Saturday 7 March 2015

बोगनवेल

दिसायला नाजुक,
सुंदर अगदीच,
मन मोहवून वैगेरे टाकणारी..
शोभेची वस्तू..
इतकच महत्त्व पण- बोगनवेलीचं...!

तसच,
दूरून सर्व सुंदर आहे आपल्यात!
पाहणार् या च्या डोळ्यांना
छानच वाटावे असं..
जशे जवळ येवू-
तोच तो पणा जाणवेल,
सुगंध नाही,
रंग एकच-छटाही नाही..!!

प्रत्येकाच्या घरी अन मनातही
असतेच एक,
हवी पण नकोशी,
काटेरी पण तरलच - बोगनवेल..!!

कुणी एक भेटावा,
दावा करणारा..
त्याच्या जीवनातील बोगनवेल नकारणारा..

माझ्या - तुझ्या अंगणातील
त्याच वेलीची शपथ,
मुळासकट उखडून टाकेन,
घरातून आणि मनातुनही
तुझी -माझी...
....बोगनवेल...!!



Thursday 5 March 2015

डायरीतील एक पान

अथर्व
तिच्याशी लग्न करायचा माझा निर्णय अगदी पुर्ण बरोबर होता. माझं पहिलं प्रेम-आनंदी-आता माझी बायको, सहचारीणी.! तिला माझ्या मनातील कुठल्याही गोष्टीचे स्पष्टीकरण द्यावे लागत नाही. आमच्यात सर्व सुंदर आहे. कुठल्याही भावनांसाठी कधीच शब्दांची जुळवाजुळव करावी लागत नाही. खुप समजुतदार आहे ही- सुरवातीपासूनच-अगदी आमच्या पहिल्या भेटीपासून.! मध्ये झालेले वाद फारच नकळत्या वयात झालेले. त्यांना अर्थही नव्हता. फक्त एक नाममात्र दुराव्यची भिंत उभी राहीली होती. पण मी तीला लग्नाची मागणी घातली आणि त्यानंतर आम्ही दोघे कधीच वेगळे नव्हतो, कधीही वेगळे होणार नव्हतो..तीनी लग्नाला होकार देण्याआधीच मी तीला सुगंधा बद्दल सर्व सांगितले होते. आनंदी आणि माझ्यातल्या काही वर्षाच्या अंतरामुळे सुगंधा माझ्या आयुष्यात आली, मला आवडणारी माझी मैत्रिण.!
सुगंधा-तिची ओळख करुन देण्यासाठी 'गोंधळ' हाच योग्य शब्द असू शकतो. नेहमीच कुठल्या ना कुठल्या गोंधळात अडकलेली, साध्या-सरळ गोष्टींचा पण गुंता करणारी, शब्दांचा गोंधळ सारा, नंतर तो गोंधळ सोडवताना आणखी जास्त गुंता. माझ्याही भावनांची उलथापालथ करणारी तीच..! नकळत मला आवडायला लागली होती ती, तीलाही मी - कारण तिचे डोळे सांगायचे तशे, मी टाळायचो तिच्या भावनांना, मला तिच्यात अडकायचे नव्हते, प्रेम एकदाच होते मी या मतांचा आणि मला तर प्रेम होउन गेले होते, पुन्हा होणार नव्हते, किंवा होउ द्यायचे नव्हते.! जे काही होते..!!
सुगंधानी तिच्या भावना व्यक्त केल्यावर मी नकार दिला नाही किंवा होकारही दिला नाही. मी माझ्याच तिच्यासाठीच्या आणि आनंदीसाठीच्या या दोन भावनांमध्ये अडकलो होतो. नेमक प्रेम कुठल हे समजून घेण्यात गुंतलो होतो..प्रेम अस समजून घेतल्यानी कळत नाही हे तेव्हा समजल जेव्हा सुगंधा एका नाजूक क्षणी मला सोडून गेली. जाताना तिने नक्कीच मागे वळून बघीतले नसणार, कारण तेव्हा मी न देताही माझा नकार तिला मिळाला होता, मीही पाठलाग करु शकलो नव्हतो कारण माझ तिच्यावर नाही आनंदी वर प्रेम आहे, हे मला तेव्हा कळाले होते..
आयुष्य म्हणजेही साला गोंधळच असतो, हा गोंधळ तिनी एका क्षणात सोडवला.. प्रेम की  आकर्षण? आनंदी की सुगंधा.? ही सर्व प्रश्ने सोडवली आणि नाहीशी झाली. मी पुन्हा दिसली तरी तुला ओळखणार नाही हे वचन काहीही न बोलता देउन गेली..
........

