Monday 31 October 2011

ही राधा पणती झाली

सौभाग्याचा शाप 
असलेली एक मुर्ती झाली... तुझ्या आठवणीत 

मी आज राधा झाली... 


संपल सर्व वाटत असताना 

एक आशा दिली... 

तुझ्या आठवणीत 

मी आज राधा झाली... 


प्रतिक्षेचा कळस गाठताना 

वेडी फार झाली... 

तुझ्या आठवणीत 

मी आज राधा झाली... 


दिवाळीची ही सांज 

स्वप्नाची रेषा झाली... 

तुझ्या आठवणीत 

मी आज राधा झाली... 


एक दिवा माझ्याही 

अंगणात लाव सख्या... 

तुझ्या आठवणीत 

ही राधा पणती झाली...

मुखवटा

आपल्याच चुका लपवण्यासाठी 
स्वतःची भिती घालवण्यासाठी 

खोटा का होईना 

मनाला दिलासा देण्यासाठी 

"मुखवटा" ओढला स्वतःवर- 

मुखवट्यांच्या जगात 

आणखी एक भर..! 


"मुखवटा" - 

शब्दच किती खोटा वाटतो! 

जेव्हा स्वतःचा विचार येतो! 

मी मला आरशात पाहताना- 

मलाही माझा, 

"मुखवटाच" आवडतो.! 


या मुखवट्यांच्या जगात 

तू मला- 

पुन्हा आरशात पहायला सांगितलं! 

पण आता काहीतरी, 

वेगळच अनुभवलं..! 


माझ्या मुखवट्या मागचं मन 

आणि मनाचं जग! 

खरचं खुप सुंदर आहे.! 

मीच माझं खरं रुप पाहताना 

कधी कधी- 

नव्हे नेहमीच प्रश्न पडले..! 

काही सुटले- 

पण 

काही प्रश्न आजही सतावतात.! 


मुखवट्यांच्या जगातील 

तुही एक नाहीस नं? 

प्रश्न विश्वासाचा आहे न 

म्हणून विचारलं! 


कधी वाटतं 

तुलाही माझा "मुखवटा"च भोवला? 

पण! 

तुच तर 

देवदूतां सारखं येउन 

मला सावरलं.! 

माझा खोटा "मुखवटा" दूर 

सारुन जगायला शिकवलं.!

एक दिवा माझ्याही अंगणात लाव

आज दिवाळी 
एक दिवा माझ्याही अंगणात लाव..! 


जिथे 

तुझी वाट ती तुळस 

आजही बघते.. 

अश्रूंचा अंधार, 

नेहमी साठी घालवण्यासाठी 

तरी- 

एक दिवा माझ्याही अंगणात लाव..! 


जिथे 

तुझ्या स्वागतासाठी ती रांगोळी 

रंगच रंग विस्कटून आहे.. 

डोळ्यात उत्साह पुन्हा येण्यासाठी, 

तरी- 

एक दिवा माझ्याही अंगणात लाव..! 


आज दिवाळी- 

भावनांची उत्कटता संपून, 

मनाची संवेदना थांबुन, 

आयुष्याची नवीन सुरवात म्हणुन, 

तरी- 

एक दिवा माझ्याही अंगणात लाव..!

मी चुकली

आसवलेल्या नयनांनी 
आज मी सुरवात केली, 

आणि अनपेक्षीतच ही 

शब्दांची खेळी मी हरली.! 


पावलं न वाजवता 

भावनांनी डोळ्यात गोंधळ केला, 

मग पुन्हा एकदा 

मनाचा भूतकाळाचा प्रवास झाला.! 


उगचं स्वतःच् नशीब 

स्वतः लिहण्याचा अट्टाहास बाळगला, 

नशीबाचा शिलालेखही 

तीनं सहज फाडला.! 


"स्वतःला जास्तच महत्त्व दिलं" 

या चुकिच्या दबावाखाली, 

आपसूकच अश्रूच्या 

ओझ्यानं माझी पाठ वाकली.! 


झपाटून जगताना मी बदलली 

फक्त मी- 

मला बदल हवाय.! 

म्हणून स्पष्टच बोलली.! 

विसरलीच की- 

झपाटून जगताना मी बदलली 

फक्त मी- 

इथेच 

"मी चुकली..!" 

नदीचा बांध फुटला

आज अचानक वादळ सुटलं, 
खिडकिची काच फुटली.. 

आणि 

माझी झोप जागली.. 

वादळापूर्वीची शांतता भंगली..! 

आणि 

मनातील नदीचा बांध फुटला..! 

नदी जी गेली अठरा वर्ष 

निरंतर वाहत आहे... 

का तिला आत्ताच पूर यावा.? 

तिच्यावर जगणाऱयांना 

उध्वस्त करुन जावा.. 

तिच्या काठावर असलेल्या एका मंदिरात 

म्हणे कुणी आजी पुजेला यायची, 

ती आता नाही.! 

