Friday 24 October 2014

अर्धी राहीलेली कविता..

विस्कटलेले केस,
पदरही ढळलेला.!
दार उघडले,पण
ओळखलेच नाही तिला..!

एकही शब्द न बोलता
चालली होती पाठमोरी..!
मुक्याने जाणारी तिच असणार
तेव्हा ओळख पटली खरी..!

"सखये, का अशी,
निघून जाणार..?
मला अधांतरी पुन्हा
तात्कळत ठेवणार..?"

शब्दांनी माझ्या,
ती थबकली..!
परतणारी पावले,
परत वळली..!

डोळ्यात तिच्या जरी
तिरस्कार होता.!
मिठित मला घ्यायचा
आवेगही दाटला होता.!

राग तिचा अश्रूत
होता विरघळला.!
विरघळण्याचा डाग आजही
डायरीने आहे लपवला.!

मिठित येउन पुटपुटली
बये.! दूर पुन्हा लोटू नको.!
हवं तर माजघरात कोंडून ठेव
पण या जगात मज विकू नको.!

खिन्न मी,
तिला घरात आणली..!
हिला कुठल्या अलंकारानी सजवावी,
वॄत्त आणि मात्रांचीही गर्दी दाटली..!

तिच्यावर घालणार् या बंधनांची
चाहूल लागली असावी बहूधा..!
उठली संतापून, बोलली घालून-पाडून
आणि निघून गेली-पुन्हा एकदा..!

जाता जाता सांगायला
ती विसरली नाही..!
तुझी कविता कधीच
पुर्ण होणार नाही..!

शब्द तुझ्यात अडकणारा
तुला सापडणारा नाही..!
अडकलाच एखादा
तरी तो रुजणार नाही..!

अर्ध्या राहीलेल्या कवितेचे शब्द
तेव्हापासून भटकत आहे..!!
अन् कवितेच्या आठवणीत
डायरीची झुरणे सुरु आहे..!!


No comments:

Post a Comment