आनंदी
दोघेच एकमेकांच्या धुंदीत, सातवे आसमानवर म्हणतात ना? त्या भावना आम्ही अनुभवत होतो. माझ्या गळ्यातले काळे मणी अथर्व च्या नावचे आहेत, किती मोठ भाग्य माझ.! दोन वेगळ्या विचारांचे, अगदीच दोन टोक असलेलो आम्ही एकमेकांचे झालोत!
सगळ स्वप्नवत: मिळाले मला! तो माझ्याकडे परत येईल अशे वाटतच नव्हते,आमच्यात दुरावेच तशे निर्माण झाले होते.. गैरसमजुतीनी जवळ जवळ आमच्यात कळस गाठला होता.
तरीही जुने वाद विसरुन तो आला, त्याने लग्नाची मागणी घातली. त्याला नाही म्हणायची हिंमत नव्हतीच माझ्यात, मला माझे आणि त्याला त्याचे पहिले प्रेम मिळाले..
अर्धांगिनी झाले मी त्याची..!
त्या दिवशी आम्ही बाहेर भटकत असताना, त्याने हातात हात पकडला होता! पहिला पाउस नुकताच पडून गेला होता. मातीचा मंद-मंद सुगंध सर्वीकडे दरवळत होता, आमच्या नेहमीच्या गप्पा रंगल्या होत्या. आमच्या पकडलेल्या हाताकडे जाणार् या - येणार् या लोकांच्या नजरा पडत होत्या, पण दोघे एकमेकांत इतके गुंतलो होतो की जगाचा विसर पडावा जणू..!
फक्त ती दिसेपर्यत, त्यानी मला पहील्याच दिवशी सांगितलेली ती-सुगंधा!
कधीही प्रत्यक्ष तिला पाहता आले नाही. आमच्या लग्नातही ती आली नव्हती. अथर्वनी तिचे केलेले वर्णन आणि मी तयार केलेली आकृती,अगदी तशीच आहे ती! बोलक्या डोळ्यांची अन अगदी बेफिकीर, सावळी थोडी आणि चंचलही. तिथल्या गर्दीतही स्वत:च्या साधेपणाने पटकण दिसणारी..!
अथर्वला ती आधी दिसली. तो थांबला आणि पर्यायाने मीही..त्याची नजर सुगंधावर स्थिरावली होती, कुठल्यातरी अपेक्षेत, तिनी ओळख दाखवावे ही साधी अपेक्षा कदाचीत! त्याच्या डोळ्यात एक वेगळाच आवेग मला दिसत होता, या आधी कधीही न पाहीलेला!
ती फोनवर कुणाशी तरी निर्मळ हसून बोलत होती आणि एका क्षणी त्यांची नजरानजर झाली.. तिच्या डोळ्यात तेव्हा शून्य भावना गोळा झाल्या, ती हसली नाही, दोन मिनटांआधी फोनवर लहान मुलासारखी हसणारी ती एकदम गंधीर झाली! तिनी त्याला ओळखले हे नक्की पण ती ओळख त्याच्या पर्यत पोहचू द्यायची नव्हती-हा तीचा अट्टहास! तिनी त्याची नजर चुकवली;ओळख लवपली.!
मी आमच्या हाताची मीठी सैल करतच होती, तर तीची ती नजर आमच्या दोघानी एकमेकांच्या पकडलेल्या हातावर होती. मी हात सोडवत होती अथर्वच्या हातातून, त्यानी बोलाव तिच्याशी, गुंता त्यांच्यातला सोडवावा एकदाचा. पण माझा निसटत जाणारा हात, तेव्हा त्याने घट्ट पकडला, आणखी घट्ट!!
खरतर, मी आता कुठेही त्याच्या पासून दूर जाणार नव्हती, पण त्यानी पकडलेल्या हातात ती भिती जाणवत होती.. त्यानी घट्ट पकडलेला हात तिनी बघितला- आणि सरळ चालली गेली, अनोळखी बनून..!!
.......

