्लोळ माजेल..
आणि जास्तच झालं तर,
एखादी कविता भिजेल...

नंतर परतून पुन्हा
भेटीची समीक्षा करु!
उगाच बोललोत असे
आणिक हलकेच हसू!

तू तर विसरुन सर्व
स्वतंत्र जगशील लवकरच
मी मात्र असेल
तुझ्या डोळ्यात अडकूनच

काळ न अडखळता
पुढे सरकतो आहे
गती हा निसर्गाचा
तसाही नियमच आहे

आवेगात बोललेलो
पडद्या आड सर्व
तोस्तर गळूनही पडतो
प्रेमाचा गर्व

प्रेम होते ऐकमेकांवर
हे कोडेच असू नये म्हणून
उलगडायचे शब्दांचे पाश
भेटलो तेव्हा जाणून (मुद्दाम होऊन)

शांतता तेव्हा बोलकी
क्षणही थबकला होता
काय बोलणार तू?
ह्रृदयाचा ठोका चुकला होता

डोळ्यात पाणी, ओठांवर शब्द
काय तेव्हाचे भेटणे होते..?
गच्च ओल्या कागदावर
आजही तेच लिहिणे होते..!

Saturday 12 July 2014

पाहतो...विठ्ठल...

पावसाच्या थेंबात जशी पडत होती शाई
लिहिल्या शिवाय आज काही रात्र होणार नाही

प्रेमाचे लफडे दिसले ज्या समजदारांना इथे
ढगामागून पाहणाऱ्या सूर्याला भिजणे समजले नाही

पाऊस भिजवत होता वारा विझवत होता तुझे केस
तुझे हसणे माझ्याचसाठी त्यांना समजले नाही

बसून असतो मी तुझ्या सोबत त्या चाफ्याखाली नेहमी
जागेचे मला त्या कधीच रस्ते समजले नाही

तुझ्या डोळ्यातल्या काजळात विठ्ठल रंगतो माझा
आध्यात्म काय, प्रेम काय मला समजले नाही

वैभव गुणवंत भोयर

Monday 30 June 2014

उपकार

तारकांचे स्वप्न, माझ्या उशाशी सांडत नाही,
क्षणात चमकून विझावा, मी तो काजवा आहे..!

माझी वादळाशी लढण्याची, परीक्षा तू न पहावी,
एकटे 'तू'च  तेवढे वादळ मी जपले आहे..!!

आक्षेप नाही, प्रेमांच्या हजारही जखमांना,
फक्त तिरस्कार तुझा, प्रत्येकदा छळतो  आहे..!!

कुठल्याही आशा-अपेक्षा का ठेवेल तुझ्याकडून?
तू कसा विसरलास, जळणे मला शापच आहे..!!

देव मानलयं मी तुला, दगडाचा अन निर्दयी,
जिथे प्रत्येक क्षणाची, प्रार्थना माझी व्यर्थ आहे..!!

मी तर साधीसुधी याचक तुझ्यासमोर,
दान स्विकारून का मी उपकार करत आहे..??

Wednesday 25 June 2014

पळवाट तुवा शोधावी रे दुःखा

पळवाट तुवा शोधावी रे दुःखा,
माझे मीपन मी संपवीत आहे...!

दारिद्रा च्या उल्लेख ही का करावा..?
शब्दांची श्रीमंती मी उपभोगत आहे..!

निष्ठूरतेची उंचीच म्हणावी का ही..?
माझ्याच प्रेतयात्रेस मी हसत आहे..!

हा कसला विचित्र व्यवहार जगाचा,
सरणासाठी माझे घरच जे जाळत आहे..!

दुःखाची ही अग्नी पेटविण्यासाठी,
निर्जिव हात माझे सरसावत आहे..!

विस्तव संसारचे तापले असे काही,
माझे मीपण त्यात भाजत आहे..!

बघा ना गजलेला, कसला आलाय उत,
कशाचा हा उद्रेक मी सांगत आहे..?

Monday 9 June 2014

बाबा, तू उभा असशील, मी रे या अपेक्षेत आहे..

ही कशी नवीन सुरवात होणार आहे..
काहीच कळत नाही हे मला कळत आहे..

तू असशील ना रे इथेच अवतीभवती..?
की मला भरकटण्यासाठी सोडून देणार आहे..

प्रियकराने धोका द्यावा, तस नात नाहिये आपल,
म्हणुनच तू नेहमी सारखाच , सख्या सोबत हवा आहे..