तिचा निर्माल्यही नाही.! 

म्हणून हा पूर- 

पण- 

मंदिरातला देव त्याचा असा का सुड 

का त्यानं पाहिलं नाही? 

नदीच्या तिरावरील निर्दोष जीवांना.! 

एका अनोळखी साठी 

नदीनं आपला संसार का उधळावा.? 

अचानक आजच का वादळ यावं, 

आणि 

खिडकिची काच फुटावी.! 

आणि 

डोळ्यातील नदी वहावी.!

दवं

अनवाणी पायांनी 
आज हलकेच 

हिरव्या दवांना स्पर्श केला 


दवं - भावनांचे 

मनातील कल्लोळाचे, 

भूतकाळातील स्वप्नाचे, 

धकाधकीच्या जीवनाचे, 

हर्षभरीत दवं... 


कोवळ्या नुकत्याच 

जपलेल्या नात्याला 

ओलचिँब करुन गेले दवं... 


गेली अनेक वर्ष 

जपलेल्या जखमांना 

गारवा देऊन गेले दवं... 


मनातील भावनांना 

ओठातील शब्दांना 

डोळ्याचे अंगण देऊन गेले दवं... 


आजच्या रम्य पहाटे 

नजरेतील स्वप्नांना 

पावसाळी आठवण

पावसाच्या सरीत भिजताना 
तुझी आठवण आली.. 

तसाच 

अगदी तसाच 

बरसतो हा पाऊस.! 

जसा तू बरसायचा! 

जेव्हा 

तू नाही म्हणतानाही, 

पावसात भिजायचा, 

माझा हट्ट असायचा.. 

एकदा तर चक्क 

तुलाच भिजवल होत 

मुद्दामच पाण्यात खेचून.. 

किती चिडला होतास 

अगदी लाल लाल 

पण मग नंतर 

हसलाही तसाच 

मिस्किल.! 

माझा रडवेला चेहरा बघून.! 

आता- 

कुणी थांबवत नाही, 

भिजायचं नसलं तरी, 

खूप दूर फक्त, 

एकटीच चालत असते.. 

हं..!! 

पाउस तेवढा बरसतो.. 

तसाच अगदी तसाच, 

जसा तू बरसायचा.. 

एक फुल..!‏

एक फुल, 
पिवळसर गुलाबी 

छटा असलेलं, 

दिलं होतं- 

मी तुला, 

आठवतयं..? 

विसरलाही असशील..! 


फुल फक्त- 

कारण होतं 

तुझ्याशी जुळण्याचं.. 

अन् 

मनान् मनातच 

तुझ्याशी बोलण्याचं.. 


आज 

तसचं एक फुल..! 

कुणी- 

ती त्याला देताना 

मी बघितलं..! 


तेव्हा 

आठवण झाली 

माझ्या फुलाची.. 

अन् 

त्या पानाची सुद्धा 

जे आजही 

जपून ठेवलय..! 


डायरिच्या कुठल्याशा 

आठवणीत- 

तुला फुल देताना 

माझ्या 

हातातचं रेंगाळलेलं- 

इवलसं- 

छोटसं- 

हिरवकंच पान.. 


फुल एक निमित्त होतं 

तुझ्या जवळ येण्याचा.. 

अन् 

ते 'पान' 

नियतीचा इशारा होता 

तु माझा नसल्याचा.. 


एक फुल, 

पिवळसर गुलाबी 

छटा असलेलं, 

दिलं होतं- 

मी तुला..! 



आज 

तसचं एक फुल..! 

कुणी 

ती त्याला देताना.. 

मी बघितलं !! 

सोनपाकळी

हसता हसता 
गालात रुसली 

डोळ्यात माझ्या 

जाऊन बसली 

सोनपाकळी ती कमळाची..! 


बोलता बोलता 

शांत झाली 

मनातील गोष्ट 

डोळ्यात लपवली 

स्वप्नांच्या अन् 

शोधात निघाली 

सोनपाकळी ती कमळाची..! 


बघता बघता 

लपून बसली 

काळजात जाऊन 

आठवणीत रमली 

लाजून अगदी 

चूर झाली 

सोनपाकळी ती कमळाची..! 


चिंब भिजून 

पावसात 

एकटीच उडून 

नभांत 

हळूच हरवली 

स्वप्नात 

सोनपाकळी ती कमळाची..!

Monday 24 October 2011

हिरवं पान..!

भरगच्च
पानगळीच्या
रस्तावरुन चालताना
एक आवाज ऐकला..
कुठलं तरी-
हिरवकंच
पान गळतानाचा.!
आयुष्य जगताना
कितितरी
पान्
उलथवतं असतो.!
पण-
हिरवं पान-
गळताना-
मनही
तसचं..
गळून जातं.!
त्याच्या जवळ
जाऊन-
आपलं दुःख
सांगून येतं.!