सुगंधा

माझ्यातले मी पण हरवता येत नाही आणि त्याला मी जशी आहे तशी स्विकारता आली नाही. "अथर्व, मी प्रेम करते तुझ्यावर." मी असे बोलली तेव्हा होकर किंवा नकार दोन्ही पैकी काहीही दिला नाही त्यानी..
मला माहीती होते, त्याला वाटते की, प्रेम एकदाच होते. दुसर् यांदा झाले तर, एकतर पहीले जे वाटले ते प्रेम नसते किंवा दुसर जे वटले ते तरी!  माझ्यावर की आनंदीवर कुणावर प्रेम करतो, हे त्याला समजत नव्हते. आणि हे त्यानी प्रामाणिकपणे मान्य करणे - या गोष्टीमुळेच मला तो जास्त आवडायला लागला! नाहीतर वाहत जाउन होकार दिला असता किंवा तावातावात नकार तरी, पण त्यानी दोन्हीही केले नाही. त्याला त्याचच मन समजत नव्हत, भावनांची उलथापालथ झाली होती..
त्याच्या गोंधळाचे उत्तर शोधण्यासाठी आणि पर्यायानी मलाही माझे उत्तर मिळवायचे होते.. गोष्टी मिळण्यापेक्षा मिळविण्याचा आनंद हवा असतो मला!
म्हणून, मी सिमा ओलांडायचे ठरवले. मला तो माझाच हवा होता, पण जबरदस्तीनी नाही. मनानी, त्याच्या मनानी! त्या दिवशी, office संपवून अथर्व मला भेटायला आला. तेव्हा मी त्याच्या खूप जवळ गेले. अगदी एकमेकांना आमचे श्वास एकायला येतील इतकी जवळ. माझ्या हातानी माझ्याही नकळत त्याला अलिंगण घातल होते, हृदयाचे धडधडणे वाढले होते,डोळे किलकिले झाले होते, वाटलच तो माझा आहे! एक क्षण सर्व थांबले होते, त्याचे डोळे मिटलेले होते, पुढच्या क्षणी त्याचे ओठ, माझ्या ओठांवर असतील कदाचित, तेव्हा हळू आवाजात तो पुटपुटला  "Love you, Aanandi."
त्याच्या मिठीत मी - ओठांवर तिचे नाव..! संपले सर्व, मला माझा नकार मिळाला! कदाचित त्याला त्याचे उत्तरही!! मला नकाराचे शब्द त्याच्या तोंडून एकायचे नव्हते. माझे अश्रू त्याला दाखवायचे नव्हते, माझ्याकडे तेव्हा एकच मार्ग होता, तिथून निघून जायचा, त्याला माझ्यात गुंतवायचे नव्हते आणि मलाही गोंधळ वाढवायचा नव्हता..!!
त्याचे आणि आनंदीचे लग्न झाले, मला आमंत्रण मिळालेले, पण कुठल्या तोंडानी जाउ!
त्या दिवशी ती दोघे अचानक पुढ्यात उभे राहीली.. ती आनंदी..! जीचा हात त्यानी घट्ट पकडला होता ती.. तीला मी माहीती तरी असेल का..?  काय विचार करत असेल ती माझ्याबद्दल..?? नुसता गोंधळ !!
त्यानी तिचा हात असाच घट्ट पकडून ठेवावा, त्याच्या आणि तिच्यात मला कधीही यायचे नाही. एक अनोळखी म्हणून किंवा एक मैत्रिण म्हणून पण नाही..!  काही घटकांच्या या नजर भेटीनी कुठलाही गोंधळ उडू नये.
.....