माझी जबाबदारी संपली इथे,म्हणत निघुन जाशील..?
मला थकल्यावर निजन्यासाठी तुझी कुस लागणार आहे.

कीतीही उंच उडाली मी, तरीही परती साठी,
बाबा,  तू उभा असशील, मी रे या अपेक्षेत  आहे..



Friday 30 May 2014

का ते माहित नाही..!!

अशी ही दोन बहिणींची कहाणी..!!
                    
एकाच शेताच्या बांधावरच्या,
जणू दोन झाडांची कहाणी..!!

एकीत मुळातच कठोरपणा,
फक्त बाभळीचा काकटपणा..!!
दुसरीत मायेचा नेहमीच वसा,
चंदनासारखा फक्त सुगंध सारा..!!

एकीचे नशीबच जळण्यासाठी,
कोपऱ्यातील सारण होऊन सडण्यासाठी..!!
दुसरीनेही झीजनेच स्वीकारले,
पण दगडाच्या मूर्तीसाठी..!!

जाणारा वाटसरू,
काटा रुतला म्हणून,
बाभळीला दोष देतो..!!
पण चंदनाचा सुवासात
अगदी बेधुंद होतो..!!

शेताच्या एकाच बांध्यावरच्या,
बाभूळ अन चंदना सारख दोघींचं..!!

पटत पण पटत नाही..!!
कळत पण कळत नाही..!!

मुळे एकाच शेतात,
खोलवर रुतलेली..!!
पण स्वभावातील
विसंगती नेहमीच जपलेली..!!

बाभळीला काट्याचा तिरस्कार नाही..!!
चंदनाला सुवासाचा मोह नाही..!!

काही असण्याची,
काही नसण्याचीही
खंत नाही..!!

फक्त
शेताचा मालक तेवढा गोंधळला आहे..!!

का ते माहित नाही..!!

Sunday 18 May 2014

म्हणून माझ्या या हृदयात तू पुनः कधीही न यावे..!!

हे सारे त्याला गिरविण्याचे,परिणाम तर नसावे..!!
दिलेल्या जखमांचे,ज्याला शल्यही थोडे नसावे..!!

हेतुपरस्पे नव्हते कधीच त्याचे, पण म्हणून, 
निघून जाने त्याला कसे इतके सोपे असावे..??

पाण्यावर उठलेले तरंग छानच दिसतात,
त्याने तळाशी बुडालेल्या दगडाला ना विसरावे..!!

कुठल्याही वेदनेची फिकिर नाही,यात न वावगे, 
पण माझ्या वादळाला का मलाच जबाबदार धरावे..??

त्याला म्हणे पडत नाही सावल्यांचे प्रश्न कधीच,
मी मलाच द्याव्या लागणाऱ्या उत्तरांचे काय करावे..??

डोळ्यात साठलेले पाणी, ओठांनी कशे सांगू, कसे ना कळे, 
सांत्वनासाठी आल्यावर डोळ्यातील अश्रूचा अर्थ का पुसावे..??

भरवसा आता उरला नाही, माझाच मी असण्यावर, 
म्हणून माझ्या या हृदयात तू पुनः कधीही न यावे..!! 

Wednesday 14 May 2014

I Love You..!!


“कोण..??”, ऐकताना काही चूक झाली असेल म्हणून तिच्या आईला तिने पुन्हा हा प्रतिप्रश्न केला होता.


मयंक, हो त्याचाच कॉल आला होता. तुझ्याचविषयी विचारत होता, तुझा जुना मोबाईल नंबर त्याच्याजवळ होता म्हणून त्यानी या नंबर वर कॉल केला, तुझ्याशी बोलायचं म्हणत होता, म्हणून मी त्याला तुझा नंबर दिलं आहे, त्याचा एकदम कॉल आल्यावर माझ्यावरच चीडशील म्हणून मी आधीच सांगते आहे तुला..!!” तिची आई हे सर्व बोलताना ती फक्त स्वत:ला “मयंक..?? त्याचा कॉल..??” हे प्रश्न विचरत होती.. त्याच्या फक्त नावाने तिच्यासमोर तिचा भूतकाळ दत्त बनून उभा राहिला..


तोंडओळख मैत्रीत, आणि मैत्रीचे प्रेमात रुपांतर असा तिचा आणि त्याचा प्रवास सरसर डोळ्यासमोरून गेला..!!


