Tuesday 20 January 2015

किनारा

एक व्यक्ती आहे,
माझ्यासाठी-माझं सर्वस्व..!
एक अथांग समुद्रच म्हणा ना..!

असा महासागर,
ज्याच्या खोलात जितकं शिरावं,
तितकं वेगळी, आणखी सुंदर दुनिया दिसते..!
पण तेव्हाच-
जिवंत राहण्यासाठी,
वर उंच हवेत येण्याची गरज असते..

असा समुद्र,
ज्याचा तळ सापडला
असं वाटत असतानाच,
धडपडत,
शोध अर्धा सोडून परतावे लागते..!

इतक्यात,
मी तळाशी जाणं बंद केलं आहे,
समुद्राला किनार् यावरुन,
मनसोक्त डोळ्यात भरता येतं..!
आणि जिवंतही राहता येतं..!

किनारा महत्वाचा असतो-बहुधा..!

मला,
माझ्या त्या,
समुद्राचा,
किनारा तरी बनता येईल का..?
त्याचा तळ गाठायचाच नाही,
तळात फक्त मोतीच राहतो,
तो हक्क माझा नाही...

मला फक्त,
त्याचा काठ व्हायचं आहे..
भरती-ओहोटी,
दोन्ही वेदना अनुभवायच्या आहे..
मला त्या समुद्राचा भाग नाही,
सखा व्हायचं आहे
-किनारा बनून.!