Friday 19 December 2014

कुणाची करणी, कुणाची भरणी

एक मुलगी असते, सरळ-साधी अगदी, आपल्या नेमून दिलेल्या पायवाटेने चालणारी..! छान-सुरळीत चालू असतं तिचं आयुष्य..!


एका रात्री  कॉल येतो तीला... जुना मित्र एक असतो फोनवर... बोलण्या-बोलण्यात तो बोलतो तीला, "तू आवडतेस मला..! तुझ्या जवळ यायची इच्छा आहे माझी..! माझ्या भावनांची कदर कर.. एकदा मला ते सुख दे.. नाही म्हणू नकोस..!" ती दचकली,भांबावली.. नेमका शब्दांचा अर्थ समजेपर्यत शांत राहीली.. नंतर त्याला स्पष्ट नाही म्हणाली...त्याचा भावना प्रेमाच्या नव्हत्या,वासनेचा गंध तिला जाणवत होता...



नंतर बर् याचदा कॉल झाले त्याचे, तिने स्पष्ट नाही सांगितल्यावरही तो बोलतच होता, "मला तुझ्या जवळ यायचे आहे.. वैगेरे बरच काही.." तिचा मानसिक छळ पराकोटीला पोहचला, न राहवून तीनी हा प्रकार घरी सांगितला..



आताही अश्या घटना घडल्या की मुलींनाच दोष दिला जातो..मुलीचीच चूक असा दृढ समज केला जातो.. तीही अपवाद नव्हती..तिची बाजू ऐकलीच गेली नाही.. आणि दोषी ठरवल्या गेली.. तिचा मोबाईल जप्त.. आणि लग्नासाठी तयार रहा,मुलगा शोधतोय आम्ही, हा आणखी एक धक्का..!!



खरंतरं झालं काहीच नव्हतं, पण काही झालं असतं तर...! लोकं काय म्हणतील ही वेगळीच भिती..! या निरर्थक ओझ्या खाली काहीही कसूर नसताना तिचा बळी चालला होता.. एका वासनाधारी नराधमाच्या आयुष्यात फक्त येण्यानी तिला मनाविरुद्ध्, आपली सर्व स्वप्न बाजूला ठेवून, लग्नाच्या बोहल्यावर उभं राहावं लागलं..! आणि त्याला याबाबतीत एकही प्रश्न विचारला जात नाही, एक संस्कारी म्हणून मिरवला जातो..



यात चूक कुणाची..? तिची..? त्याची..? तिच्या घरच्यांची..? समाजाची..?? लोकांची...?? मानसिकतेची..? विचारसरणीची..?? चूक जे काही असेल,आपलं आपणं ठरवावं...!


मला या सर्वात लग्नासाठी उभ्या असलेल्या तिच्या डोळ्यातले अश्रू..! आणि निर्लज्यपणे अक्षदा टाकण्याच्या बहाण्याने आलेले वासनी डोळे.. - तेवढे स्पष्ट दिसतात..!

No comments:

Post a Comment