“हा माझा मित्र, मयंक..!!”, तिच्या चुलत भावानी ओळख करून दिली,
तेव्हा फक्त “Hi” व्यतिरिक्त ती काहीही बोलली नव्हती.
नंतर बऱ्याचदा तो भावासोबत घरी यायचा, त्याचा स्वभाव मुळातच बोलका, त्याला बोलायला कुठली ओळख कुठलाच विषय लागायचा नाही, कुणाही सोबत,कुठेही तो बोलायला तयारच..!! या उलट ती फार लाजाळू, नजरही वर करून बोलायची नाही, साधी एकदम..!! खूप कमी बोलायची..!!


तो जितक्यांदा घरी आला, तेव्हा तोच बोलायला सुरवात करायचा, सुरवातीला ती ओशळायची,बोलताना दबकायची..!! पण वेळेनुसार त्यांची अनोळख मैत्रीत बदलली. तिचा तो चांगला मित्र झाला,घरी येण-जाण वाढलं, एकमेकांशी गुंतले गेले, प्रेमात पडले..!!तीन वर्षाच्या ओळखी नंतर त्यानी प्रेम व्यक्त केलं..!! ती तर जणू वाटच पहात होती त्या दिवसाची..!!


प्रेमात पडल्यावर जणू त्यांना स्वर्गच गवसला होता, त्यांच्या प्रेमाची भनक घरीही लागली होती, आणि घरच्यांचाही काही विरोध नव्हता, खूप कोवळ्या वयात ती दोघे प्रेमात पडली होती आणि हेच प्रेम जाणत्या वयापर्यंत जपलं होत.. आणखी ४-५ वर्ष प्रेमाला लग्नाच्या नात्यात बांधायला कुठेच अडथळा नव्हता..!!


पण नियती..!! तिचा खेळ आपण कधीच ओळखू शकत नाही..!! भविष्याची स्वप्ने ती दोघे रंगवत होती, नियतीच्या डावा पासून- अनभिज्ञ..!!

***

आणि एक दिवस, त्याचा मोबाईल बंद होता,तिच्या एक्झाम मुळे गेली १५ दिवस ती त्याच्याशी बोलली नव्हती,एक्झाम संपली आणि पहिला कॉल त्यालाच केला आणि मोबाईल बंद..!! “कसं शक्य आहे..??, काय झाल..??” तेव्हा हजार शंका-कुशंका पेटल्या होत्या..!!

त्याच्या घरी गेली, दाराला भलमोठ कुलूप. “का..?? कुठे गेला..?? जाताना कुणी कुणाला काही सांगितलंच नाही..!!”

तेव्हाच्या या प्रश्नांना तिनी त्यानंतर रोज उत्तरे शोधायचा प्रयत्न केला, पण कुठे काही सापडतच नव्हत.. काय झाल पंधरा दिवसात कुणालाही कशाचाच थांगपत्ता लागत नव्हता..!!

ती वाट पहात राहिली, नंतरचे पंधरा दिवस, एक महिना, तीन महिने, तिचा निकाल लागला ती पुढच्या शिक्षणासाठी पुण्याला आली. कुण्याच्या येण्या-जाण्याने आयुष्य संपत नाही, आयुष्य नदीसारखं प्रवाही असतं,अडखळत पण थांबत नाही..!

पुण्याला आली, त्याच्या बंद नंबर वर रोजचा एक कॉल ठरलेला,चुकून तरी त्याला कॉल लागेल, उचलेल तो,कुठे आहे सांगेल.. अशीच आणखी पुढची ३ महिने निघून गेली.!

आणि आज त्याच मयंक चा कॉल..!!!!

***

त्याला भेटली तेव्हाची ती, त्यानी सोडली तेव्हाची ती, आणि आज पुन्हा भेटणार तेव्हाची ती..!! तो येईपर्यंत ती कठोर झाली होती..!! तिच्या आईने कॉल करून सांगितले तेव्हापासून ती वेड्यासारखी आपल्या मोबाईल कडे टक्क डोळे लावून बसली होती..!!

डोक्यात आणि मनात शून्य विचार होते, सर्व भावना सुन्न झाल्या होत्या ती निर्जीव झाली होती..!!