अथर्व

चुकून सुगंधाला असे तर वाटत नसेल ना की तीनी जे नको करायला हवे होते ते केलय..! आमची पुन्हा भेट होइल हे माहीती होते, मी आणि आनंदी सोबत असताना ती समोर उभी राहीली-योगायोगानेच..!
आनंदी ला कळाले होते की, माझी नजर जिथे खोळंबली तीच ती - सुगंधा, जिच्या मीही प्रेमात पडलो होतो. माझा पकडलेला हात सैल करत होती आनंदी, पण हे सुगंधाला आवडणार नाही हे माहीती होते मला, म्हणून आनंदीचा हात घट्ट पकडला मी..!
सुगंधा एकदा म्हणालेली आठवते,  प्रेम करावे, प्रेमात पडू नये! मी आनंदीवर प्रेम करतो आणि सुगंधाच्या प्रेमात पडलो आहे. सुगंधानी माझा गोंधळ सोडवला. त्यानंतर आमच्या नात्याला मैत्री वैगेरे नाव न देता दूर निघून गेली..!
.....

आनंदी

आमच्या गुंफलेल्या हाताकडे बघीतले आणि सुगंधा निघून गेली. पण तिनी वळून बघीतले आणि मिही! तेव्हा तिच्या डोळ्यात तिच अपेक्षा होती-साधी अपेक्षा! अथर्व मागे वळून बघेल हीच.. पण तो फक्त आमच्या हाताकडे बघत होता - समाधानानी..!!
तो-मी-ती..!!
त्यानी मला निवडले,नंतर तिनी त्याला कधीही न ओळखायचे ठरवले.! खूप जिद्दी आहे ती.! आता खरतर या काही वर्षानी तिनी बोलायला हवे होते त्याच्याशी..
तो वळून बघणार नाही ही खात्री झाल्यावर तिनी माझ्याकडे पाहीले! माझ्या नजरेत तिला काय दिसले तिच जाणे. फक्त ओठांनी नाही डोळ्यांनी देखिल हसली ती. गळत असलेली तिची आसवे दु:खाची, विरहाची किंवा वेदनेची नव्हती.. खर् या मैत्रिणीची होती, फक्त निर्मळ आनंदाची होती..
माझ्याकडे बघून हात हलवून ती निघून गेली. तिची पाठमोरी आकृती खूप आत्मविश्वासी वाटत होती.तिचा निर्णय बरोबर होता, आणि याचा पुरावा तीला मिळाला होता.
नंतर माझा पकडलेला हात आणखी घट्ट करून, मी आणि अथर्व  शांत चालत होतो.. चालताना अचानक तो थांबला, सुगंधा गेल्यानंतर पहिल्यांदा त्याने डोळ्यात-डोळे टाकून बघितले, माझ्याशी बोलला काहीच नाही, फक्त मिठित घेतले, आजुबाजुच्या लोकांचा विचारही न करता..
कदाचित तो तिच्या वेदना समजला होता. तिनी दिलेली त्याच्या प्रेमाची आहुती त्याला समजली होती.. जास्त गुंतायच्या आधीच दूर निघुन जायचा तिचा निर्णय संपूर्ण बरोबर होता. इतकी वर्ष ज्या कारणासाठी तो तिला दोष देत होता, ते चुकिचे होते, हे त्याला समजले होते...
......

अथर्व
आनंदीला मिठीत घेउन, माझे अश्रू लपवत होतो फक्त.. सुगंधा आवडणार् या माझ्यातल्या मला मीच कधी आवडू शकलो नव्हतो..त्या मला ह्या आनंदीनी काहीही तक्रार न करता स्विकारले..
माझ्या डायरित फडफडणार् या सुगंधा या  नावाच्या पानावर तीनी पण केले..
आणखी काय हवय मला..!!
.......

सुगंधा
नेहमीसारखाच तो वळून पाहणार नव्हताच, पण हा इतका माझा वळून बघायचा मोह मला आवरता आला नाही..
त्यानी नाही पण आनंदीनी वळून बघीतले खरे, याचा अर्थ ती ओळखते मला..!! जरी त्याच्या आयुष्यात मी नाही तरी त्याच्या डायरीचे एक पान माझ्या नावानी कोरलेले आहे! हे तिच्या डोळ्यात मला समजले. माझा राग नाही तिला, तीही माझ्यावर त्याच्या इतकेच प्रेम करते..!
या दैव योगात, माझ्या प्रश्नाला उत्तरे आणि त्याच्या डायरीत फडफडणार् या माझ्या नावाच्या पानाला खरा अर्थ मिळाला..!



...वैष्णवी..