Monday 25 December 2017

ओझं



तुझ्या नजरेतून,तुझाच समाज पाहते आहे
माझ्या स्वप्नांना,उडण्याआधी तुटताना पाहते आहे 

घृणास्पद जाती परंपरेत,अडकला आहेस तू 
त्यात माझा बळी, तूच देताना पाहते आहे 

माझ्या प्रेतयात्रेसाठी, माझं घर जाळलं ज्या समाजानी 
त्या गर्दीत, तू मलाच जिवंतपणे जाळताना पाहते आहे 

तुझ्या डोळ्यातल्या पाण्याने, पुन्हा हा समाज जिंकला 
उंबरठ्याच्या विळख्यात, माझा जीव गुदमरताना पाहते आहे 

मला तुझ्यावर जिंकायच नाही आहे - बिलकुल 
माझ्या जखमेसोबत, मी स्वतः जगताना पाहते आहे 

शेवटी, तुझी मान ताठ ठेवण्याच्या ओझ्याखाली 
माझी मान मी स्वतः, झुकताना पाहते आहे 


...वैष्णवी ..

Sunday 19 November 2017

अलगद

माहित आहे.? आमच्या गावाकडे न दुसऱ्या बाईसोबत (बायको सोडून) बाहेर फिरणाऱ्या माणसाला लफंगा / लोफर म्हणतात आणि नवरासोडून दुसऱ्या पुरुषासोबत संबंध प्रस्थापित करणाऱ्या स्त्रीला कुलीटिनी म्हणतात. बहुदा, आज मी खूप लोकांच्या जखमेवर हात लावणार आहे..

विषयाची सुरुवात कुठे झाली ते आधी सांगते. कालपरवा माझ्या वडिलांशी होत असलेल्या संवादाचा शेवट-
मी, "मला लग्न नाही म्हणजे नाहीच करायचं, विषय इथेच संपला!"
माझा बाप, "का पण ?"
बस.! माझ्या बापाचा "का पण ?" डोक्यात चालेल्या गोंधळाला पूर्ण विराम द्यायला पुरेसा होता.

" लग्न " हा शब्द मला व्यक्तिशः खूप पवित्र वाटतो. उच्चारुन पहा एकदा " लग्न ". अगदीच " अलगद " वेगळीच गुदगुल्या वगैरे देणारी भावना शब्दातच दडली आहे. भारतीय संस्कृतीमध्ये लग्न म्हणजे फक्त विधी-सोहळा नाही. लग्न म्हणजे भावना आहे. समोरच्या व्यक्तीला आपल्या आयुष्यातील अर्धांगिनी वा सहसोबती - नवरा बनवण्याची भावना, प्रत्येक छोट्यातील-छोटी सुख-दुःखे सोबत अनुभवने म्हणजेच लग्न. मला वाटतं नवरा-बायको म्हणजे नातं नसतं,लग्न म्हणजे नातं असतं... 

खूप जुनाट विचार वाटतो आहे का?  कारण अश्या लग्नात बंधने जाणवतात. आजकाल ट्रेंड मध्ये असलेली स्पेस (मोकळीक)नसते, one night stand  वगैरे संकल्पनाच नसते. फक्त ती किंवा तो आणि तुम्ही..! काळानुसार लग्नाची व्याख्या बदलली आणि सोहळ्यासहित होणाऱ्या प्रथा आता show off झाल्यात; बरं इथपर्यंत सर्व ठीक आहे, पण " लग्न " या नात्यातला अर्थ बदलला. आधी जी पवित्रता म्हणून बघितल्या जायचं तो दृष्टिकोन जुनाट म्हणून गणल्या जातो.आता लग्न म्हणजे भावनिक कमी आणि प्रॅक्टिकल फार झालंय.