सायंकाळी आठ वाजता त्या बंद नंबर वर कॉल करायच्या सवयीने तिनी हातात मोबाईल घेतला आणि अनोळखी नंबर वरून कॉल आला! तिला खात्री पटली हा तोच आहे, हृदयाचे ठोके वाढले, डोळ्यात आसवे तरळली. तिच्या नकळत तिनी तो कॉल उचलला, तिला काही बोलायची गरज नव्हती आणि तिनी काही बोलावे अशी त्याची अपेक्षाही नव्हती. त्या दोघांमधली शांतताच बरच काही बोलून गेली..!!

एकमेकांचे आवाज ऐकण्यासाठी दोघही आतुर झाले होते पण शांतात जास्त हवीशी वाटत होती,पण समोरची व्यक्ती रडत नसावी ही इच्छा दोघेही मनात घेऊन होते..

शांतता तोडत तो म्हणाला, “रागावली आहेस..??” तेव्हा तिनी फक्त नाही अशी मान हरवली, त्याला दिसणार तर नव्हतेच,पण शब्द तर जणू तिच्या साठी हरवलेच होते..!!

तोच पुढे म्हणाला, “ बोलणार नाहीस..?? खूप काही बोलायचं आहे ना..?? खूप काही विचारायचं आहे ना..?? तुझ्याच प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी कॉल केला आहे मी आज..!!मी कुठे गेलो असा..?? काय झाल कि अचानक नाहीसा झालो, वैगेरे.. प्रश्न आज माझ्या साठी महत्वाची नाहीत, फक्त एक गोस्ट नक्की तुला दुखवायचे म्हणून मी यातले काहीही केले नाही. मजबुरी होती माझी..!!इतके दिवस मी तुझ्या शिवाय कसा जगलो याचे स्पष्टीकरण द्यायची मला गरज नाहीये, फक्त एकच सांगेन खूप कमी वेळ राहिला आहे माझ्याजवळ..!! मी तुला धोका वैगेरे दिला असे वाटू नये म्हणून मी हा कॉल केलेला आहे..”

तो बोलताना ओघळणारे अश्रू, कानावर पडणारे त्याचे शब्द आणि गेल्या सहा महिन्यात अधे-मधे त्याच्या बद्दलच्या ऐकलेल्या काही अफवा यांचे संदर्भ ती लावत होती. आणि या संदर्भातून गेल्या सहा महिन्यातली एक शृंखला जुळली होती..!! आणि आताशा तिला ‘माझ्या जवळ जास्त वेळ नाही’ चा अर्थ समजला होता..!

त्याचे बोलणे मध्येच थांबवून ती, “आता आहेस कुठे तू..?? मी येते तिथे,बाकी काहीही बोलू नकोस..!!” तिच्या आवाजानी तो अगदीच तृप्त झाला..!!

तो, “काय करणार तू हे सर्व माहिती करून..!! काय करणार तू माझ्याजवळ येऊन..!! उलट त्यानी सर्व गोष्टी कठीण होऊन जातील दोघांसाठीही..!!”

ती हे सर्व समजण्याच्या मन:स्थितीच नव्हती..!! ती, “मला हे काहीही माहिती नाही, तू फक्त मला सांग..!!”

तो शांत..!!
आणि आता तीही शांत..!!

त्याला भेटण्याचा आवेग किती दाटला हे तिचे तिलाच माहिती,तिनी भेटावे ही तीव्र इच्छा असतानाही नाही म्हणतानाचा त्रास त्यालाच माहिती..!!

 पुन्हा दोघातील शांततेचा भंग करताना तो, “आजही आवडतो मी..?? आजही प्रेम करते माझ्यावर..??”

ती, “नाही..!! नाहीच करत..!! तुझ्यावर प्रेम करण्यासाठी काही कारण ठेवलय का तू..??”

तो, “माझ्याजवळ जीतके दिवस राहिलेत तितके दिवस रोज मी तुला हा प्रश्न विचारणार.. कुठलही कारण असावं असं आपलं प्रेम नव्हतच..!! तेव्हा मी प्रेम व्यक्त केलं होत आता तुला करायचे आहे..!! तू जे आता बोललीस ते फक्त रागात हे समजतय मला, फक्त राग बाजूला ठेवून म्हण कि तू आजही प्रेम करतेस माझ्यावर..!! U still love me...!!”

ती, “नाही करत..!! नाहीच..!!”

दबलेला हुंदका निघालाच, तोही अश्रूमय झाला..!!

तो, “उद्या बोलू.. करतो कॉल..”

