Tuesday 23 January 2018

घाव

तुझ्या अंगणातल्या कोपऱ्यात 
एक कुंदाच्या फुलाचं झाडं होत.!
आठवते का तुला..?
माझ्या आठवणी अजूनही तश्याच-
सकाळी अंगणातील फुलं गोळ्या करण्याची धडपड,
त्याच फुलांच्या सुगंधात मी त्या झाडाचं फुलं बनली..    

तुझ्या समाजानी काय केलं सांगू?
ते झाड तोडून टाकलं..कुऱ्हाडीनी..!! 
आणि तू,
हसत हसत स्विकारलाही तो घाव..?

तुझी हाडं,
जी मी वाकवली असा आरोप तू करतोय ना..
ती त्या कुऱ्हाडींनी वाकवली.. मी नाही..!!

मी फक्त वाकलेल्या तुला आधार देऊ शकत नाही..!!
किंवा अशे म्हण कधी देणारही नाही..!!-इच्छाच नाही..

कारण,
मीही शेवटी,
त्या कुंदाचं-एक फुलं ..!  
तुला भार होऊ नये म्हणून झाडावरून गळून पडलेलं..!!


...वैष्णवी.. 
#एक_सावली    

Wednesday 17 January 2018

बंद दरवाज्यामागे

आधुनिकतेचा पुळका चढलेल्या पार्टीत 
कुजलेल्या विचारांमागे,
लपवत आहे हा समाज,
त्याची फाटलेली लक्तरे..!
जसा बंद दरवाज्यामागे 
तू लपवला आहे, 
तुझ्यातला- 
अमानवी मानव..!!


...वैष्णवी.. 
#एक_सावली   

Thursday 11 January 2018

तुझ्याचसाठी..

आजची कविता,
गर्दीत मागे बसलेल्या तुझ्यासाठी..
कोण..? कुठे..? म्हणत-
मागे वळून पाहणाऱ्या तुझ्याचसाठी...

शब्द-शब्द जागवून माझ्यातला
स्वतः मध्ये सामावण्यासाठी..
अन तरंगणाऱ्या भावनांना
आहे तस समजण्यासाठी...

मुखवटा काढून माझा
कुरुपते सहीत स्वीकारण्यासाठी..
नकळत माझं 'मी'पण
तुझ्यात जपण्यासाठी...

आजची कविता
माझ्यातल्या तुझ्यासाठी..
आजची कविता
फक्त तुझ्याचसाठी...


...वैष्णवी..
#एक_सावली

Wednesday 10 January 2018

ध्येय..?

तीचा फोन येतो!
स्वप्न, ध्येय, यश वैगेरे-
आठवून दिले जातात...
पण-
उडायला सांगून
बांधून ठेवलेल्या पंखांच कसं..?
जगण्याच्या धडपडीतच
विस्कटलेल्या जगण्याचं कसं..?
आतमध्ये तुटलेल्या
माणसाचं कसं..?
ध्येयाकडे धावतानाच्या स्पर्धेत
सुटलेल्या हातांच कसं..?
त्याही-पेक्षा
जिवंतपणीच मेलेल्या माझ्यातल्या
'मी'च कसं..?

....वैष्णवी...
#एक_सावली

Sunday 7 January 2018

नाळ

खरं तर,
तू माझ्या जवळ येऊन रडावं
असं काहीही झालेलं नव्हतं.!
तुला विळखा घातलेल्या सापाची,
ताकद तेवढी समजली.!
खूप कीव येते अरे..!!
तुझ्या पडलेल्या विचारांची!!
तुझी ही बाजू समजण्यासाठी-
माझी जन्माची नाळ तोडावी लागली!!
माझ्या-तुझ्या नात्यापेक्षा-
तुझ्यात उतरलेलं समाजातील जातीचं, 
विष जास्त प्रभावी ठरलं..!
खंत वाटते-
तुझ्या मगरीच्या अश्रूमुळे,
क्षणासाठी मीही ढळली... 
पण, रक्ताचा राजकारणी तू.. 
माझ्या भावनेच जातकारण केलंस.... 
आणि,
क्षणार्धात मी होत्याची नव्हती झाली..!
खरं सांगू?
तू माझ्या जवळ येऊन रडावं
असं काहीही झालेलं नव्हतं.!

...वैष्णवी..