लग्नाच्या १०-१२ वर्षानंतर तुम्हाला एक मुल असतानाही तुम्ही नवऱ्या व्यतिरिक्त दुसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित कशे होऊ शकता?  फार विचार करण्यासारखी बाब आहे असं मला सारखं वाटायचं, पण तीच स्त्री किंवा तोच पुरुष, 'अरे आता हे कॉमन आहे सर्वीकडे असंच चालतं' किंवा 'क्षणिक होतं ते -प्रवाहात वाहून गेलो ', अशी उत्तरे देतात तेव्हा रक्त असं फार उसळून येतं.

जेव्हा तुम्ही लग्नात एकमेकांशी बांधले जाता ना; तेव्हा नाही तुमचं मन विचलित होत, नाही तुम्हाला कुठला प्रवाह वाहून घेऊन जात..!  कारण जर लग्न तुम्हाला खरंच समजले असेल तर ते तुम्हाला "अलगद" जपतं.. अगदी तुमचे बाहेरचे प्रकरण माहित असतानाही तुम्हाला कुशीत घेऊन डोळ्यातील दाटलेले पाणी ती "अलगद" लपवते ना तसं.. 


...वैष्णवी..
#एकसावली #जगण्याचीधडपड 


Monday 20 March 2017

कवीची रात्र


तो तिच्यासाठी जागतो
ती त्याच्यासाठी जागते
बरोबर आहे ते सर्व..
पण-
एखादी रात्र कविचीही असते!
तोही जागा असतो
मंद-मंद प्रकाशात
सुचत असलेली शब्दांची रचना-
लुकलुकणाऱ्या ताऱ्यासारखी फक्त न्याहाळत,
कुठेतरी जागत असलेल्या-
त्याच्या किंवा तिच्या भावना चंद्रप्रकाशात अनुभवात..
प्रेमाची अशी,
एखादी रात्र कविचीही असते!

वयात आलेल्या,
अन लग्न जुळत नसलेल्या,
पोरीच्या काळाजीपायी,
झरोक्यातून येणाऱ्या चंद्रप्रकाशात-
शून्यात हरवलेला बाप रात्री जागत असतो..
त्याच बापाची तुटत असलेली,
एक-एक क्षणाची आस जोडत असतो..
तेव्हाच एखादा कवी-
त्याचीच काळजी स्वतःत जपणारी,
ती एखादी रात्र कविचीही असते!

मागच्या बागेतल्या आंब्याच्या झाडावरचा-
रातकिड्यांचा आवाज !
इतक्या वर्षानंतरही चर्रर्रर् करतो-तिच्या हृदयात..
पहिल्यांदा या वृद्धाश्रमात सोडून गेलेला मुलगा,
आजपर्यंत एकदाही भेटीला आला नाही..
त्या आठवणीत आपले अश्रू,
एक आई शांततेत गाळत असते..
तेव्हा तीची ममता,
कागदावर उतरवायला सरसावला असतो-तो कवी!
ती रात्र-
त्या कविचीही तेवढीच असते ..!!

'माझं प्रेम नाही तुझ्यावर,
आपलं लग्न नाही होऊ शकत',
तो सरळ तोंडावर म्हणून निघून जातो..
किती सरळ सोपं असतं त्याला,
दिलेलं सातजन्माच वचन तोडून निघून जाणं..
तिचं तीळ-तीळ तूटणार मन,
रात्रीच्या अंधारात स्वतःच्या कवितेत,
जपत असतो एक कवी..!!
त्या विरहणी एवढीच,
ती रात्र कविचीही तेवढीच असते!

खिडकीतून दिसणाऱ्या रस्त्यावरच्या दिव्यातून,
कवी भरकटत रात्र जागतो!
खोलीचा चालू असलेला दिवा-
गुरखा,
"तिथला वेडा!
काही तरी बरवडत असेल कागदावर..",म्हणत निघून जातो..
त्यानी वेडा म्हटलं की,
कवी जिवंत होतो..
रात्र जागृत होते!
बस्स् ती तशीच रात्र,
वेडावलेली एखादी रात्र कविचीही असते..!

...वैष्णवी..
#आणि_वादळ_आले