पण नियती..!! नियतीचा खेळ..!! तिच्या प्रत्येक डावापासून अनभिज्ञ असतो आपण..!!
***


त्याचा कॉल ठेवून जास्तीत-जास्त एक तास झाला असेल, तिच्या चुलत भावाचा sms आला, “Mayank is no more”

तिच्यावर आभाळ फाटल्यासारख ओझं कोसळलं – न बोललेल्या शब्दांचे, असतानाही व्यक्त न केलेल्या प्रेमाचे..!

तो गेला..!!सर्व संपल..!! उद्या बोलताना हे बोलेल ते बोलेल अशी रंगलेली स्वप्ने अशी क्षणात तुटली..!! त्याच्या मृत्युनंतर ती ओक्साबोक्सी रडेल असे तिलाही वाटत होते पण तिची इच्छा असतानाही डोळ्यातून एकही अश्रू गळत नव्हता..!!

त्याला फक्त “I Love You” ऐकायचे होते आणि ती फक्त हेच बोलू शकली नाही..!! तिला फक्त तिरस्कार जाणवत होता, स्वत:चा, न बोलल्याचा, बोलल्याचा, प्रेमाचा ,शब्दांचा आणि स्वत:च्याच रागाचा..!!

या तिरस्काराखाली मात्र एक मन ओरडून ओरडून सांगत होते, “I Love You..!! I Really Do..!!”



Wednesday 7 May 2014

एकदा त्याने आरशाला विचारले

एकदा त्याने आरशाला विचारले,
“कसा दिसतोय..??"
त्याने स्वत:च्या डोळ्यात खोलवर पहिले,
थोडा भ्यायालाच, कारण-
त्याला दिसली नाही आपल्या,
डोळ्यात पूर्वी सारखी चमक..
आणि-
नव्हती त्याचा आवाजात, नेहमीची धमक..

पुन्हा एकदा, त्याने आरशासमोर डोळे विस्फारले..!!
म्हणाला, “काय बघतोय..??"
आणि डोळ्यात त्याला दिसले-
करत असलेले आपणच परिवाराचे हाल,
आणि गमावलेले स्वत:चे गाल..!!
त्याला आठवत होता त्याचा हरवलेला काल..!!
पण तेवढ्यातच चुकचुकली भिंतीवरची पाल..!!

पुन्हा एकदा,
त्याने आरशामध्ये डोकावले..!!
आता त्याने काय बर पहिले..??
भिंतीवरील हसत होते जाळ,
कानाजवळ वाजत होते टाळ,
जणू जवळ येत होता त्याचा काळ..!!

पण अचानक,
पुन्हा एकदा, त्याने आरशात पहिले..
तेव्हा हसत होता त्याच्या समोरचा आरसा,
त्याला चिडवत होता त्याचा तो आसरा..!!
 हातात असलेल्या दारूच्या बाटलीने,
आपल्या दारिद्र्याच्या कारणाने,


त्याने केले आरशाचे तुकडे तुकडे..!!
नशिबही तसेच फुटके फुटके..!!
आता तर,
हसत होते आरशाचे शंभर तुकडे,
रडत होते नशीब बिचारे फुटके,

आणि जवळच,
मिसळत होते-
डोळ्याचे पाणी, दारूच्या प्रवाहात..!! 




[२००९]

Sunday 4 May 2014

मी सर्व लढाई खरेपणाने जिंकणार आहे..!!

एक खेळ बदनामीचा, मीही खेळणार आहे..!!
मनात लपवून ठेवलेला, बदला घेणार आहे..!!

तू विना चेतावनी, मला उद्वस्त केले जरी,
सरसकट मी आज तुला, आव्हान देते आहे..!!

मला दोष देत,निघून जाने, इतकेही सोपे नसणार,
एका-एका अश्रूचा हिशोब, मी घेणार आहे..!!

प्रचंड सुडाची आग खदखदत आहे खरी,
पण प्रेमाच्या जखमा मी प्रेमानीच देणार आहे..!!

मनात जो दिसतो तो फक्त रागच नाही,
तिरस्कारही, मी तुझ्यासाठी सांभाळला  आहे..!!

जन्मभर सोसाव्या लागतील तुलाही काही वेदना,
जाताना याची खात्री,मी नक्की करणार आहे..!!

तुझ्यासारखी खोटेपणा वर माझी नीव नाही,
मी सर्व लढाई खरेपणाने जिंकणार आहे..!!

Friday 25 April 2014

मला आत्ता समजत आहे..!!

