Monday 12 March 2018

स्वतंत्र ओळख

जागतिक महिला दिन सर्वत्र खूप जोरात, अगदी नाचत-गाजत साजरा झाला.  वृत्तपत्रे उत्साहाने प्रोत्साहने भरभरून वाहत होती.  शुभेच्छांचे वर्षावही अगदी दिवसभर चालू होते.  त्यादिवशी बऱ्याच ठिकाणी महिलांनी सेवा, संस्था वगैरे आपल्या क्षमतेने यशस्वीरित्या चालवल्या.  सर्वीकडे महिलांनी स्वतःचे अस्तित्व सिद्ध केल्याचा गाजावाजा अगदी दोन दिवस चालला.  

पण का? आजच्या शतकातही महिलेला स्वतःचे अस्तित्व का सिद्ध करावे लागत ?  आपली मानसिकता आजही का स्त्री दुर्बल आहे आणि तिने तिची क्षमता दाखवावी या विचारात गुदमरलेली आहे?  आजही यशस्वीपणे काम करताना तिच्या क्षमतेवर संशय का घेतल्या जातो ? आजही आपण का मान्य करत नाही कि पुरुषांच्या सहाय्याने ना जगता स्त्री सर्वस्वी स्वतंत्र असू शकते ?
तिची काम करायची पद्धत वेगळी; पुरुषांपेक्षा हटके असू शकते, हे स्वीकारल्या का जात नाही ? इतक्या स्त्रियांच्या सिद्धीकरणानंतरही तीची तुलना का केली जाते?

आपल्या संस्कृतीला अगदी पूर्वी पासून पुरुषप्रधान मानले गेले आहे.  मुलगी जन्मापासून पुरुषावर कशी अवलंबून ठेवली याचे संस्कार मुलीवर अगदी लहानपानापासून केलेले असतात.  आपल्या वर्तुळाच्या बाहेर जाऊन तिने घेतलेला निर्णय थोपवण्याची सोयही आपल्याच या संस्कारात आहे.  मला माहित आहे फिनिक्स पक्ष्यासारखा या जळलेल्या संस्कारातून उडान घेतलेल्या महिलांची भरपूर उदाहरणे आहेत.  ज्यांच्या आशा-आकांक्षा उंच आहेत त्यांना संस्कृती संस्कार वगैरे बांधून ठेऊ शकत नाही.  पण माझा प्रश्न हा आहे कि ह्या गोष्टी महिलेच्या प्रगतीच्या आडमार्गात येतातच का ?

कधी पुरुषांना एकलत का महिलेच्या विरोधात, समाजाच्या विरोधात,  घराच्या विरोधात जाऊन निर्णय घ्यावा लागतो ते?  नाही कधीच नाही !  पुरुष जी म्हणेल तीच पूर्व दिशा समजली जाते ! महिलांच्या यशोगाथा वाचताना हे नाही का हो खटकत ? तिला प्रत्येकदा कोणाच्या ना कोणाच्या विरोधात जाऊन स्वतःचा मार्ग निर्माण करावा लागतो, असे का ? तिच्यासाठी अडथळे निर्माण करण्याची मानसिकता आपल्या समाजातून मोडून काढण्याची गरज आहे. महिलांना तुमच्या आधाराची गरज नाही, तिचे अस्तित्व खूप सुंदर आणि स्वतंत्र आहे  हि भावना पुरुषप्रधान संस्कृतीत रुजायला अजून किती शतके उलटणार आहे ?

जागतिक महिला दिवस बऱ्याच यशस्वी महिलांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारा दिवस होता.  त्यांच्या यशाच्या गाथा वाचून मी महिला असल्याचा अभिमानच वाटला. पण त्यांच्या यशाची पायवाट आणि त्यात असलेले अडथळे वाचून मन कासावीस झाले.  छोट्या छोट्या गोष्टींसाठी तिला भांडून गरज नसताना स्वतःची समर्थता सिद्ध करावी लागते हेच चुकीचा आहे.  जागतिक व राष्ट्रीय स्थरावर महिलांच्या यशाचा आढावा घेताना खेड्यातील स्त्रियांची स्थिती दुर्लक्षित केली जाते.  खेड्या-पाड्यात स्त्री सक्षमीकरणाच्या फक्त चर्चाच आहे.  आजही तिथे निम्म्यापेक्षा जास्त स्त्रिया चूल-मूल यातच अडकल्या आहे.  गावातील पुरुषांसाठी महिला दिवस म्हणजे फॅशन आहे फक्तं.! अंधाऱ्या रात्री बायकोवर हात उगारून, दिवसा मी किती तिचा आदर करतो याचा मुखवटा घालून समाजाला दाखवायची मानसिकता खेड्यातील सुशिक्षित वर्गात आजही दिसून येते.  आजही महिला पुरुषरुपी मायाजाळेत फसली आहे.  कितीही दारू पिऊन मारहाण करणारा नवरा असला तरी तो परमेश्वरच, हा विचार कितीतरी महिलांच्या मनात घर करून बसला आहे.  आणि हेच अविचारी अमानवी पुरुष मी किती स्त्रीचा आदर करतो म्हणत महिला सशक्तीकरणाचे भाषण देत आहे.  

या पुरुषप्रधान संस्कृतीतून बाहेर पडण्यासाठी स्त्रियांनीच स्वतःला ओळखण्याची गरज आहे.  स्वतःच्या वर्तुळाबाहेर येऊन पुरुष वेगळा आणि मी स्त्री वेगळी हे समजायची आवश्यकता आहे.  जागतिक महिला दिवस हि एक संधी आहे, या दोघांमधली तुलना थांबवून दोघांनाही स्वतंत्रपणे ओळखण्याची !


... वैष्णवी..