Wednesday 30 October 2013

ती..तो..

अबोल ती,
बोलका तो..!!

चंचल ती,
शांत तो..!!

वेडी ती,
भोळा तो..!!

सजली ती,
तापतो तो..!!

झोपली ती,
जागतो तो..!!

हट्टी ती,
मुजोर तो..!!

जवळ ती,
दूर तो..!!

आली ती,
जातो तो..!!

स्वप्न ती,
सत्य तो..!!

रात्र ती,

दिवस तो..!!

Wednesday 23 October 2013

कावळा

भरगच्च गर्दीच्या चौकात

एकीकडून,
गर्दीला समांतर प्रेतयात्रा..!!
हृदयद्रावक मृत्यूचा मातंग..!!

दुसरीकडून,
त्याच गर्दीतील लग्नाची वरात..!!
वेगळ्याच आनंदाची सुरवात..!!

आणि मी मात्र,
तिथेच चौकात,
गांधी पुतळ्यावर.!!

भिर-भिर डोळे फिरवत-
गोंधळलेला-
एक तटस्थ कावळा..!!

Tuesday 8 October 2013

लोकांच्या नजराच नाटकाला जन्म देतात-१

दिपिका हि माझी बालपणातील,माझ्या गावातील मैत्रिण, एका प्रतिष्ठित घराण्यात तिचा जन्म आणि संगोपन झाले. गावातील तिचे घर म्हणजे आदर्श समजले जायचे! तिचे वडील विठोबा त्यांना “पांडुरंग” म्हणूनच सर्व गाव ओळखतो. गावकरी देवळातल्या देवाच्या पायी पडण्यापेक्षा या पांडुरंगाच्या पायी पडून स्वत:ला धन्य मानत, असा हा देवमाणूस गेली १५ वर्ष गावातील राजकारण बिनविरोध सांभाळत होता (हि गोस्ट वेगळी कि गावाची प्रगती करण्यात हा देव तितका नापास झाला). कुणी नजर वर करून बोलायचं धाडसही याच्याशी करत नसत(तगड्या नेत्याचा आधार असला कि असाच होतं,पण त्यांचा स्वभावही तसाच मनमिळावू आहे), अश्या आदर्श बापाची,आदर्श लेक दिपिका..!! खूप मायाळू-दयाळू,सर्वांसोबत हसत-खेळत लवकर मन मिसळून वागणारी हि.! लोक म्हणत कि पोरगी असावी तर दीपिका सारखी..!!
********************************************
याउलट आम्ही दोघी बहिणी गावात फार मिसळत नाही, मी तर गेली १० वर्ष बाहेर बाहेरच आणि नुकतीच ३ वर्ष पुण्यात होती. वर्षातून एकदा घरी यायची, जिथे घरच्यांशी बोलायल वेळ नाही तिथे गाव चौकश्या कुठे करणार...!!
********************************************
असो विषयांतर नको...!!
********************************************
दीपिका,ती गेल्या महिन्यात एका आंतरजातीय मुला बरोबर पळून गेली. कुणावर प्रेम करणे गुन्हा नाही, आणि ज्यावर प्रेम केले त्यासोबत संसार करावासा वाटणे यात काहीही चूक नाही. पण आपल्याला आवडलेल्या व्यक्ती बरोबर संसार करता यावा म्हणून पळून जाणे हा काही पर्याय नाही, हेही आजच्या तरुण पिढीला समजू नये,याचे आश्चर्य वाटते...!!
पळून वैगेरे जायचा हा काही गावातला पहिला प्रसंग नव्हता. या आधी पण बरेच आंतरजातीय विवाह झालेत, आणि गावातील लोकांनी ते स्वीकारलेत सुद्धा, पण दीपिका सारखा चांगल्या घरातल्या मुलीनी अस काही करावं हे लोकांना मान्य नव्हतं. (लोकांची गोष्ट सोडा पण एक मी मुलगी म्हणून मलाही ते अयोग्यच वाटले.) तिच्या पळून जाणाच्या कृतींनी पूर्ण गाव सुन्न पडल्या सारखा झाला..!!
********************************************
हि घटना इथेच थांबली असती तर नवलही नसते, काळानुसार ह्या गोष्टी पडद्या आड जातात. पण याचा  उलट पक्षी परिणाम आम्ही मुलीच सहन करतोय, गावापासून जवळच्या मोठ्या शहरात जान-येण करून शिकणाऱ्या मुलींच्या आई-वडिलांनी त्यांची नावे काढून गावातल्या शाळेत टाकायला सुरवात केली. माझ्या घरी येऊन माझ्याच आई-बाबांना सावध करायची मोहीमच गावकऱ्यानी चालवली. ‘मुलीना शिकवू नका’- हाच एक नारा, हाच एक हट्ट.!! तिच्या एकटीच्या पळून जाण्याने मातंग माजला गावात..!!
जगात पुरुषाच्या खांद्याला-खांदा लावून प्रगती करणारी उलट मी तर म्हणेन पुरुषांपेक्षा यशाची एक पायरी जास्त चढलेली आहे स्त्री, आणि माझ्या गावात मुलींना घरी ठेवायचा हट्ट केला जातोय..!!  