तेव्हा चुकला नव्हतास तू,
मला आत्ता समजत आहे..!!

“माफ कर”, म्हणून मला
तू आत्ता लाजवतो आहे..!!

कसुरवार दोघेही नाहीत, कारण
एकमेकांचे लहानपण आपण जपतो आहे..!!

निरागसता दोघांची आता समजली,
मुद्दाम काही अंतरे आपण ठेवतो आहे..!!

स्वार्थी नव्हतास रे तू, फक्त
तुला कधी एकटे राहण्याची सवय आहे..!!

तू, विचारातही दुखवू शकत नाहीस मला,
ही तर शांतता खुपणारी, वेदना आहे..!

कुठल्याही वर्षाचा हिशोब, नकोच ठेवूयात,
वेळेत बांधावे इतके परके, का आपण आहे..??

गैरसमज मी जास्त बाळगत नाही,
शेवटी तूच माझा खास दोस्त आहे..!!

Monday 21 April 2014

माघार स्विकारणारी, मी नक्कीच नाही..!!

जीव ओवाळण्याचा मूर्खपणा एकदा झाला,
त्याच त्या चुकांची पुन:वृत्ती नाही..!!


इथे तर घट्ट धरलेले हातही दुरावतात

दु:खात त्या  मुळात बुडणारच नाही..!!


द्यावे नियतीने तिला हवे तशे घाव,

वेदनांची या कधीच तक्रार नाही..!!


आयुष्याने नेहमीच विरोधाभास दिलेत,

त्यांच्या जाळ्यात पुन: अडकणार नाही..!!


आव्हानांना या हसू नकोस, जीवना..!!

तुझ्यासमोर आता झुकणार नाही..!!


थोडा वेळ थांबेल कदाचित, पण-

माघार स्विकारणारी, मी नक्कीच  नाही..!!



Sunday 20 April 2014

काही मुक्तछंद

शब्द असते तर,
अर्थ तरी लावला असता,
पण-
शब्दच नाही..!!
मग प्रश्न पडतो-शांततेचा..??

शांत माझा मग संयमी गोंधळ..!!
***
ओल्या धुक्यात चिंब व्हावं
तसं काहीसं होतं..!!
जेव्हा तू माझा आहेस,
हे स्पष्ट होत-
तुझ्या डोळ्यातून..
तसच शब्दानीही एकदा बोल..!!
***
तू आला नाहीस,
कदाचित-
येणार पण नाही..
पण,
तुझी आठवण
केव्हाचीच आलीय,
सकाळच्या पहिल्या-किरणासोबत..!
***
मी स्वत:च ठरवलंय,
स्वप्नातून सत्यात येताना,
फक्त-
नावा पुरतेच,
तुझ्यात उरायचे...!!
***
खूप मोठा
फरक आहे..!!
तू आणि मी चा..!!
***

चार ओळी [३]

म्हटलं जरा
शांत बसावं-
आपल्यात आपण
मुकं हसावं..!!

जमलंही काही
चुकलही काही
गोंधळात गप्प

दिसलही नाही..!!
***
भयंकर शांतता
पसरली वाटते तिथे..
कागदाचे फडफडणे ही
व्यतीत करतय इथे..!!
***
तू हवा होतास मला!
आकंठ तृप्तीने न्हाहून,
पवित्र होण्यासाठी..!!
आणि पूर्णत्वाने,
तुझी होण्यासाठी..!!
***
“कशी आहे..??”
अशीच आहे..!!
“माहिती आहे..!!”
***
निघून गेलास.. हरकत नाही...
फक्त-
भास ठेवून का गेलास..??
प्रश्न आहे.. तक्रार नाही..
***

Monday 14 April 2014

कशे सुचले हे माझे शब्द..??

रात्रभर जागले माझे शब्द..!!
आतुरतेने दाटले माझे शब्द..!!

निखळ त्या हसण्यात तुझ्या 
बरसून गेले माझे शब्द..!!

उगाच मला का अशे वाटले,
तुलाच गीरवतात माझे शब्द..!!

अर्थ तू चुकीचा काढलास,
आणि दोषी ठरले माझे शब्द..!!

हिणवून तू फक्त नजरेने,
बदनाम केले माझे शब्द..!!

तू भेटलास अचानक इथे,
आणि लपले  माझे शब्द..!!

तुझ्या सारखाच मलाही प्रश्न,
कशे सुचले हे माझे शब्द..??