हे अशे बुरसटलेले विचार बघाताना जीव गुदमरतो, रक्त सळसळून उठत, वाटल तिला शोधाव आणि गावात पुन्हा परत आणावं आणि दाखवावेत चाललेले तमाशे..!! (मी पण राग व्यक्त करण्या पलीकडे काही करू शकली नाही..!! याचाही राग आलाच.)
तिच्या पळून जाण्याला माझा विरोध नाही, किंवा पळून जावे असही माझं मत नाही..!! पण आपल्याला हव्या असलेल्या व्यक्तीशी पळून न जाता लग्न करण्यासाठी एक काही तरी MUTUAL विचार शोधाण्याची सक्त गरज वाटते आहे.
जर ती(किंवा तो) कुणावर प्रेम करत असेल, इथे पुन्हा प्रेम आणि आकर्षण यातला फरक ओळखता यायला हवा. सामान्यपणे वयाच्या विसी नंतर प्रेम आणि स्वत:चे भविष्य,परिवार वैगेरे वस्तुस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेतले जातात, कदाचित विसिच्या आधीचे निर्णय चुकूही शकतात,तेव्हा तितकी समज आलेली नसते.
********************************************
जर ती(किंवा तो) कुणावर प्रेम करत असेल, आणि त्याचाच बरोबर संसार करायची इच्छा असणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असतो. पण एकदा शांत आणि समंजस पणे घरच्यांशी बोलून पाहायला काय हरकत आहे. कुठल्याच परिस्थितीला बघून पळून जाने हे मला तितकस सोयीस्कर वाटत नाही. आणि शेवटी आपल्या आई-वडिलांनाही आपला आनंदच हवा असतो, आपली पसंद-नापसंद याचा विचार करून तेही आपल्याला योग्य असाच  निर्णय घेतील हा विचार करायला काय हरकत आहे. पालकांनीही स्वत:च्या मुलांच्या बोलण्याचा, त्यांच्या निर्णयाचा आदर करावा,ते कुठे चुकत असतील तर मित्र बनून त्यांना समजावून सांगावे. नाकी उलट त्यांना जास्त बंधनात ठेवून मुद्दामच कुण्या अनोळखी व्यक्तीशी संसार करायला भाग पाडावे..! नाहीतर घरच्यांच्या संमतीनी झालेली लग्नही फोल ठरतात, हेही मी वेगळे सांगायला नको..!!
आणि पळून जाण्यानी उलट दुरावेच वाढतात, नाती तुटतात, जरी नवीन काही नाती जुडत असली तरी कित्येकदा पळून गेलेली मुलगी आपलं माहेरपण गमावून बसते..!! बऱ्याचदा तर मुलगा-मुलगी दोघांच्याही घरचे त्यांना घरी घेत नाही, समाजात कुणीही विचारात नाही, शेवटी माणूस एक समाजशील प्राणीच नाही का? आणि पळून आलोय, आता सर्वीकडे अवहेलना होतेय म्हणून कितीतरी जोडप्यांनी केलेली आत्महत्या वर्तमानात वाचतोच कि आपण..!!
पळून जायच्या वाढलेल्या घटनांचे प्रमाण पाहून आता १९-२० व्याच वर्षी शिकण्याची इच्छा ठेवणारी चिमुरडी पिल्ले उडण्याआधीच संसारात बांधली जातात..
याचा तोडगा मी किंवा कुणीही सांगण्यापेक्षा स्वत: प्रत्येक मुलीनी-तिच्या पालकांनी शोधून काढावा..!!(माझा मी शोधलाय.) कारण हा प्रत्येकाच्या घराचा वैयक्तिक प्रश्न असतो..!!
आणि प्रत्येक जखमेला काळ हे उत्तर असतेच, काही वर्षांनी मी आणि माझा गावही विसरून जाईल कि कुणी दीपिका पळून गेली,आणि तिच्या मुळे बऱ्याच मुलींचे आयुष्य बदलले..!! शेवटी “लोकांच्या नजराच नाटकाला जन्म देतात..!!” तस पाहिलं तर या गोष्टीचा इतका गाजावाजा व्हायला नको होता,पण गावं-गप्पा आणि त्याचे परिणाम हे गावात राहणारीच व्यक्ती समजू शकते...!!

ठरवलंय

मी आता ठरवलंय
दुरून दुरून प्रेम करायचे..!!
कुठेही न बोलता
स्वत:च तेवढे झुरायचे..!!

मी आता ठरवलंय
प्रेमात जरा सावरायचे..!!
काहीही न सांगता
मुकेच शब्द बोलायचे..!!

मी आता ठरवलंय
सावरताना छान सजायचे..!!
कधीही न पाहता
डोळे घट्ट मिटायचे..!!

मी आता ठरवलंय
सजताना कधी लाजायचे..!!
नशेत अन सख्याच्या
थोडे थोडे डुलायचे..!!

मी आता ठरवलंय
लाजताना थोडे रुसायचे..!!
रुसण्यातच आणि मग
पुन्हा प्रेमात पडायचे..!!